Monday, June 23, 2025

मी आणि मी...

मी मदन आणि ती लिला म्हणजे माझं प्रतिबिंब, म्हणजे मीच. माझं तीच नात म्हणजे टॉम अँड जेरी, तुझं माझं जमेना तुझ्या वाचून कर्मेना. दोघांचे आई वडील खेड्यात राहत असल्याने आम्ही गेले काही महिने लिव्ह इन मध्ये राहत होतो. त्यात अनेक चांगले वाईट दिवस आम्ही जगलो, भांडलो एकत्र राहिलो. काही वाद काही विषय असे होते जे कधीही न मिटणारे होते, त्या जखमा प्रेमाखातर घेऊन जगणं भाग होतं. पण पुढे जाऊन काही गोष्टी एकत्र असताना लक्षात आल्या त्या आपल्या दैनंदिन जगण्यातील... घरातील कामातील... आणि ह्यातूनच काल वाद पेटला.

मागच्या आठवड्या भरात लिला ऑफिसच काम करत घरच बघत होती. पण कधी जेवणात चढ कमी तर कधी भांडी किंवा इतर कामात बारीक सारीक चुका होत होत्या. तस ह्या चुका ती गेले अनेक वर्षांत करत होती. पण मी तिला नेहमी सांगत आलो हे असं करू नकोस, उद्या लग्नानंतर मला घरात सासू सुनेचा तमाशा पाहायचा नाही. दोघींमध्ये वाद होऊ लागले तर मला खऱ्याच्या बाजूने उभं राहावं लागेल. चुकीच्या सवयी आता पासूनच टाळ. ह्यावर लिला नेहमी हो, ह्या पुढे अस नाही होणार लक्ष देऊन करेन अस म्हणत आली. पण हे घडत राहील आणि कालच्या वादात हे नातं तुटायला आलं.

एखाद्याला वाटेल नात एवढ्याशा गोष्टीने तुटत का? खर य नाही तुटत. पण एखादी बारीक सुई वारंवार टोचत राहिली अगदी अंगातील शेवटचा थेंब निघेपर्यंत तर?

त्याचप्रमाणे असच आपल्या जगण्याचं! बारीक चुका वारंवार घडल्या तर ते कधीतरी मोठी जखम करतच. आणि मुळात ह्या गोष्टी आठवड्यात घडल्या होत्या, त्यादिवशी वेगळं घडलं.

मी त्यादिवशी वेगळ्या मूड होते, कारण लिव्हइनच कॉन्ट्रॅक्ट दोन दिवसात संपणार होत आणि दोघांचे आई वडील शहरात परतणार होते. पुन्हा लग्नाशिवाय अस एकत्र राहता येणार नाही ह्याची त्याला खात्री होती. ती सकाळी उठली त्याने तिला तेलाने चांगली चंपी केली. तीच आखडलेल अंग मोकळं झालं आणि त्याच्या स्पर्शाने शहारलेली ती मग दोघे रास लिलेत बुडून गेले. दुपारी दोघे बाहेर जेवायला जाणार होते तसे गेले, बाहेर गेल्यावर मला वाटलं मोकळा वेळ आहे घरी जायला थोडं उशीर का होईना पण निवांत कुठे तरी बसू म्हणून मी जेवायला जाण्याआधी गाडी किनाऱ्यावर वळवली. हा किनारा म्हणजे माझ्या प्रेमाला अंत नसल्याचं दर्शनवणार प्रतीक म्हणून मी तिला तिथे नेलं शिवाय तिलाही किनारा जवळाचाच. मी वेळेनुसार ठरवून तिला 4 क्षण निवांत देण्याचा प्रयत्न करत होतो. 

संध्याकाळी आम्ही घरी आलो. थोडी काम आवरून जेवणाच्या तयारीला लागलो. माझं लक्ष सारख फ्रिजकडे होतं, कारण त्यामध्ये त्या दिवसाची शेवटची गंमत ठेवली होती. जेवण करताना तिने विचारलं सुद्धा काय सारख फ्रिजमध्ये, त्यावर मी आहे काहीतरी स्पेशल इतकं म्हणून गप बसलो. मी तीच जेवण अटपण्याची वाट बघत होतो आणि मग फ्रिज मधील गंमत काढणार होतो.

ह्या सोबत माझं दुसऱ्या दिवसाचं प्लानिंग सुरू झालं होतं, मी तिला वारंवार तो ब्लु बन पीस घाल म्हणत होतो, ज्या मध्ये आपण व्हिडीओ शूट केलं होतं तो, त्यावर ती बर म्हणाली, तो ड्रेस तो दिवस आणि उद्या पुन्हा काहीतरी स्पेशल अस डोक्यात ठेऊन मी मार्केट ला गेला चार गोष्टी खरेदी करून आला आणि त्याची उद्या ची तयारी जवळपास झाली होती. ब्ल्यू ड्रेस, तो व्हिडीओ, तो दिवस, खाऊ, स्पेशल काही आणि मुव्ही अस माझा उद्याचा प्लान रेडी होता आणि पुन्हा तिला मी उद्या ब्लु ड्रेस घाल हा अशी आठवण करून दिली आणि मी TV बघत बसलो. आणि पुढच्या काही वेळात सर्व बदललं.

तिने जेवण अटपल, भांड्यावर हात फिरवला आणि एकटीच जेवायला बसली, आणि म्हणाली मला आता काकू कडे जायचंय आणि पुन्हा इथे पण यायचंय. माझं फ्रिज मधील सरप्राईज आणि उद्याचं प्लानिंग मिनिटात वितळल. 

एकत्र गप्पा मारत जेवायचं आणि मग तिच्या आवडीचं आईस्क्रीम तिच्या पद्धतीने खायचं, आईस्क्रीम खाण्याची तिची पद्धत थोडी वेगळीच होती. ते आईस्क्रीम वितळल तर नाही ह्यासाठी मी अनेक वेळा फ्रिज उघडून बघत होतो जेऊन काढू तिच्या पध्दतीने खाऊ, निवांत बसून अस वाटलं होतं आणि आईस्क्रीम खात खात तिला उद्याचा दिवस सांगू एवढं विचार करून बसलेल्या माझ्या पुढ्यात ती जेवली आवरून काकू कडे निघून गेली. 

माझं प्लानिंग, जेवायला गेल्यावर फिरायला नेणं, घरी तिच्यासाठी आईस्क्रीम ठेवण, हे सगळं करत असताना मी हाही विचार नाही केला की मी आदल्या रात्री ऑफिस च काम करण्यासाठी नाईट मारली. मला होणार शारीरिक मानसिक त्रास बाजूला ठेऊन लिव्हइनचे उरलेलं दिवस कसे छान करता येतील ह्याकडे पाहणारा मी क्षणात बदललो.

तिच्या अशा अविचारी वागण्याने समोर उभा राहिला अख्खा आठवडा आणि वादाची हजार कारण, अगदी नेहेमी समजवत आलो ती कारण सुद्धा.

तिने कारण विचारली त्यावर मोडलेलं प्लानिंग सोडून कारण सांगितली वाटलं प्रकाश पडेल पण नाही पडला कदाचित स्वामीच अक्कल देतील. तोपर्यंत तिला तिची चूक कळण्याची वाट बघटिलेली बरी, पण हे सगक समजण्याचा विचार करण्याचा प्रयत्न करेल? की पुन्हा बदनामी... अन... पुन्हा तेच पाढे?

दोघांच्या लिव्ह इन मध्ये असतानाच्या वागण्यावरून एक ठळक गोष्ट समजली ती म्हणजे मी गोड बोलूच शकत नाही; कदाचित बोलण्यापेक्षा माझ्या कृती प्रामाणिक आणि प्रेमाने भरलेल्या आहेत. उलटदर्शी ती नेहेमी गोड बोलते, बोलून प्रेम व्यक्त करते; पण तिच्या बोलण्यात जे आहे ते तिच्या कृतीत आहे का? तितक्याच प्रामाणिक तिच्या कृती आहेत का?

पूर्वीचे वाद सोडता दैनंदिन जगण्याकडे पाहिलं तर वादाच कारण अस जाणवत... "कदाचित मला कधी समजलं नाही की बोलण्यात थोडा गोडवा असावा" आणि "तिला कधी कळलं नाही कृतीत जास्त प्रामाणिक पणा असावा."

- रोh@nj




Sunday, February 2, 2025

नाते... क्षितिजा पलीकडचे 


आज बऱ्याच वर्षांनंतर आपण इथे भेटलो नाही का?

हो ना, जवळपास कॉलेज नंतर आजच...

पण तू येत अशील ना इथे अधून मधून, मी विचारलं!

अधून मधून म्हणजे अगदी सारख नाही पण वर वर फेरी व्हायची, विश्वास म्हणाला.

जेव्हा कधी एकट वाटेल, लिहावं वाटेल किंवा अगदी सहज मनाला भरती आली की यायचो अधून मधून.

तो बोलत होता, तितक्यात मी अडवून म्हंटल, तू लग्न का नाही केलंस.. तो हसला आणि म्हणाला विसरलास की काय..

मी पण स्वतःला टपली मारून म्हंटल, 'अरे हो मीच होतो ना साक्षीदार'.

पण मग संसार? मी विचारलं..

विश्वास एक बोट त्या क्षितिजाकडे दाखवत म्हणाला, ते दूर जिथे पलीकडे खळाळत्या समुद्राच आणि धगधगत्या रवीच मिलन होतंय, त्यांचा तो संसारच जणू थाटलाय.

माझं ही तसंच आहे, दुरून पाहशील तर तुला दिसेल माझा ही संसार सुरूच आहे तिच्या आठवणी सोबत, तिच्या गोष्टींसोबत.

शब्दांत फुलवू नकोस रे मित्रा, लग्न होऊन ही संसार नाही तरीही आहे म्हणतोस.. मग वेगळं का राहतोस?

परत त्याने क्षितिजाकडे बोट दाखवलं आणि म्हणाला, इथून तो समुद्र आणि रवी एकच दिसत आहेत, जस आम्ही.

ती खळाळत्या समुद्रासारखी, विशाल. फक्त अंगानेच नाही तर मनाने सुद्धा, तो हसत म्हणाला.

विशाल म्हणजे ? मी मध्येच.

विशाल होती ती, कारण माझ्यासारख्या धगधगत्या आग ओकणाऱ्या सूर्याला स्वस्ताच्या कवेत घेण्याची क्षमता त्या समुद्रात होती.

समुद्र कसा इतक्या बलाढ्य सूर्याला स्वस्ताच्या कवेत घेईल,

काय पण फेकतो रे तू..

आता त्याने पुन्हा बोट दाखवलं, पण क्षितिजाकडे नाही तर मावळत्या सूर्याचं प्रतिबिंब ज्या शांत समुद्रात पडलं तिथे.

ते बघ, आग ओकणाऱ्या सूर्याला समुद्राने कवेत घेतलंय.

समर्पक बोललास पुढे बोल, ते दृश्य आणि त्याचा दृष्टांत ऐकून मला पुढे ऐकण्याची ओढ लागली.

तो बोलू लागला, अशीच विशाल होती ती. प्रेमाच्या उंच उंच लाटा उसळणारी, माझ्या आवडी निवडी जपणारी, जीवाला जीव देणारी. आणि सर्वांत महत्त्वाचं तळपत्या सूर्याला मिठीत घेणारी.

बापरे एवढं कौतुक, समुद्राला ही डायबिटीस होईल मित्रा, मी म्हंटल.

विश्वास हसला आणि म्हणाला, एका बायको मध्ये जे एक पुरुष पाहतो ते सर्व होत तिच्यात, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, तळमळ म्हणून म्हंटल ती विशाल समुद्रासारखी प्रेमाच्या लाटा उसळणारी होती.

एक मिनिटं तुझ्या प्रत्येक वाक्यात होती, होतं अस का आहे. आता तुझं प्रेम नाही, आहे ना पण ती सोबत नाही म्हणून.. तो म्हणाला.

अस सगळं चित्र असताना दुरावा का?

तो पुन्हा समुद्राकडे बघत बसला, मी मनात म्हंटल आता कुठे बोट दाखवतोय काय माहित.

त्याची नजर समुद्रात हरवली.

मी - अरे ऐकतोय ना, विश्वास?

तो - विश्वासच तर हरवला..

म्हणजे...मी! म्हणजे पुन्हा विश्वासघात..???

शुऊऊ... त्याने मला अडवलं.

नाही ह्यावेळी विश्वास घात नाही पण डोळे मिटून विश्वास ठेवता यावा अशा वागण्याची अपेक्ष्या गेल्या अनेक वर्षांची होती. चितेवर झोपलो आणि कोणी तिच्यावर बोट उचललं तरी यमाकडे 5 मिनिटं वेळ मागून तिच्यावर दुनियेचा नाही पण माझा विश्वास आहे.. अस बोलता यावं अशी इच्छा होती..

हे बोलताना त्याचा आवाज भारदस्त व मानेच्या शिरा ताणल्या होत्या.

मग काय झालं माझे प्रश्न चालूच.

माझी इच्छा इच्छाच राहिली.. विश्वास तुटायला एक क्षण पुरेसा असतो.. पण विश्वास निर्माण करायला आयुष्य कमी पडत, आणि निर्माण झालेला विश्वास टिकवायला बारीक बारीक गोष्टी वेचाव्या लागतात...

म्हणजे कुठेतरी मनावर जखम झाली तर?

तो पुन्हा किनाऱ्यावर हरवला.

ती समुद्रासारखी विशाल होती पण सोबत पाण्यासारखी प्रवाहाच्या दिशेने वाहणारी.. आणि मी त्या सूर्यासारखा नित्य नियमाने उगवणारा आणि प्रेमाच्या चांदण्यात मावळणारा.

पण तिच्या प्रवाहाच्या दिशेने वाहण्याच्या वृत्तीला माझ्या विरोधावर ह्यावेळी तिने त्सुनामी लाट उसळण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण ती विसरली कितीही उंच लाटा उसळल्या तरी त्सुनामी सूर्यापर्यंत पोहचू शकत नाही ना सूर्याची आग विझू शकते.. ती शांत होते फक्त क्षितिजापलीकडे मावळतीला कवेत घेतल्याने.

मग तू आणखी आग का नाही ओकलास, मी थोडं त्याच्या भाषेत बोलून बघितलं.

त्याने खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला मित्रा, मला समुद्र आटवायचा नव्हता; फक्त प्रवाह बदलायचा होता.

मग तू नेहमी प्रमाणे बदलायला दिशा तर दाखवायची..

शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांना परीक्षेपर्यंत मार्ग दाखवतात., विश्वास म्हणाला.

मग समुद्र प्रवाहाच्या दिशेने वाहत गेला आणि तू...

ह्यावेळी समुद्र शांत आणि आकाश चांदण्यांनी भरलेलं, सूर्य मात्र नाहीसा झालेला...