Wednesday, December 26, 2018

दोस्ती

बरेच दिवस झाले, त्याचं लक्ष दिसत नव्हतं कशात. माझ्यासाठी तसा तो नवाच पण तरी सुरुवातीला थोडी तयारी आणि हुशारी दाखवली होती त्याने. पण आता Constantly तो घसरत चाललाय हे काही न कळण्यासारखं नव्हतं शिवाय त्याच्यात काहीतरी करण्याची जिद्द होती हे ही नजरेतून लपत नव्हतं. पण मग फक्त दहाच कसे?
दहावीच वर्ष म्हणजे तस बघायचं झालं तर आयुष्यातली पहिली महत्वाची पायरी. किमान त्यावेळी तरी आमच्यासाठी असंच सांगितलं जायचं. आता कदाचित हे शब्द नि असल्या व्याख्या बदलायला हव्यात; कारण त्यावेळी मी विद्यार्थी होतो आणि आता माझ्या विद्यार्थ्यांना हे पटेल, समजेल अशी आशा करणं म्हणजे मूर्खपणा ठरेल.

(illustration by Sandesh Rasal)

दिवाळी दरम्यान शाळेची सहामाही परीक्षा झाली. तसे आजकालचे विद्यार्थी, विद्यार्थी म्हणण्यापेक्षा आजची पिढीच तशी जरा उर्मट आणि उद्धटचं. आणि अभ्यास सोडून सगळ्यांतच यांची हुशारी. सर्व करून अभ्यासात अग्रेसर असणारे देखील अनेक आहेत. आमच्या वाट्याला नेहमी गाळच लागला. शेवटी शिक्षक म्हणून तो साफ करण्याची आणि नवनिर्माणाची जबाबदारी माझीचं.
सुट्टीनंतर बऱ्याच दिवसांनी तास भरला. नित्यनियमाने हजेरी वगैरेची औपचारिकता झाल्यानंतर सगळ्यांचे पेपर वाटून झाले. वर्गातून सगळी मुले-मुली बरे गुण मिळवून पास होती. माझ्या विषयातही चांगला निकाल होता. पण चार एक मुलं काठावर देखील पास नव्हती आणि त्यातलाच हा सलमान. वार्षिक परिक्षेच्या अनुषंगाने त्यांचा आताच कान पिळण गरजेचं होतं. एका कुणाला उद्देशून अपमानित करण्यापेक्षा (चूक दाखवणं हे आजकालच्या कारट्यांना अपमान वाटतो) मी सर्वांना उद्देशून काही मार्गदर्शन करू लागलो. त्या नापास विद्यार्थी आणि काही कमी गुण मिळलेल्या विद्यार्थ्यांमुळे तस माझ्याही मनाला लागलं होतं. मी भाऊक पणे एखादा बाप मुलाला ओरडावा तस बोलत होतो अगदी हक्काने. मी बोलत होतो, "अरे जराही लाजा नाहीत तुमच्यात हे असे मार्क्स मिळवून पास होणार आहात का बोर्ड एक्साम. अवघे तीन महिने उरलेत आणि ही अवस्था तुमची. कसे पास होणार. उद्या निकाल लागल्यावर रस्त्यात जेव्हा तुम्ही भेटता आणि त्यावेळी जेव्हा आनंदाने सांगता सर, हमे फस्ट क्लास मिला! तेव्हा आमची मान उंचावते पण तेच जर नापास झालात आणि तुमची नजर चोरटी झाली मान झुकली तर तिथे आमची मान शर्मेंन झुकते. तुम्हाला शिकायच नसेल तर कशाला इथं येऊन बसता. उद्या भीक मागायची वेळ येईल. तेव्हा आठवेल शिक्षणाच महत्व काय ते".
मी बरंच बोललो रागाने. त्यानंतर त्यांना पेपर कसा लिहावा यावर प्रकाश टाकला. मी थोडा तावातावातच होतो. माझं बोलून झालं, थोडं डोकं शांत ठेऊन सगळ्यांना शिक्षा म्हणून पेपर दोनदा लिहून आणायला सांगितला आणि माझा तास दोन कविता शिकवून पूर्ण केला.
सगळे विद्यार्थी निघू लागले. काही येऊन पुढल्या परीक्षेत जास्त गुण मिळवू अस आश्वासन तर काही कमी गुण मिळाल्याची कारणे देत होते. सगळे निघाले; तो शेवटच्या बाकावर तसाच बसून होता.
मी निघत असताना त्याने रस्ता अडवला आणि उद्गारला.
"सर दिल को लगी आपकी बात, आपने जो सर झुकाने और भीक वगैरा बोला, हमारी वजेसे..." सलमान.
"मग काय आरती करू का तुमची शंभरात वीस आणि पंचवीस गुण मिळवलेत म्हणून. ज्यावेळी तुम्ही विद्यार्थी म्हणून बाहेर पडता ना त्यावेळी तुमची ओळख अमूक शिक्षकाचा विद्यार्थी म्हणून होते. तुम्ही चुकलात बरोबर असलात तरी शिकवण आमचीच आहे हेच समजतात लोक. मग तुमच्या ह्या हलगर्जीपणाने तुमचं तर वर्ष आयुष्य फुकट घालवता सोबत आमचं मान-प्रतिष्ठा ही धुळीला मिळवता." मी जरा रागातच बोलत होतो.
त्याच्या डोळ्यात पाणी होतं. तो बाकावर बसला. म्हणाला, "सर, मे दिन भर बाईक पर घुमता रेहता हू. स्कुल भी कभी बंक करता हू. दोस्त है के छोड ते ही नहीं. पेहले होम वर्क करता था, थोडा बहोत घरपे पढता था, पर अब दिनभर उन दोस्तो के साथ घुमता रेहता हू.
माझी पावलं दारातून मागे फिरली. विषय गंभीर वाटत होता. मी त्यांच्या समोर बसलो. म्हटलं, "का? त्यांना नको म्हणता येत नाही. हाताला पकडून तुला फिरवतात का. लहान आहेस का आता."
"करता हू मना सर. कई बार किया मना तो फिर दोस्ती का वास्ता देते है, बस क्या यही दोस्ती? दोस्त के लिये ये नहीं कर सकता वो नहीं कर सकता. मतलब के मजबूर कर देते है के मै पुरा दिन उनके साथ रहू. फिर मुझे मना भी नहीं करने होता, उनको बरा लगेगा सोच के उनके साथ ही घुमता रेहता हू. और सच बोलू तो पिछले दो महिने से मैने एक दिन भी घर पे पढाई नहीं किई.", सलमान म्हणाला.
हे ऐकून पहिलं तर त्याचेच कान फोडावे वाटलं पण खरं बोलतोय आणि त्या परिस्थितीतुन बाहेर पडण्यासाठी त्याला आताच योग्य मार्ग दाखवणं गरजेचं होतं. प्रॉब्लेम काय ते एव्हाना कळलं होतं. आता सोल्युशन द्यायला मला जमतंय की नाही ती माझी परीक्षा होती. मी सुरवात केली, "ते तुझे मित्र नाहीत".
"नहीं सर दोस्त ही है, मेरे साथ ही रेहते है", सलमान.
"मी बोलताना आता ऐकायचं फक्त, मला समजलं तुझं काय ते. आता माझं ऎक आणि नीट डोक्यात साठव."
"ठीक है, सर"

(illustration by Sandesh Rasal)

"वो तेरे दोस्त नहीं है, दोस्ती के बुरखे मे तेरे दुष्मन तेरे साथ है". तू ओळखायला चुकलायस. तुझ्या वयाला इतकी समज ही नाही म्हणा की काय योग्य-अयोग्य समजू शकेल."
"मित्र तो नसतो जो आपल्याला चुकीच्या मार्गावर घेऊन जातो. मित्र तो नसतो जो संकटात टाकतो, मित्र कधीच आपल्याला चुकीचा सल्ला देत नाहीत, किंवा आपलं नुकसान होईल असं ही वागत नाहीत." तो आता कान टोचून ऐकत होता.
खरा मित्र आणि मैत्री मिळायला नशीब लागत. एकत्र राहील, एकत्र फिरलं नाहीतर एका वर्गात शिकलं म्हणजे तो मित्र झाला अस होत नाही. ती फक्त वाईट संगत आणि सोबत असते. जी काही काळासाठी असते. ती कितपत करावी ते ज्याचं त्याने ठरवावं." कदाचित सगळं त्याच्या डोक्यावरून जात होतं. तो नुसती ऐकण्याची भूमिका आता करत होता.
"तुझ्यासारखा मी पण एका बीएमसी शाळेत शिकलोय. चांगले वाईट..."
"क्या? सर आप बीएमसी?". तो.
"हा, तो इसमे क्या हुवा. वो स्कुल स्कुल नहीं होते. वहा पढाई नहीं होती. मी ही तुझ्यासारखा तसाच विद्यार्थी. आणि चांगले वाईट असे सगळे मित्र भेटले तिथेही आणि तिथून बाहेर पडल्यावर आजही. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर एक एक वाट्याडा भेटत गेला. ज्याने नातं जपलं, मन जोडलं तो मनात मित्र बनून राहिला. ज्याचा प्रवास संपला तो भूतकाळ बनून मागे सरला. प्रत्येक वाट्याडा वेगळा होता आणि तो माणूस वाईट नसतो रे त्याच्या सवयी चांगल्या वाईट असतात. त्यातल्या कुठल्या आपल्याला लावायच्या ते आपण ठरवायचं. दम मारायला चल, अड्ड्यावर चल, बसायला चल, असे सगळे अतरंगी मित्र माझेही आहेत. पण त्यातली ती वाईट सवयी सोडली तर त्यांच्यात चांगले ही गुण आहेत, काही कला आहेत खेळात हुशार आहेत. मी त्यांच्या बरोबर बसलो नसेन तरी खेळलो आहे. त्यांच्या सोबत पोरींची छेड काढली नसली तरी मुलींशी मैत्री केली आहे. शाळेत असताना शेवटची चार वर्षे तर शेवटच्या बाकावर बसून काढलीत पण आजही शाळेतला शिक्षक हुशार नाही पण चांगला विद्यार्थी म्हणून तरी ओळखतात."
"सर आप भी... फिर भी टीचर... मेरे भी दोस्त घुमाते है, कभी कोई मैदान, फिर वो दारू अड्डा, नाके पे, चाय की टपरी पे, उनके साथ उनकी बात नहीं मानी तो नाराज होते है और दोस्ती तोड रहा है बोलके करवा लेते है सब." सलमान म्हणाला.
"का विरोध करता येत नाही. तुझ्या या अभ्यासावर आणि आयुष्यावर त्याचा परिणाम होतोय हे समजतंय ना. जिथे योग्य तिथे वेळ दे, जिथे चुकीच किंवा पटत नाही तिथे सरळ विरोध कर मग अशी मैत्री तुटली तरी चालेल. सोबत राहून पाठीत वार करणारे शंभर मित्र जोडू नकोस. पर तेरे सुख दुःख मे हमेशा तेरा साथ दे, तुझे सही राह दिखाये और तेरे नुकसान के बजाये अपने साथ आगे बढणे का हौसला दे ऎसे चार दोस्त जरूर बनाना."
त्याला समजलं असावं असं चेहऱ्यावर दिसत होतं पण शब्दात काही उतरत नव्हतं.
"सर अच्छा हुवा आज आपसे बात करके दोस्ती का मतलब तो समझ सका", कोशीश करुंगा सर अब सही गलत समझने की, दोस्ती सबसे मगर रिश्ता कुछ अपनो से जोडने की और साथ मे अच्छी पढाई करने की", सलमान.
चला अर्धा तास रामायण वाचल्याचं समाधान मिळालं. मी हसलो आणि म्हणालो, "जा आता आणि परत असा मित्र भेटला की मला भेटायला आण, त्याला म्हणावं त्याच्या पेक्षा टपोरी फंटर है इधर".
तो हसत आणि विचार करत जड डोक्याने निघून गेला.
मागो माग मीही निघालो, तो नाक्यावर दिसला. लिफ्ट मागत होतो. मी जाऊन गाडी बाजूला थांबवल्यावर बसला आणि स्टेशन को छोडो भाईसाब म्हटला. मी काही न बोलता सोडलं. गाडीवरून उतरून तो थँक्स बोलून निघत होता. हेल्मेट काढल्यावर थांबला. "सर आप, सॉरी सर देखा नहीं मैने, वो सोच मे था तो बस बैठ गया... पर आप तो उस साईड जाते है फिर यहा... मी हेल्मेट घालत म्हटलं, "दोस्त वो नहीं होता जो तुम्हारा रास्ता बदले, बल्कि वो होता है जो तुम्हारे लिये अपना रास्ता बदले" आणि निघालो.
तो तिथेच उभा एकटक पाठमोऱ्या धावणाऱ्या गाडीकडे बघत पुटपुटला. एक सच्चा दोस्त मिल गया...

- रोh@nj