Saturday, December 16, 2017

जातीचं प्रेम!

          त्याचे डोळे पाणावलेले. नजरेला नजर भिडल्यावर हसत म्हणाला.. म्हणजे माझं तस काही नाही, पण generally सांगतोय, मी तस काही करू शकत नाही.
          

माझा अगदी जवळचा मित्र तो. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार, संस्कारी, कर्तृत्ववान असे लौकिक शब्द सहज लागू पडतील असा तो मित्र. शिवाय दिसायला आणि personality ला ही बेस्टच. तसा या विषयावर कधी त्याच्याशी किंवा इतर मित्रांशी चर्चा किंवा विषय रंगल्याच आठवत नाही. पण एक म्हाळाचा किस्सा आठवतोय, त्याच्याकडे जेवणाला गेलेलो, आवर्जून बोलवायचा पितृपक्षात. कोंबडी वडे त्याच्या आईच्या हातचे... वाहहह! तर जेवताना सहज एक नजर देवाऱ्यातील फोटोवर गेली तेव्हा विचारल्यावर म्हटला, अरे आमच्या देवाचा आहे तो. त्यावेळी पडलेला प्रश्न.. लहानपणापासून एकत्र वाढलेल्या आम्हा दोन मित्रांचा देव वेगळा कसा..?
          दोघे वाढत होतो. शाळा संपली. पुढचं शिक्षण ही चालू होऊन पूर्ण झालं. खर्चाच्या बाबतीत आपल्या मध्यमवर्गीयांवर काळे ढग नेहमी असतातच. पण त्याच त्याला वाईटही आणि कुतुहलही वाटलं. कारण त्याने Admission राखीव जागेतून भेटत असताना ते नाकारून आपल्या योग्यतेवर घेतले. पण त्यातही त्याला Free ship दिली गेली. यात तो थोडा चकित आणि त्रस्त ही होता. पण आजवर या विषयावर आम्हा दोघांत सविस्तर बोलणं झालं नव्हतं.

आता वयाची पंचविशी ओलांडलेले आम्ही. हल्लीच भेटलो होतो. थोडा हिरमुसला दिसत असताना हसत आलिंगण देत म्हणाला, अरे ही कशीय?
छान होती मुलगी. साडीवर उठून दिसत होती. कोणय म्हटलं, त्यावर म्हणाला 'अरे लग्नाचं सुरू आहे, हीचा फोटो आलाय'.
ओहहहह. बकरा कटने वाला है.... थोडी चेष्टा करत म्हटलं छान आहे. पण तुला पसंदय ना!
त्यावर त्याने उत्तर दिलं माझं सोड, तुला काय वाटतंय.
त्याच उत्तर ऐकून थोडा धास्तावलो. अरे लग्न तू करणारयस म तुझे विचार, तुझं मन, तुझी भावना महत्वाची. माझे किंवा दुसऱ्ह्याचे विचार जाणून काय करणार ना. 
त्यावर म्हणे, लेखकाच्या दृष्टीने आणि विचाराने तिला बघून सांग म्हटलं मित्रा. तुझं मत तुझे विचार महत्वाचे. चण्याच्या झाडावर बसवून आपटायचा विचार होता वाटत त्याचा. थोडं त्याच्या डोळ्यांत बघून म्हटलं.
          मग तीच काय जिच्यावर तुझं प्रेम आहे? एकटक बघू लागला. क्षणभर नजर खिळली आणि जोरजोरात हसू लागला. 
अरे भावा कोण? काय हे मध्येच?कोण नाय रे बाबा?
मग रोज फोनवर कोण असतं... तुझं social networking च update असत माझ्याकडे up to date. शिवाय तुझं वागणं हि कळतंय की, मी म्हटलं. 
नाय रे बाबा, च्यायला उगाच नको ते बोलू नकोस, कोण नाय आपलं. 
मग गेली तीन वर्षे कोणाच्या बड्डे साठी माझ्याकडून मेसेज बनवून घेतलेस? 
आणि माझ्याकडचे status... Sensitive मेसेज कशाला नि का हवे असतात तुला. 
अरे बाबा ते सहज तुझं लिखाण वाचायला आवडत म्हणून. - तो. 
मी -ओह्ह्ह्ह!! मित्रा माझ्याजवळ तरी खोट बोलू नको. कोणाच्या भावनांबरोबर खेळून, ओढ लावून त्याला अर्ध्यात सोडू नये. स्वप्न एकत्र बघून त्यांच ओझं एकट्यावर टाकू नये. समोरील व्यक्ती आयुष्यभर ते ओझं पेलवून जगेल. जगेल म्हणण्यापेक्षा तीळ तीळ मरेल. समोरील व्यक्तीच्याही भावना समजून घे.
भावनाच तर समजू शकत नाहीत आपल्या घरचे. त्यांच्यासाठी जात-पात, त्यांची खोटी प्रतिष्ठा नि सोबतीला लोक काय म्हणतील हे महत्त्वाचं, तो म्हणाला. 
(डोळ्यांतून होणार पाण्याचा उद्रेक त्याने आवरून धरला होता. तो थांबला. पाठीवरून हात फिरवत म्हटलं बोल. मोकळा होशील.)



तो - अरे म्हणजे माझं तस काय नाहीय. पण बघ तर आपण कुणावर प्रेम केलं म्हणजे कुणाच्या प्रेमात पडलो तर ते जात विचारून करतो का? समोरच्याची जात धर्म सोबत लोक काय म्हणतील हे पाहून प्रेम करतात का? मुळात प्रेम कधी कुठे कसं कुणावर होईल कळतं नाही. प्रेमाची भाषा वेगळीच असते . प्रेमाला जात धर्म कळत नाही.
          काय झालंय नेमकं. Inter-cast चा problem आहे का? घरी बोलास का? स्पष्ट बोल रे काय झालंय नेमकं? कोणय ती? कुठलीय?
          पुन्हा हसू लागला. अरे बाबा मी generally बोलतोय. आपण प्रेम करणार आणि पुढे जर cast वरून आपल्याला वेगळं केलं जाणार असेल तर काय अर्थ य त्याला. - तो. 
          कोण आहे ती सांग? आपण करू solve आणि करू! नाहीच पटलं तर तुमचं लावून द्यायची जबाबदारी माझी. - मी 
तो - नाहीय रे बाबा तस काय आणि कोणीही पटवून दिल तरी आई पप्पांना नाही पटणार ते. लहानपणापासून ओळखतो त्यांना, त्यांचे विचार महितीयत मला. त्यांना प्रेम आणि नात्यापेक्षा त्यांच्या so called परंपरा महत्वाच्या.
मी - तुझी तयारी ठेव तुझं लग्न मी लावतो. 
तो - हाहाह... अरे माझं नाय मी आपल्या आई वडिलांची मानसिकता सांगतोय. आणि तस असततरी मी विरोधात जाऊन काहीच केलं नसत. कलियुगात देव कोणी पाहिला नाही. देव म्हणजे आपला पालनकर्ता पण तो आईवडिलांत दिसतो. म्हणजे लहान पणापासून आपल्याला हवं नको ते बघणारे ते... २५-३० वर्ष रक्त आटवून सावरणारे ते...
त्यांच्या विरोधात जाऊन कसं काय करायचं. त्यांना रडताना आणि चार चौघात खाली मान घालून जगताना नाही पाहू शकत.
(तो बोलतच होता आता, मनावरचं दडपण काढून)

लहानपणापासून हट्ट पुरवताना त्यांना आपल्यावर त्यांची स्वप्न आणि इच्छा लादण्याची नकळत सवयी झालेली असते. आणि लग्न ही त्यांची शेवटची इच्छा म्हण, जी ते आपल्यावर लादतात. आयुष्यात जितकं प्रेम त्यांनी त्यानी केलेलं असत त्याची परतफेड ते येथे अपेक्षित करतात, की आपल्या म्हणण्याप्रमाणेच मुलाला हळद लागावी. त्यामुळे त्यांची ही शेवटची इच्छा समजून का होईना मी विरोधात नाही करू शकत काही. त्यांना त्रास झाला तर माझे हातपाय कापतात, या मार्गावर चाललो तर...



"मी नाही करू शकत अस. स्वतःच्या सुखासाठी आपल्या आईबाबांना त्रास देण्याइतका खंबीर नाही मी. स्वतःच्या बाबांना रडताना पाहण्या इतका खमका नाही मी. त्यांच्या विरोधात जाऊन त्यांना त्रास देऊन काही मिळवण्यापेक्षा तो मार्गच मला चालायचा नाही. त्यांना रडताना नाही पाहू शकत. म त्यासाठी मला सगळं, काहीही सोडावं लागलं तरी चालेल."
          आणि ठिकय ना, आपल्याला याच स्वातंत्र्य नाही. आज मी त्यांच्या इच्छेसाठी स्वतःची इच्छा मन मारून जगेन पण आपल्या पुढच्या पिढीला माझ्या मुलामुलींना ते स्वातंत्र्य देणं की ते आपल्याला योग्य तो निर्णय आणि प्रेमाचं नात जोडू शकतील- तो थांबला होता. 
मी - कलियुगातील देव माहीत नाही. देव कसा तेही माहीत नाही, पण आज तुझ्यात देव दिसला. इतका विचार आणि भावना साठवून मनाविरुद्ध जगणं hats of u! पण तू म्हटलास पुढच्या पिढीला आपल्या मुलांना जातीत न अडकता प्रेमाचं स्वातंत्र्य देऊ.
म्हणजे आपलं लग्न मग मुलं.. म मुलांची लग्न.. तेव्हा त्यांना स्वातंत्र्य देणार. तेव्हा या बुरसटलेल्या विचारातून स्वातंत्र्य भेटणार. म्हणजे हा बदल घडायला आणखी २५ वर्षे जाणार.
तोही विचारात पडला इथे.

२०-२५ वर्षे मी नाही थांबू शकत.
जर आज याविरुद्ध आवाज नाही उचलला तर उद्या तुझ्या सारखेच कितीतरी मरत मरत जगतील कदाचित या ओझ्याने मरतीलही.
मी नाही थांबू शकत या बदलासाठी २५ वर्षे. मी तेव्हा असेल की नाही हे पण माहीत नाही. पण आता याला विरोध केला तर किमान दहातील एक दोघे तरी खंबीर उभे राहतील. आणि आपल्या मागच्या पिढीला सत्य काय ते दाखवतील. आयुष्याचा आरसा त्यांच्यापुढे उभा करून जाती धर्माच्या विळख्यातून त्या पिढीला बाहेर काढतील.

मला त्यांच्याविषयी वाद किंवा त्यांच्या प्रेमावर टीका नाही, पण विखुरलेल्या आणि तुच्छ शूद्र विचारांना माझा विरोध आहे. 
प्रेम जात पात धर्म पाहून केलं जातं नाही. मुळात ते केलं जातं नाही. आपसूकच होत. नकळत. म ते झाल्यावर लोक काय म्हणतील आणि त्यात तुच्छ लोकांनी आखलेल्या परंपरेसाठी त्या प्रेमाचा त्याग करायचं मला पटत नाही. 
          मान्यय त्यांनी जन्म दिला लहानाच मोठं केलं. २५ वर्षे वाहून घेतलं. पण तुला ज्या मुलीने २५ दिवस प्रेम दिल तू तिला जवळ केलंस ना ती पुढची ५० वर्षे स्वप्नात रंगवून बसलीय. आयुष्य एकमेकांसाठी जगण्याच्या मनोमनी शपथा घेऊन ती आणि तू ही तयार होतासचं. एकीकडे प्रेम आणि दुसरीकडे परिवार हे किती कठीण निवड असते याची कल्पना आहे मला पण जन्मदात्यांना सोडणं चुकीचंच पण ७ जन्म साथ देण्याची वचनं दिलेल्या व्यक्तीला बुरसटलेल्या विचसरांसाठी सोडणं हा मार्ग नाही, मी म्हटलं!



मी - या पिढीला हे मान्य करावं लागेल. त्यांचे विचार बदललेचं पाहिजेत. त्यांनी याचा स्वीकार करणे हाच योग्य मार्ग आहे. आणि ते पटवून देणं हाच आपला लढा आहे. आपल्यात क्षमता हवी त्यांना सत्य आणि प्रेम पटवून देण्याची. त्यांच्या विरोधात नाही, त्यांना घेऊन सोबतीने पुढे जाण्याची तयारी आपली असायला हवी. यासाठी हिंसा अहिंसा दोन्ही करावं लागेल. 
ही लढाई माय बापाशी नसेल. त्यांच्या विचारांशी असेल, हे युद्ध दोन गटांत नसेल. दोन पिढ्यांच्या विचारांत असेल. पण यात विजय नक्कीच सत्याचा होईल. माणुसकी शिवाय दुसरी जात नसेल भविष्यात... पण त्यासाठी २५ वर्षे थांबायचं नाही. नाहीतर आपल्यासारखे अजून मरत राहतील क्षणा क्षणाला.

तो - तू एवढा का सिरीयस झाला, माझं काय नाही रे बाबा.. मी just विचार सांगितले तस झालं तर काय होईल. पण आपल्यासारखे म्हणजे तुझं काय प्रकरण...!!!

निशब्द सार!!

To be Continued..........



Sunday, July 23, 2017

गड गड गटारी !!

गटारीचा दिवस. प्रोग्रामची तयारी करायची म्हणून मी आदल्या दिवशी अर्धा दिवस भरून कामावरनं निघणार होतो. पण तब्बेत जरा डाऊन होती त्यामुळे निघणं भाग पडल्यानं निघालो. आमच्या लाडक्या मॅनेजरना गटारीसाठी जातोय असं वाटत असतानाही देवमाणसाने सोडलं बाबा.
           दुसरा दिवस उजाडला, गटारीचा. मोहीम आखण्यात आली. मार्गक्रमण सुरु झाले. छान पाऊस पडत होता. चांगलाच जोर धरला होता आज पावसानेही. अशाच थंड आणि सुंदर वातावरणात आजची  सकाळ झालीच आमची. दिवस तसा गटारीचा. रात्र मोठी असणार, म्हणून दिवस थोडा उशिराच सुरु झाला. आणि त्यात तो रविवार म्हणजे मुबंईकरांचा आरामाचाच दिवस.
पण आमचा बेत काही वेगळा होता. गटारी निमित्त जरा बाहेर जावं म्हटलं प्रोग्राम तसा उत्तमचं आखलेला. तयारी ही बऱ्याच दिवसांची. आता फक्त ठिकाणावर पोचायची देरी अन् काम फत्ते.
           ठिकाण तसं जवळचचं.. मुंबईपासून अवघ्या २ तासांवर. आता प्रोग्राम ठरलाय तर जल्लोष व्हनारचं. मग तयारीसाठी मी नि राजू पुढे निघालो. सकाळी १०... १०:१५ च्या कल्याण लोकलने चिंचपोकळी स्टेशनवरून आमचा प्रवास सुरु झाला. धावणाऱ्या इमारती पावसात भिजताना रावस दिसत होत्या. आज त्यांच्या माथ्यावरही गटारीच्या जंगी सोयी होत्याचं. पाऊस वाढला, सारं दृष्य बंद खिडकीतून आता धूसर झालं. ठाण्याला पोहचायच होत. आता राजू नि माझ्या गप्पा सुरु झाल्या. गप्पा कसल्या गटारीच प्लानिंगच ते. कल्पना फारशी नव्हती पण जरा धाकधुकं होतीच. शुभ कार्यात अडथळा येणारचं नं.
ऐन मुलुंड स्थानकावर बंद ट्रेनचे स्पीकर बॉक्स चालू झाले अन् "कृपया ध्यान दे, भारी बारीश के कारण पटरी पर पाणी जमा होणे से सभी गाडीया रोक दिई गई है". दोघांच्या तोंडून शिवी निघाली जी बाजूच्या कानात न जाता एकमेकांना कळाली.
            आता हा प्रवास फारसा सरळ दिसत नव्हता. पुन्हा मागे फिरणं मला मान्य नव्हतं तस त्याच्याही नजरेत नव्हतं. पुढे जावं तर पावसाचं प्रमाण पाहता रात्री पुन्हा परतण्याची हमी नव्हती. मुळात गंतव्य स्थानावर पोहचू का ? असा अवघड प्रश्नही समोर ठाकलेला.
          निर्णय झाला. मागे हटायचं नाही. मग सारा प्रोग्राम ज्याच्या मार्गदर्शनाखाली ठरला तो आमचा मित्र अमित जाधव, आणगाव, भिवंडी. याचे सहाय्य घेणे नक्कीच गरजेचे होते. त्याच्या आदेशानुसार आम्ही मुलुंड वरून ठाण्यातील तीनहात नाक्याच्या दिशेनं प्रवास सुरु केला. स्टेशन बाहेर पाणी रिक्षाची चाक नसावीत इतकं जमलं होत. आणि त्यातच आजू बाजूचे धंदे जलमय झालेले. असो आम्हाला काय देणं घेणं नव्हतंच. ना रेल्वे सुरळीत चालली त्याच्याशी... ना स्टेशन बाहेर साचलेल्या पाण्याशी, ना त्या पाण्यावर तरंगणाऱ्या फाटक्या गरीब धंदेवाल्यांशी... आमचं ध्येय एकचं... मिशन गटारी !!
           स्टेशन बाहेरचं एक मुलगा भेटला. इथून ठाण्याला कसं जायचं... राजू सुरु झाला, घरी जायचंय कि घरातून निघालाय? मुलगा..घरीच! मग एवढ्या सकाळी कुठं गेलता पावसात..
मुलाचं उत्तर.. क्लासला...
एवढ्या पावसात ... क्लासला!!!
पोरगं जरा लाजलचं...
पोराची शाळा घेत प्रवास सुरु झाला. तोवर ३हात नाका आला. मुलगा कॉमर्स म्हणजे आमच्यासारखंच भविष्य उजळलेला, cpt ची तयारी करतोय असं समजलं, all the best स्वीकारून bye करून त्याच्या वाटेला निघाला..
तुर्ताच आम्ही पूर्व परीक्षेतून सुटलो. आता आम्ही माजीवड्याकडे निघालो. रिक्षा नि सोबतचे प्रवासी बदलले. आम्ही दोघे तेच आमच्याच नशेतले. हा प्रवास थोडक्यातच आवरला.
आता फायनल ची तयारी. आता भिवंडीच्या दिशेने चालायचं होत. बस रिक्षाची चौकशी करत एका रिक्षाने सहारा दिलाच. २ प्रवासी त्याला कमी असावेत, तो आणखी दोनची वाट पाहत थांबला. एक तरुण पुढे त्याच्याच बाजूला बसला. आणि एक नवविवाहित स्त्री आमच्या बाजूला मागे बसली. त्यांना कदाचित uncomfortable वाटत असावं, अश्या त्या बसलेल्या दिसल्या. आता त्यांची शाळा घेण्याची इच्छा मनात दाबावी लागली. अन् त्यांना "ताई द्या ती पिशवी"... ताईंनी पिशवी काय दिली नाही, पण त्यांचा श्वास मोकळा झाल्याचं दिसतं होतं. माझं नि राजूचं प्रोग्रामच चालूच होत. त्यात आता ताई ही बोलू लागल्या. त्यांची भाषा थोडी गावंडळ व वेगळी असल्यानं फारसं समजत नव्हतं पण भिवंडी परिसराबद्दल त्या बोलत होत्या. सगळं हसण्यावारी चालू होत. ताई उतरल्या आणि एक आजोबा बसले. गटारी दिवशी रविवार असताना उपवास धरलेले आजोबा, जे उपवासाला बटाटा वेफर्सही खात नसावेत, असे. त्यांच्या नावानंच उपवास करावा असं माझं नि राजू चं तोंड झालंत. असो, दोन शिव्या वेफर्स बरोबर गिळल्या आणि आता आम्ही पोहोचलो भिवंडी डेपोत. जिथे आमचा मित्र अमित आमची आतुरतेने वाट पाहत होता.
          अमित आणि आमची हि पहिलीच भेट. भेटीचं कारण, अर्थातच... आजचा कार्यक्रमाचा बेत... पहिल्याच भेटीत मन जिंकलं पट्ठ्यानं.. खास दोघांसाठी पावसाळी गणवेश!! मुंबई पासून २तास लांब आल्यावर संबंध तुटलेल्या मुंबईच्या नियमांचा किंचितही विचार न करता आम्ही एकाच गाडीवरून तिघांनी प्रवास सूरु केला. डबल कपड्यांतून अंगावर आदळणारा वारा आणि पावसाची तोंडावर बसणारी चपराक... जबरस्त! पण अमित सुसाट सुटलेला. एका नाक्यावर त्यानं गाडी थांबवली अन् आम्हा नव्या मित्रांना वडापावची ट्रीटही दिली. तिथेच या कार्यक्रमात सहभागी होणारा मित्र आशिष गाडी घेऊन वाट बघत होता. २ तासांचा प्रवास ४ तासांकडे कलटला होता. त्यांच्या संगे आता आम्ही गंतव्य स्थानावर पोहोचलो.


ठिकाण - जुलईपाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तालुका - भिवंडी. आजचा प्रोग्राम, या शाळेतील २० विध्यार्थी आणि जुलईपाडा आणि हाच आजचा गटारीचा बेत.
शाळेपासून २०० मी वर दोनी दुचाकी उभ्या केल्या आणि आम्ही चौघे शाळेकडे निघालो. प्रथमदर्शनी हि शाळा आहे हे मानणं मला नि राजुला जड असावं.
          पावसामुळे उशीरा पोहोचलेल्या आम्हां मित्रांची वाट पाहत असणाऱ्या सरांशी आमची भेट झाली. श्री. साईनाथ दांडेकर, राहणार-जुलईपाडा. सरांनी शाळेचा इतिहास सांगायला सुरुवात केली. तेव्हा लक्षात आलं की, त्यांचं हि शिक्षण याच शाळेतलं. टप्प्या टप्प्यानं त्यांचं शिक्षण ४थी पर्यंत पाड्यात, मग ७वी पर्यंत पारीवली पाडा, मग आणगाव आणि डिग्री साठी आश्रम. असा लढा देत त्यांनी B.ed गाठलं. आणि आजही गावात जर उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर याच प्रक्रियेतून जावं लागतं. असं त्यांच्याकडूनच कळलं. त्यामुळे उच्च शिक्षित विद्यार्थी वर्ग इथे फार तोकडाचं. शिवाय घरची परिस्थिती हालाकीची असल्यानं पालकांचा शिक्षणाप्रती लळा कमीचं.
          मग शाळेची पाहणी करण्यात आली. भितींवर विराजमान छ. शिवाजी महाराज पाझरत्या पाण्याने भिजलेले लक्षात आले. पावसाळ्यात विद्यार्थांसमोरील समस्या महाराजांपर्यंत पोहोचली अन् पर्याय म्हणून दांडेकर सरांनी एक ताडपदरी संपूर्ण शाळेवर पसरली.

 

बाजूलाच एक घड्याळ टांगलेल, ज्याची वेळ पावणे सहा वर येऊन थांबलेली. हि थांबलेली वेळचं पुढे सरकवण हेच या भेटी मागचं कारण.
विद्यार्थांविषयी बोलताना सरांकडून समजलं की, तिथे त्यांच्याबरोबर सुनीता चव्हाण मॅडम गेली ३ वर्षे कार्यरत आहेत. त्यांचा हि शाळेला उत्तम आधार आहे. शासनाकडून विद्यार्थांना पुस्तके व कपडे या व्यतिरिक्त फारशी मदत होत नाही. तर त्यांना वह्या, कंपास, दप्तरे, अशा प्रकारच्या शैक्षणिक साहित्याची व शिक्षणाची आवड निर्माण होऊन ती टिकेल अशा साहित्याची गरज आहे.
एकंदरीत आढावा घेऊन, सरांना आमच्याकडून सांगण्यात आले...
संपूर्ण शाळेच्या विकासाच्या दृष्टीने आपण नक्कीच प्रयत्न करू, त्यासाठी तितका कालावधी हि लागेल. तुमचा पाठिंबा आणि काही गोष्टींचा पाठ पुरावा त्यासाठी महत्वाचा ठरेल.

          एक दिवस पावसाने त्यांच्या पर्यंत पोहचताना इतक्या अडचणी येतात तर त्यांना स्वतःला जगासोबत जोडताना कोणत्या परिस्थितीतून जावे लागत असेल याची कल्पना नक्कीच आपण करू शकाल. मुंबईपासून २/२:३० तासांवर वसलेलं हे गाव म्हणजे निसर्गाची अनमोल भेटच. चारी दिशांना हिरवळ. कुठे उंच डोंगर माथ्यावर ढग आणि पाझरत्या झऱ्याचं मिश्रण... खरंच अतुल्य.
          सरांकडून एकंदर उपक्रमासाठी शुभेच्छा घेऊन आम्ही परतीकडे निघालो. अमितच्या घरी जरा विसावा घेतला. कार्यक्रम उत्तम पार पडला होता. सोबत अमितच्या आईने मटणाची तरी नि भाकर वाढून गटारीही साजरी केली. संगळ्यांची सांगता घेत येताना हि त्याच एनर्जीने आमचा प्रवास सुरु झाला, सोबत नव्या विचारांचा ठेवा घेऊन !!!


           मात्र स्वार्थ दिसला कि माणूस सर्व काही विसरून तेवढ्या मागेच धावतो. मी ही काही अपवाद नाहीच म्हणा याला. आपण एखाद्या हव्याशा गोष्टीत अडकतो आणि सुरु केलेही ती गोष्ट मध्यांतरावरच अडते. दुसऱ्यासाठी जगायचं आणि तसा ध्यास जरी घेतला तरी तो मोहाचा क्षण पदरात पडतो आणि आपण स्वतःसाठी जगू लागतो. आणि मग आपल्या नव्या जगण्यात कुठेतरी त्या जुन्या वाटा लांबल्या जातात. त्यातलीच हि एक वाट. वर्षभरापूर्वी चालायला सुरवात केली, म  कुठेतरी गती मंदावली. आणि आता सर्व काही दुजारून पुन्हा नव्याने धरली, जगदंबच्या "दत्तक", लोकसहभागातून लोककल्याणाकडे या प्रकल्पासोबत.
          (३१ जुलै २०१६ ला सुरु केलेला प्रयत्न पुढे १ मे २०१७ रोजी जगदंबच्या वतीने अस्तित्वात आखण्यात आला, ज्याच्या आखणीत मित्रवर्य प्रणित भोसलेचा उच्चतम सहभाग तर आर्थरोडची आई परिवार यांचे मोलाचे योगदान राहिले)







Saturday, July 1, 2017

प्रतिबिंब


तो आज एकटाच किनाऱ्यावर बसला होता. समुद्रात उसळणाऱ्या लाटांपेक्षा त्याच्या विचाराच्या लाटांची तीव्रता जास्तचं असावी. यापूर्वी मी त्याला अशा अवस्थेत कधीच पाहिल नव्हतं.
          वर्ष झालं. असाचं जगतोय, सुरुवातीला स्वतःची समजूत काढत आणि आता सर्व संपल्यानंतर स्वतःशीच भांडतोय काही महिन्यांपासून. मी सुरुवातीलाच त्याला म्हटलं होत, दूर रहा साऱ्यापासून. तुझ जग वेगळयं. हे सगळ तुझ्यासाठी नाहीय. "प्रेमाचा झरा दुरुनच पाहायला साजरा रे; त्याच्या प्रवाहात जाऊन पाहशील तर दूर ढकलला जाशील", खूप समजावलं होत. अगदी पहिल्याच दिवशी, याच ठिकाणी, याच दिवशी. वर्ष संपल. नातं गोत आपल विश्व हारुन तो ही आज संपल्यात जमा झालाय.
          त्याला पुन्हा आज समजवायचं म्हणजे अवजड शब्दांनी पुन्हा नागडं करून सोडणार तो. वरून मालाचं फालतूचा सल्ला देईल, "नेहमी तू डोक्याने विचार नको करु, मनाच्या भावनांनी बघ, आणि सांग मी चुकलो." अशी कायतरी किचकट भाषा वापरुन नेहमीच माझ्या मेंदूचा फ्यूस उडवतो, पण माझ्या शब्दांनी काय त्याच्या हृदयाचा तिच्या नावाने पडणारा ठोका आजवर थांबला नाही. खर तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं माझ्याकडे. तो चुकला की बरोबर होता माहित नाही पण तो स्वार्थी झाला होता. त्याचाच जाब विचारणारय मी आज त्याला. होऊदे राडा, होऊदे लफडा... पण तो चिडावा, रडावा नि मोकळा व्हावा बसं. पण तो शांत, स्तब्ध, प्रतिउत्तरांचा मारा करत, तिच्यातच  गुंतून राहतो, नेहमीचं!

मी - अजून किती दिवस असाच स्वार्थासाठी जगणारयसं.

तो - तू स्वार्थासाठी म्हणतोस, मी प्रेमासाठी समजतो.

मी - प्रेम, कसलं प्रेम, कुठलं प्रेम. ती जितका वेळ तुझ्या सोबत होती त्यापेक्षा जास्त वेळ तिला सोडून झाला. ती तुझी ना कधी होती ना कधी असणारयं. म काय फायदा असचं तिच्या फोटोशी बोलून, तिच्या आठवणीत हसता हसता डोळयांतून पाणी वाहून, काय भेटणारयं तुला. तिच्यासाठी तू आणखी चार नाती, आपली माणसं सोडून आलासं. काय फायदा झाला तुझा, काय भेटलं?

तो - फायदा! मी कधी फायद्यासाठी जगलो का मित्रा.
 मला काहीचं भेटलं नाही. फारशी अपेक्षा नव्हती पण तीनेही मला जवळ केलचं होतं ना. आपलं मानल होत तिनेही. मला फक्त जाणून घ्यायचा होता तो तिच्या मनातील आमच्या नात्याबद्दलचा जीव्हाळा. 
त्याच प्रयत्नांत एक पाऊल उचलल. का, कस, असा वागलो काही विचार न करता, न समजून घेता ती लांब गेली. उत्तर-प्रतिउत्तर तिला काहीच द्यावं-घ्यावं वाटलं नाही. 
          मात्र जाताना तिच्या स्वप्नाचं दप्तर माझ्याकडेच सोडून गेली. तिच्या स्वप्नाला अस्तित्वाचं रूप नाही देऊ शकलो. ना तिच स्वप्न पूर्ण करता आलं. ना माझं स्वप्न पूर्ण झालं. माझं स्वप्न ती... आणि तिचं स्वप्न...
          तिने एकदा येऊन साऱ्याचा उलघडा पाहून एका नव्या नात्याची नव्याने सुरुवात करावी एवढ्याच स्वार्थी हेतूने वागलो रे. पण तिने कायमची पाठ फिरवली. पण ती कुठेही असली कितीही लांब असली तरी तीच अस्तित्व माझ्यात कायमच असणार. 
          आणि तिच्यासाठी किंवा तिच्यामुळे मी कुठलचं नातं सोडल किंवा तोडल नाही मित्रा.
मनाचे धागे दोरे जोडणारा मी, नाती कशी तोडेण! तिच्यावर जितक मनापासून प्रेम केलं, तितक्याचं प्रेमाने सर्व नाती जपली. मनाच्या खूप जवळची नाती होती ती. काहींनी अगदी लाडवासारखे लाडही पुरविले आजवर. खूप जीव होता त्यांच्यावरही पण त्यांनाही कदाचित तुझ्यासारखंच वाटायचं, कि मी फक्त तिच्यासाठी त्यांच्याशी नातं जपतो. काहींनी तर बोलूनही दाखवलं तीचं हवी म्हणून थांबलास. ति नाही आता सोडून चाललास. पण  पण शेवटी त्यांचीही विचारपद्धत माझ्यापेक्षा वेगळी ठरली. जितकी निखळ नाती मी जपली तितक्याच बोथट मनाला टोचणाऱ्या गोष्टी आल्या समोर. मग कोणावर विश्वास ठेवावा नि कोणाकडे पाठ फिरवावी काहीच कळलं नाही. कोन आपलं कोन परक काहिच कळलं नव्हतं. मरणाच्या उंबरठ्यावर उभ असताना सारी दुनियाच परकी वाटू लागली आणि कोण चूक कोण बरोबर ठरवण्याबदली साऱ्यांशीच दुरावा घेतला. माझीच माणसं माझीच नाती. तोडण्यापेक्षा थोड लांब जाणचं बर होत. लांब असल तरी आजही मी तितक्याच आपुलकीनं जपतो ती नाती. त्यांना माहितही नसेलं पण आजही मी त्या मानलेल्या बंधनांत जगतोय. आणि जगतोय मी येणाऱ्या मरणाच्या प्रतिक्षेत.
आणि मित्रा, स्वार्थीपणा आजवर कशात तरी पाहिला का रे. लहानपनीचा मित्र. तूच काय ते, लंगोटी यार म्हणतोस नं. तू ही असांच विचार केलासं... 

मी - मान्यय तू प्रेमाने केलस सर्वांसाठी. जगलास प्रेमासाठी. पण म आता का मरतोयस प्रत्येक क्षणाला तिच्यासाठी. मान्यय तू स्वार्थी नाहीस. तू प्रेमात पडलास, आवडीनिवडी बदलल्यास, इथंबर ठीक होत... 
पण, दुसऱ्यांना हसवण्यासाठी जगणारा, समोरच्याला दुःखावल तरी स्वतःच्या डोळयांत पाणी आणणारा, हसत खेळत जगणारा बिनधास्त राहणारा, स्वतःच जग विसरुन फक्त आपल्या माणसांसाठी नि माणूसकीसाठी जगणारा तू, प्रेमात पडलास नि हे सगळं बाजूला ठेवून फक्त तिच्यातचं गुंतत गेलास. का???

तो - बाजूला नव्हतं ठेवलं.
तुलाही माहितीयं, माझ जग म्हणजे माझी माणस, माणूसकी नि त्या पलीकडची ही सारी दुनिया.
पण तिला भेटलो नि मला माझही एक जग असावं वाटू लागलं. ज्यात फक्त मी आणि ती असावी. माझाही संसार असावा वाटलं. माझ्यावरही प्रेम करणारी ती माझ्या या जगात माझी बनून यावी  वाटलं. जेव्हा मी सर्वांना जपेन तेव्हा तिने मला जपाव वाटलं नि या स्वप्नाने स्वतःला झोकून दिल तिच्यात. कायमचं!!! 
कदाचित स्वत:साठी जगावं वाटलं, हाच माझा स्वार्थ ठरला.
          तिच्यामुळे पूर्ण झालोे. मला अस्तित्व प्राप्त झाले. स्वतःवर प्रेम करु लागलो. हसू लागलो जगू लागलो. ती गेली नि साऱ्यालाच पूर्णविराम लागला.

मी - पूर्णविराम... मग आता कसली वाट पाहतोयस?

तो - तिच्या पूर्णविरामानंतर  नवी सुरुवात करायचीय. तिच्या सोबतीत नाहीतर आठवणीत. तीचं स्वप्न पूर्ण करायचंय!!

मी - आणि तूझ स्वप्नं?

तो - ...,...,...,...,...,...,

मी - हे कुठे गेलास..... हे......,?????

(एक मोठी लाट आली नि किनाऱ्या लगतच्या पाण्यातील तो गप्प झाला. तिच्यासाठी तर जगतचं होता, आज कळलं तिच्या स्वप्नासाठी जगायचंय, ते पूर्ण करायचंय त्याला. कदाचित त्या स्वप्नानेच ते एकत्र आले होते. कदाचित तेच त्यांना एकत्र आणू शकेल. पण उत्तर देण्याआधीच तो निघून गेला. मी आहे वाट पाहत किनाऱ्यावर. मनातली लाट शांत झाली कि दिसेल तो शांत निथळ पाण्यात.)

-प्रतिबिंब.






Friday, June 23, 2017

ती


'ती' आणि 'मी' कधी वेगळे झालोच नाही. कधी माझ्या मागे... कधी माझ्या पुढे... दिशा फ़क्त बदलायची ती! माझ्या वाटेच्या बाजूने... किरणांच्या सोबतीने... साथ अशी द्यायची, एकटा असलो तरी आधार देऊन थांबायची. लांब पल्ल्याच्या रस्त्यावर हाथ धरून चालायची. इतका जीव लावूनही "तू सोडणार तर नाहीस" असं भाबडे पणानं विचारायची.
           या लांब पल्ल्याच्या वाटेवर खरंच, तिला माहित नव्हतं मी कुठे जातोय. मलाही माहित नव्हतं ती माझ्या सोबतच येतेय... माझ्या मागोमाग तीही पावला पावलावर पाऊल देऊन सोबतच चालतेय, एक न बांधलेलं नातं तीही जपतेय,,, खरंच माहित नव्हतं !! 
           पण का कुणास ठाऊक, इतकी जवळीक साधूनही आम्ही एक नव्हतो. एकमेकांत अडकूनही एकमेकांचे नव्हतो... कारण एवढंच होत, तिने कधीच काही व्यक्त केल नाही. मीही कधी तिला विचारल नाही. विचारण जरा अवघडच होत...

ती जवळ आल्यानं_ लांब जाण्याच्या भीतीनं, काळीज कापत होत...
जवळ आलेली आपली माणस जवळिकीनंच लांब जातात, असं आधीही मनावर कोरल होत...
माहित नव्हतं ती इतकी जवळ का करते...
पण,

अंधारल्या वाटेवर नेहमीच एकट सोडून जाते. 
गरज असताना तीही एकट टाकते, 
जगा सोबत आजकाल ती ही पाठ फिरवते...
विचारलेल्या प्रश्नांवर अंधाराची चादर अलगदचं मग ओढते. 
या नि अशा असंख्य प्रश्नांचं ओझं माझ्यावरचं टाकते... 

काहीतरी आड़ होत, तिच्यात-माझ्यात_ आम्हां दोघांत... 
दुरावा करत होत... 
उत्तरे नसलेल्या प्रश्नान्त दोघांना अडकवत होत...
काय होत ते, इतकं दाटुन येत होत...?
काय होत... जे इतकं गच्च मनात भरल होत ?
काय साठल होत... जे मोकळीक मागत होत ?

... काय होत...  का होत... दोघांतल्या दरीला ते वाढवतच होतं !!
पण ना मला ना तिला हे सार कळतं होत.  
माझ्यापासून तिला दुरावनार....
ते कीर्णाविना मोकळ दाटलं "आभाळ" होत... 
भावनेच्या "मेघांणी" जे साठल होत... 
गच्च जे भरल ते "वर्षा"सार डोळ्यांतून बरसण्यास पाहत होत...
ती नि मी....आम्ही.... न होण्यास कारण होत...
ती आणि मी,
ती... माझी सावली...!!!
माझी असूनही... माझी नसनारी
साथ असूनही... वाट बदलनारी
दाटुन आल... की हाथ झटकनारी
अंधारल्या वाटेवर... मला एकट सोडनारी
ती... माझी सावली...!!!





Thursday, May 11, 2017

प्रेम म्हणजे...

तसा माझा हा तिसरा ब्लॉग. पण पब्लिश करत असलेला पहिलाचं. सुरुवात कशी नि कोणत्या विषयाने करावी कळत नसताना कपाटात जुनी नोट नव्याने सापडावी तसाच काहीसा डोळ्यासमोर आलेला हा लेख. फेब्रुवारी २०१६ च्या दरम्यानचा, आज पुन्हा आठवला. विषय तोच घिसा-पिटा पुराना... प्रेम म्हणजे? 
पण जरा वेगळ्या भाषेत. विज्ञानाच्या भाषेत. 
काही याला अनुभव म्हणतील... काही कल्पना म्हणतील... 
पण आता त्याला एक वैज्ञानिक प्रयोग म्हणून पाहिल्यास वावगं ठरणार नाही. 
मांडण्याचा प्रयत्न केलाय. कृती साभार मांडलीय, आकृती स्वप्नांत पाहून आयुष्यात निष्कर्ष काढण्यास आपण समर्थ आहातच.


प्रेम म्हणजे काय असत???
...... थोड विज्ञानाच्या भाषेत !!!
विज्ञान जगतात आज आपण अव्वल स्थान पटकावलयं. तरीही एका प्रश्नात आपण आजही अडकतोयचं... प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तिने आपल मत मांडलय खर, पण नेमकी त्याची व्याख्या काय हे आजही प्रत्येक जण शोधतोच यं...
शोध जो घ्यायचा तो प्रश्न...
प्रेम म्हणजे काय असत? काय असत??
कुणी म्हणत...
प्रेम म्हणजे प्रेम असत
तुमच आमच सेम असत....
सेम अस्त तर मग, एकीकडे बेधूंद हास्य - फुलांचा वर्षाव, तर दुजिकडे फाटक आभाळ नि - डोळ्यांत ओघळत पाणी.. अस का बरं !!!
काही म्हणतात,
प्रेम म्हणजे वारा, प्रेम म्हणजे वाहता झरा,
प्रेम म्हणजे चाँद, प्रेम म्हणजे चांदनी,
प्रेम म्हणजे श्वास, प्रेम म्हणजे विश्वास,
प्रेम म्हणजे आई, प्रेम म्हणजे बाबा,
प्रेम म्हणजे मित्र, प्रेम म्हणजे 'तू'...
सगळ खरं,,
पण तरी प्रेम म्हणजे काय...???
................
मग आता विज्ञानं अन् प्रेमाचा काय संबंध... तर तो असा कि बरेचसे वैज्ञानिक सिद्धांत प्रेमाला लागू होतात. त्यामुळे विज्ञानच, प्रेम म्हणजे काय? हे अधिक सोप्या भाषेत नि शोधाला पूरक अस उत्तर देईल....
बघा, सफरचंद पडलं नि त्यातून कळल की गुरुत्वाकर्षण भी कायतरी असतं, न्यूटन महाराजांची कृपा.. तसचं हे "प्रेमाकर्षण" !!
'ति'ला 'त्या'चं... नि 'त्या'ला 'ति'च्... हे घर्षण प्रक्रिये पूर्वीच आकर्षण म्हंजेच् प्रेम नव्हे का!
आता या सिद्धांताचा अनुभव सफरचंदावाणी पडलेल्यांणा (प्रेमात) असलचं... जेव्हा 'ती' समोर नसते नि तिला पाहण्यास नजर आसुसते... जेव्हा 'ती'च्या आवाजाच्या मोहाने मनाला अस्वस्थता जाणवते... आणि असचं बरचं काही...
तू जवळ असलीस की
फारस काही वाटत नाही,
समोर नसलीस की मात्र
तुझ्याशिवाय रहावत नाही...

आकर्षण#गुरुत्वाकर्षण#प्रेमाकर्षण#

................
आणि प्रेमास सर्वोत्तम लागु होणारा नियम म्हणजे चुंबकीय शक्ति (चुंबनाची नव्हे, चुंबकाची)
म्हणजे दोन चुंबक एकत्र ठेवले अन् दोघांचे positive पोल्स समोरासमोर घेतले तर ते एकमेकांस दूर ढकलतात... उलट एक positive नि एक negative पोल् ठेवल्यास ते एकमेकांस झपकन चिपकतात...
म्हणजे कस, दोन सम स्वभावी किंवा समान दर्जाच्या व्यक्तींच् कधी जुळतचं नाय.. पण प्लस-माईनस स्वभावतले, उंच-ठेंगण्या आकाराचे  कधी कसे एकमेकांत गुंततात... नि मग त्यांच्यावर चुंबकीय लहरी इतक्या प्रभावी होतात की ते एका मागे एक आपुआप खेचले जातात... अन् त्यांच्या भोवती अस काही चुंबकीय क्षेत्र निर्माण होत की, त्यातून बाहेर पड़ण दोघांना अवघड जात.. नि मग हे प्रेमी युगुल कधी हीर-रांझा, रोमियो-जूलिएट, लैला-मजनू सारख्या नावांनी इतिहासात कोरले जातात...  
चुंबकीय शक्ति बिक्ति नि अस बरचं काही...
ओढ तुझी आज शांत झोपू देत नाही,
स्वप्नांत ही तुला भेटण्या मन वाट पाहि...

पॉसिटीव्ह-निगेटिव्ह#चुंबकीय शक्ती#प्रेमओढ#

...............
विज्ञानाच्या रसायन प्रक्रियेतबी प्रेम मोडतयचं की... h2O... पाणी...
हायड्रोजन नि ऑक्सिजन एकत्र येऊन एकरूप होऊन नवी उत्पत्ति पाणी...
पण त्या हायड्रोजनला द्रवरूप होण्यासाठी लागतो तो ऑक्सिजन... त्याची जोड,, त्याची साथ.. त्याला हव्या त्या प्रमाणात भेटली की पाणीच पाणी...
आता हे रसायन प्रेमात अस मिसळलयं की, प्रेम जुळल तर पाणीच नि बिघडल तरी पाणीचं... यात h2 म्हणजे 'तो'... ऑक्सिजन-'O'- श्वास म्हणजे 'ती', जी नकळत श्वास बनते.. अन् आरपार काळजाच्या ठोक्याला भिडून येते.. श्वास बनून जगण-मरण बनून जाते.. अन् लांब गेली की...
फार त्रास नाही होत...
श्वास, अडकतोय फक्त जरासा...
दुखत नाहिय मन...
ठोक्यांचा वेग, वाढलाय फक्त जरासा...
रडत नाहिय मी...
डोळा, पानवलाय फक्त जरासा...

h20#तो-ती#पानी-पाणी#

................
म्हणजे प्राचीन काळापासून चालत आलेला हा प्रश्न विज्ञानानचं सुटनार हे खरं...
त्या वाऱ्याच्या स्पर्शात... वाहत्या पाण्याच्या प्रवाहात... त्या अर्ध चंद्राच्या चाँदण्यात... त्या नाजुक फुलाच्या सुगंधात... त्या एका गोड आवाजात... नाही जाणवत आजच्या पिढीला प्रेम... म्हणून तर त्यांचा प्रश्न अनुत्तीर्णचं, प्रेम म्हणजे काय!
त्यामुळं पुढच्या पिढीला प्रेम म्हणजे काय हे विज्ञानातूनच शिकवाव लागेल..
प्रेमाकर्षण#चुंबकीय शक्ति#पाणी
आणि त्याची व्याख्या...
" x आणि y जिवाणु एकमेकांस 'प्रेमाकर्षित' करुण त्यांच्या भोवती निर्माण झालेल्या 'चुंबकीय लहरिंमुळे' x-y मधि 'रासायनिक अभिक्रिया' होऊन ते एकरूप होण्याची नवी उत्पत्ति म्हणजे प्रेम"...
कदाचित पुढच्या काही वर्षात विज्ञानात असेलच प्रेमाचा धड़ा नि असेल त्याची अशीच एखादी व्याख्या... पुढल्या पिढीसाठी...!!!