Sunday, July 23, 2017

गड गड गटारी !!

गटारीचा दिवस. प्रोग्रामची तयारी करायची म्हणून मी आदल्या दिवशी अर्धा दिवस भरून कामावरनं निघणार होतो. पण तब्बेत जरा डाऊन होती त्यामुळे निघणं भाग पडल्यानं निघालो. आमच्या लाडक्या मॅनेजरना गटारीसाठी जातोय असं वाटत असतानाही देवमाणसाने सोडलं बाबा.
           दुसरा दिवस उजाडला, गटारीचा. मोहीम आखण्यात आली. मार्गक्रमण सुरु झाले. छान पाऊस पडत होता. चांगलाच जोर धरला होता आज पावसानेही. अशाच थंड आणि सुंदर वातावरणात आजची  सकाळ झालीच आमची. दिवस तसा गटारीचा. रात्र मोठी असणार, म्हणून दिवस थोडा उशिराच सुरु झाला. आणि त्यात तो रविवार म्हणजे मुबंईकरांचा आरामाचाच दिवस.
पण आमचा बेत काही वेगळा होता. गटारी निमित्त जरा बाहेर जावं म्हटलं प्रोग्राम तसा उत्तमचं आखलेला. तयारी ही बऱ्याच दिवसांची. आता फक्त ठिकाणावर पोचायची देरी अन् काम फत्ते.
           ठिकाण तसं जवळचचं.. मुंबईपासून अवघ्या २ तासांवर. आता प्रोग्राम ठरलाय तर जल्लोष व्हनारचं. मग तयारीसाठी मी नि राजू पुढे निघालो. सकाळी १०... १०:१५ च्या कल्याण लोकलने चिंचपोकळी स्टेशनवरून आमचा प्रवास सुरु झाला. धावणाऱ्या इमारती पावसात भिजताना रावस दिसत होत्या. आज त्यांच्या माथ्यावरही गटारीच्या जंगी सोयी होत्याचं. पाऊस वाढला, सारं दृष्य बंद खिडकीतून आता धूसर झालं. ठाण्याला पोहचायच होत. आता राजू नि माझ्या गप्पा सुरु झाल्या. गप्पा कसल्या गटारीच प्लानिंगच ते. कल्पना फारशी नव्हती पण जरा धाकधुकं होतीच. शुभ कार्यात अडथळा येणारचं नं.
ऐन मुलुंड स्थानकावर बंद ट्रेनचे स्पीकर बॉक्स चालू झाले अन् "कृपया ध्यान दे, भारी बारीश के कारण पटरी पर पाणी जमा होणे से सभी गाडीया रोक दिई गई है". दोघांच्या तोंडून शिवी निघाली जी बाजूच्या कानात न जाता एकमेकांना कळाली.
            आता हा प्रवास फारसा सरळ दिसत नव्हता. पुन्हा मागे फिरणं मला मान्य नव्हतं तस त्याच्याही नजरेत नव्हतं. पुढे जावं तर पावसाचं प्रमाण पाहता रात्री पुन्हा परतण्याची हमी नव्हती. मुळात गंतव्य स्थानावर पोहचू का ? असा अवघड प्रश्नही समोर ठाकलेला.
          निर्णय झाला. मागे हटायचं नाही. मग सारा प्रोग्राम ज्याच्या मार्गदर्शनाखाली ठरला तो आमचा मित्र अमित जाधव, आणगाव, भिवंडी. याचे सहाय्य घेणे नक्कीच गरजेचे होते. त्याच्या आदेशानुसार आम्ही मुलुंड वरून ठाण्यातील तीनहात नाक्याच्या दिशेनं प्रवास सुरु केला. स्टेशन बाहेर पाणी रिक्षाची चाक नसावीत इतकं जमलं होत. आणि त्यातच आजू बाजूचे धंदे जलमय झालेले. असो आम्हाला काय देणं घेणं नव्हतंच. ना रेल्वे सुरळीत चालली त्याच्याशी... ना स्टेशन बाहेर साचलेल्या पाण्याशी, ना त्या पाण्यावर तरंगणाऱ्या फाटक्या गरीब धंदेवाल्यांशी... आमचं ध्येय एकचं... मिशन गटारी !!
           स्टेशन बाहेरचं एक मुलगा भेटला. इथून ठाण्याला कसं जायचं... राजू सुरु झाला, घरी जायचंय कि घरातून निघालाय? मुलगा..घरीच! मग एवढ्या सकाळी कुठं गेलता पावसात..
मुलाचं उत्तर.. क्लासला...
एवढ्या पावसात ... क्लासला!!!
पोरगं जरा लाजलचं...
पोराची शाळा घेत प्रवास सुरु झाला. तोवर ३हात नाका आला. मुलगा कॉमर्स म्हणजे आमच्यासारखंच भविष्य उजळलेला, cpt ची तयारी करतोय असं समजलं, all the best स्वीकारून bye करून त्याच्या वाटेला निघाला..
तुर्ताच आम्ही पूर्व परीक्षेतून सुटलो. आता आम्ही माजीवड्याकडे निघालो. रिक्षा नि सोबतचे प्रवासी बदलले. आम्ही दोघे तेच आमच्याच नशेतले. हा प्रवास थोडक्यातच आवरला.
आता फायनल ची तयारी. आता भिवंडीच्या दिशेने चालायचं होत. बस रिक्षाची चौकशी करत एका रिक्षाने सहारा दिलाच. २ प्रवासी त्याला कमी असावेत, तो आणखी दोनची वाट पाहत थांबला. एक तरुण पुढे त्याच्याच बाजूला बसला. आणि एक नवविवाहित स्त्री आमच्या बाजूला मागे बसली. त्यांना कदाचित uncomfortable वाटत असावं, अश्या त्या बसलेल्या दिसल्या. आता त्यांची शाळा घेण्याची इच्छा मनात दाबावी लागली. अन् त्यांना "ताई द्या ती पिशवी"... ताईंनी पिशवी काय दिली नाही, पण त्यांचा श्वास मोकळा झाल्याचं दिसतं होतं. माझं नि राजूचं प्रोग्रामच चालूच होत. त्यात आता ताई ही बोलू लागल्या. त्यांची भाषा थोडी गावंडळ व वेगळी असल्यानं फारसं समजत नव्हतं पण भिवंडी परिसराबद्दल त्या बोलत होत्या. सगळं हसण्यावारी चालू होत. ताई उतरल्या आणि एक आजोबा बसले. गटारी दिवशी रविवार असताना उपवास धरलेले आजोबा, जे उपवासाला बटाटा वेफर्सही खात नसावेत, असे. त्यांच्या नावानंच उपवास करावा असं माझं नि राजू चं तोंड झालंत. असो, दोन शिव्या वेफर्स बरोबर गिळल्या आणि आता आम्ही पोहोचलो भिवंडी डेपोत. जिथे आमचा मित्र अमित आमची आतुरतेने वाट पाहत होता.
          अमित आणि आमची हि पहिलीच भेट. भेटीचं कारण, अर्थातच... आजचा कार्यक्रमाचा बेत... पहिल्याच भेटीत मन जिंकलं पट्ठ्यानं.. खास दोघांसाठी पावसाळी गणवेश!! मुंबई पासून २तास लांब आल्यावर संबंध तुटलेल्या मुंबईच्या नियमांचा किंचितही विचार न करता आम्ही एकाच गाडीवरून तिघांनी प्रवास सूरु केला. डबल कपड्यांतून अंगावर आदळणारा वारा आणि पावसाची तोंडावर बसणारी चपराक... जबरस्त! पण अमित सुसाट सुटलेला. एका नाक्यावर त्यानं गाडी थांबवली अन् आम्हा नव्या मित्रांना वडापावची ट्रीटही दिली. तिथेच या कार्यक्रमात सहभागी होणारा मित्र आशिष गाडी घेऊन वाट बघत होता. २ तासांचा प्रवास ४ तासांकडे कलटला होता. त्यांच्या संगे आता आम्ही गंतव्य स्थानावर पोहोचलो.


ठिकाण - जुलईपाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तालुका - भिवंडी. आजचा प्रोग्राम, या शाळेतील २० विध्यार्थी आणि जुलईपाडा आणि हाच आजचा गटारीचा बेत.
शाळेपासून २०० मी वर दोनी दुचाकी उभ्या केल्या आणि आम्ही चौघे शाळेकडे निघालो. प्रथमदर्शनी हि शाळा आहे हे मानणं मला नि राजुला जड असावं.
          पावसामुळे उशीरा पोहोचलेल्या आम्हां मित्रांची वाट पाहत असणाऱ्या सरांशी आमची भेट झाली. श्री. साईनाथ दांडेकर, राहणार-जुलईपाडा. सरांनी शाळेचा इतिहास सांगायला सुरुवात केली. तेव्हा लक्षात आलं की, त्यांचं हि शिक्षण याच शाळेतलं. टप्प्या टप्प्यानं त्यांचं शिक्षण ४थी पर्यंत पाड्यात, मग ७वी पर्यंत पारीवली पाडा, मग आणगाव आणि डिग्री साठी आश्रम. असा लढा देत त्यांनी B.ed गाठलं. आणि आजही गावात जर उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर याच प्रक्रियेतून जावं लागतं. असं त्यांच्याकडूनच कळलं. त्यामुळे उच्च शिक्षित विद्यार्थी वर्ग इथे फार तोकडाचं. शिवाय घरची परिस्थिती हालाकीची असल्यानं पालकांचा शिक्षणाप्रती लळा कमीचं.
          मग शाळेची पाहणी करण्यात आली. भितींवर विराजमान छ. शिवाजी महाराज पाझरत्या पाण्याने भिजलेले लक्षात आले. पावसाळ्यात विद्यार्थांसमोरील समस्या महाराजांपर्यंत पोहोचली अन् पर्याय म्हणून दांडेकर सरांनी एक ताडपदरी संपूर्ण शाळेवर पसरली.

 

बाजूलाच एक घड्याळ टांगलेल, ज्याची वेळ पावणे सहा वर येऊन थांबलेली. हि थांबलेली वेळचं पुढे सरकवण हेच या भेटी मागचं कारण.
विद्यार्थांविषयी बोलताना सरांकडून समजलं की, तिथे त्यांच्याबरोबर सुनीता चव्हाण मॅडम गेली ३ वर्षे कार्यरत आहेत. त्यांचा हि शाळेला उत्तम आधार आहे. शासनाकडून विद्यार्थांना पुस्तके व कपडे या व्यतिरिक्त फारशी मदत होत नाही. तर त्यांना वह्या, कंपास, दप्तरे, अशा प्रकारच्या शैक्षणिक साहित्याची व शिक्षणाची आवड निर्माण होऊन ती टिकेल अशा साहित्याची गरज आहे.
एकंदरीत आढावा घेऊन, सरांना आमच्याकडून सांगण्यात आले...
संपूर्ण शाळेच्या विकासाच्या दृष्टीने आपण नक्कीच प्रयत्न करू, त्यासाठी तितका कालावधी हि लागेल. तुमचा पाठिंबा आणि काही गोष्टींचा पाठ पुरावा त्यासाठी महत्वाचा ठरेल.

          एक दिवस पावसाने त्यांच्या पर्यंत पोहचताना इतक्या अडचणी येतात तर त्यांना स्वतःला जगासोबत जोडताना कोणत्या परिस्थितीतून जावे लागत असेल याची कल्पना नक्कीच आपण करू शकाल. मुंबईपासून २/२:३० तासांवर वसलेलं हे गाव म्हणजे निसर्गाची अनमोल भेटच. चारी दिशांना हिरवळ. कुठे उंच डोंगर माथ्यावर ढग आणि पाझरत्या झऱ्याचं मिश्रण... खरंच अतुल्य.
          सरांकडून एकंदर उपक्रमासाठी शुभेच्छा घेऊन आम्ही परतीकडे निघालो. अमितच्या घरी जरा विसावा घेतला. कार्यक्रम उत्तम पार पडला होता. सोबत अमितच्या आईने मटणाची तरी नि भाकर वाढून गटारीही साजरी केली. संगळ्यांची सांगता घेत येताना हि त्याच एनर्जीने आमचा प्रवास सुरु झाला, सोबत नव्या विचारांचा ठेवा घेऊन !!!


           मात्र स्वार्थ दिसला कि माणूस सर्व काही विसरून तेवढ्या मागेच धावतो. मी ही काही अपवाद नाहीच म्हणा याला. आपण एखाद्या हव्याशा गोष्टीत अडकतो आणि सुरु केलेही ती गोष्ट मध्यांतरावरच अडते. दुसऱ्यासाठी जगायचं आणि तसा ध्यास जरी घेतला तरी तो मोहाचा क्षण पदरात पडतो आणि आपण स्वतःसाठी जगू लागतो. आणि मग आपल्या नव्या जगण्यात कुठेतरी त्या जुन्या वाटा लांबल्या जातात. त्यातलीच हि एक वाट. वर्षभरापूर्वी चालायला सुरवात केली, म  कुठेतरी गती मंदावली. आणि आता सर्व काही दुजारून पुन्हा नव्याने धरली, जगदंबच्या "दत्तक", लोकसहभागातून लोककल्याणाकडे या प्रकल्पासोबत.
          (३१ जुलै २०१६ ला सुरु केलेला प्रयत्न पुढे १ मे २०१७ रोजी जगदंबच्या वतीने अस्तित्वात आखण्यात आला, ज्याच्या आखणीत मित्रवर्य प्रणित भोसलेचा उच्चतम सहभाग तर आर्थरोडची आई परिवार यांचे मोलाचे योगदान राहिले)







No comments:

Post a Comment