Monday, November 26, 2018

घटस्फोट...(शेवटचा अर्धा तास)

आमच्यातील वाद आता कायमचा संपला होता. अर्ध्या तासात कोर्टाकडून आदेश येईल आणि आम्ही...


"तू नेहमीच अस करतोयस. तुझा प्रॉब्लेम काय नेमका कळत नाहीय मला. लग्न झाल्यापासून मला विकत घेतल्यासारखा मालकी हक्क दाखवतोयस. माझं स्वातंत्र्य, माझं फ्रीडम, माझी लाईफ स्टाईल सगळं हिरावून घेतलयस तू. बांधून ठेवलायस मला. बस आता. मला माझं स्वातंत्र्य परत हवंय. I want Divorce."
त्याची पटकन मान माझ्याकडे फिरली. होकारार्थी मान हलवून तो घराबाहेर निघून गेला. मी बोलताना कसलाही विचार केला नाही. बस माझ्या डोक्यात संताप होता. मनात राग होता. जिभेवर ताबा नव्हता. शब्द फेकत होती मी फक्त त्याच्या दिशेने. मी दारूच्या नशेत होते. पण तो काहीच का नाही बोलला. आज त्याने ना वाद घातला ना आपली बाजू मांडली. माझ्या निर्णयावर फक्त शिक्कामोर्तब करून निघून गेला.

श्री च्या बड्डे दिवशीचा वाद आणि आमचं बोलणं कदाचीत शेवटचं. आम्ही पार्टीहून आलो आणि त्याने घरात तमाशा केला.
"तुला कितीवेळा सांगितलं हे असले कपडे घालू नको, तुला सांगितलेल कळत नाही".
"का काय वाईट आहे या कपड्यात, कोणी घालत नाहीत का वन पीस किंवा वेस्टर्न ड्रेसेस. मी घातला तर काय बिघडलं आणि यापूर्वी कधी घातला नव्हता का? लग्नाआधी घातला नव्हता का?
"कपडे घालण्याचा किंवा तुझ्या आवडीनिवडीचा मला काही प्रॉब्लेम नाहीय. पण कुठे कस राहावं याचं भान विसरलीयस तू. तुझी आवड निवड आहे; मान्य य ना मला आणि ती जप तू, पण ते माझ्याजवळ किंवा जिथे आपली माणस असतील तिथे. चार चौघात आवड निवड नाही संस्कार आणि चारित्र्याच्या दृष्टीने पाहिलं जातं."
"वाह... लोकांची ही भीती तुला कधीपासून वाटू लागली रे. बोलणारे बोलणारच पण तुही त्यांच्यासारखा वागशील का? लग्नाआधी तरी तुला या गोष्टीचा प्रॉब्लेम नव्हता. एका मंगळसूत्राने इतका काय फरक पडला."


"खूप फरक पडतो मेघना! खूप फरक पडतो. हा फरकच तुला समजत नाहीय, म्हणून आज ही वेळ आलीय.
चार चौघात जिथे वेगवेगळी नाती माणसं एकत्र येतात तिथे तुझ्या फ्रँकली बोलण्याला तुझा उद्धटपणा समजला जातो. मॉडर्न कल्चर नुसार वागण्याला चारित्र्यावर प्रश्न केला जातो.
बोलणारे बोलतील... तुझं खाणं... पिनं... बोलणं... त्यांच्यापुढ्यात राहणं या प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं बारीक लक्ष असत... पण तुला काहीच फरक पडत नाही. पण मला पडतो;
कारण तुझ्या फ्रँकली वागण्याला आणि चांगुलपणाला समोर वाह वाह करणारे तुझ्या मागे जेव्हा तुझी निंदा करतात.. तुला उद्धट म्हणून हिनवतात... त्याचा या कडू शब्दांचा मला फरक पडतो...

जेव्हा तू मॉडर्न विचारांनी त्यांना समोर जातेस आणि लोक पुढ्यात कौतुक करून मागे तेच लोक तुझ्या पाठीवर तुझ्या आईवडिलांचे संस्कार काढतात... त्याचा मला फरक पडतो...

जेव्हा तुला मॉडर्न लूक मध्ये बघून ब्युटीफुल, सुंदर म्हणणारे तुझ्या अर्धनग्न छाताडावर वाकडी नजर फिरवतात...
तू पाठ फिरवल्यावर त्याच तुझ्या अंगावरच्या तिळाबद्दल गॉसिप करतात...
त्यांच्या या वाकड्या नजरेचा मला मला फरक पडतो...
फरक पडतो मला...
तुम्हा बायकांना रूपाबद्दल, सुंदरतेबद्दल कौतुक ऐकायला आवडत म्हणून हा नटा पटा ना... मग आपल्या दोन चार माणसापर्यंत हरकत नाही... पण जगासमोर का? त्यांच्या कौतुकाची भूक का?
या सगळ्याचा तुला नाही ग पण मला त्रास होतो, मला फरक पडतो. कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर. तुझ्याबद्दल एकजरी चुकीची गोष्ट कानावर पडली.. तरी मला त्रास होतो... मला फरक पडतो कारण तू माझी आहेस आणि तुझ्याबद्दल अस ऐकणं काळजाला भोकं पाडून जात. तुझ्याबद्दल लोकांच्या तोंडून वाईट नाही ऐकू शकत मी. तुझी निंदा नालस्ती नाही सहन होत. तुला कोणी वाईट समजावं अस नाही वाटत मला. म्हणून फरक पडतो मला...
पण तुला काहीच फरक पडत नाही याचा, कळलं मला...
आणि हो मी आजही तोच आहे जसा होतो तसा तुझाच. लग्नाआधीही आणि नंतरही. थोडी मागे जाऊन आपलं नातं पाहिलस तर उत्तरं तुलाच भेटतील..."
"तुला त्रास होतो, तुला फरक पडतो मग सोडून का देत नाहीस मला. माझा लाईफची वाट लावलीयस तू. बदलला नाही म्हणतोस बघ हा तुझ्यातला बदल. तू असा नव्हतास रोशन. कोणत्या काळात जगतोयस, विचार बदल तुझे, मूर्खाचा बाजार लावलाय सगळा"
माझी चिडचिड आणि संतापलेली मी माझा माझ्यावरच ताबा नव्हता. विस्तवावर पाय ठेऊन आतल्या आत जळावं तस मी नशेत जळून निघाले होते. त्याने सांगितलेल्या चांगल्या गोष्टीही मला शिव्या वाटत होत्या. त्याचं माझ्यावरचं प्रेम आजही तितकंच आहे आणि त्याच प्रेमापोटी आणि काळजी पोटी तो नेहमी मला सांभाळून घेतो. मी अशी वेडी वाकडी असताना माझी प्रत्येक बाजू सावरतो. समजून घेतो. समजून सांगतो पण मी आजही तशीच पहिल्यासारखी बिनधास्त बेफिकीर. आणि त्याने खरं तर मला कधी अडवलं ही नाही. पण मागच्या महिन्यात श्रीच्या बड्डे दिवशी रात्रभर झालेला हा वाद आमच्यातला शेवटचा. आणि कदाचित तो संवाद ही शेवटचाच!

मात्र आठवड्याभरापूर्वी झालेल्या एकमुखी वादात त्याने हार मानली. त्याची काळजी आणि प्रेम कदाचित दिसून ही समजत नव्हतं. आणि तो निःशब्द झाला. मी दारूच्या नशेत होते. मला भान नव्हतं. त्याला घालून पाडून बोलले आणि त्याच्यावरच आरोप केला; माझं स्वातंत्र्य हिरावण्याचा. त्याने फक्त त्यावर होकारार्थी मान डोलावली आणि म्हणाला तुला सोड हवी ना.
ठिकय, उद्या साइन केलेले डिओस पेपर पोहचतील तुझ्याजवळ.
आणि निघून गेला. सकाळी पेपर माझ्याकडे होते.

आज आठवडा झाला या गोष्टीला. मला खरंच समजत नाहीय मी काय केलं कस वागले. आज माझा संसार मोडकळीस आलाय. त्याच्याशिवाय हा आठवडाच मला जगणं कठीण झालं होतं. मी पुढे कशी जगू त्याच्याशिवाय. मला गरज होती त्या ठिकाणी माझं अस कुणीच नसताना प्रत्येक गोष्टीत तो होता माझ्यासोबत. त्याची हीच काळजी, हेच प्रेम, समजूतदारपणा पाहून मी त्याच्या प्रेमात पडले होते आणि त्याच प्रेमाला मी बंधन समजून, ओव्हर पझेसिव्ह समजून त्याला दुखावलं. त्याने मला खरंच बंधनात ठेवलेलं का? मी स्वातंत्र्य आणि मर्यादा समजून घेण्यात चुकले तर नाही ना?


पण लग्नापूर्वी हे अस नव्हतं. असं ही मला वाटत होतं.
मला अजून आठवतंय पिकनिकला गेल्यावर कधीही ड्रिंक न करणारा हा माझ्या आग्रहाखातर पहिल्यांदा प्यायला होता. त्यानंतर पुनः त्याला नको वाटलं ड्रिंक. पण त्याने मला तर कधीच अडवलं नाही. फक्त त्या रात्री काय झालं आठवत नाही, सगळ्याग्रुप सोबत होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो एवढंच म्हणाला आता जेव्हा कधी हवी असेल फक्त माझ्यासोबत किंवा मी सोबत असेन तेव्हाच ड्रिंक कर. पण नको म्हणाला नव्हता.
कधीतरी गंमत म्हणून सिगारेटचा धूर ही काढला होता. तेव्हा तर उलट मला एकटीला कॉलेजच्या गच्चीवर इतकं रोमँटिकली उचलून नेलं होत आणि एक पॅकेटच हातावर ठेवलं होतं, घे फुक.
क्वचित तिथेच त्या सोबत काढला धूर दोघांनी. पण तेव्हा ही ना-नको-नाही काहीच नव्हतं.
त्याला मला साडीत पाहायला फार आवडत. साधं सरळ पंजाबी ड्रेस, मोकळे केस, कपाळावर बारीकशी टिकली अस कधी पुढ्यात आलं की एकटक वेड्यासारखा बघत राहायचा. पण त्याची आवड त्याने माझ्यावर कधीच लादली नव्हती. ना कधी कॅज्युअल घालण्यापासून अडवलं, ना मला हवे तसं वेस्टर्न ड्रेसेससाठी अडवलं. फक्त कधी कधी काही ठिकाणी किंवा विशेष एखाद्या दिवशी काही असेल तर आधीच सांगायचा. आज तो ड्रेस घाल वगैरे. मला ही आवडायचं त्याच्या पसंतीनुसार कधीतरी कडपे घालून वावरायला.
लग्नाआधी इतकं समजून घ्यायचा मग आता का असा वागतो. त्यावेळी मला दिलेलं स्वातंत्र्य तो अस कस हिरावून घेतोय. त्यावेळी प्रत्येक गोष्टीत तो २४ तास माझ्यासोबत असायचा...
प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीत सोबत असायचा...
सोबत असायचा.... (अचानक चटका बसल्यासारखे सगळे विचार थांबले... एकच शब्द जिभेवर राहिला... सोबत असायचा)
तो सोबत होता. प्रत्येक वेळी. मी चूक केली तेव्हा मला सावरायला. ती सुधारयला. मी माझ्या नशेत असताना माझी काळजी घ्यायला. त्याने मला कधीच अडवलं नाही पण कधीच काही वाईट परिणाम नको म्हणून एकटही सोडलं नाही. त्याने माझ्या नकळत माझ्या मर्यादा कित्येक वर्षे जपल्या. आणि त्या मर्यादांना बंधनं समजून त्यावरच स्वातंत्र्य हिरावल्याचा आरोप करून त्याच्या प्रेमाचा अपमान केला.
मी चुकले. आज नाही नेहमीच. पण नेहमी सारख त्याने समजवल का नाही यावेळी. तो गाजवत असलेला हक्क आणि बंधन समजून घेता आल नाही मला. आणि माझं स्वातंत्र्य आणि मर्यादा यातला फरक ही नाही जपता आला.
मी ईथे कोर्टाबाहेर बसून आता विचार करतेय. स्वतःच्या चुकांचे पहाडे मोजतेय. माझ्या डाव्या बाजूला एक दरवाजाय जिथे न्यायाधीश बसलेत आमच्या संसाराची पत्रावळी वाचत. आणि उजवीकडे एक ज्या पलीकडे एखाद्या किनाऱ्यावर बसून तो लाटांशी बोलत असणार.
(मोठी घंटा वाजते. केससाठी आत बोलावणं येतं)

 आणि  आमच्यातील वाद आता कायमचा संपला होता. अर्ध्या तासात कोर्टाकडून आदेश येईल आणि आम्ही...
दोन मार्ग. एक निर्णय.
आणि शेवटचा अर्धा तास!

- रोh@nj



14 comments:

  1. खुप सुंदर लिहिले आहे वास्तविक आहे.

    ReplyDelete
  2. Khup chukliy ti tila tyache prem nahi kalal

    ReplyDelete
    Replies
    1. हो, अशा चुका टाळायला हव्यात!

      Delete
  3. Chan aahe khup bt hyach solution kay...?

    ReplyDelete
    Replies
    1. सोल्युशन निघणं कठीण असतं, त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी घेतली तर उत्तम. आणि ते तेव्हा शक्य आहे जेव्हा दोन जीव एकमेकांसारखे होण्याचा प्रयत्न सोडून एकमेकांना समजून घेऊन संसार करतील!

      Delete
  4. Actually ...हा विषय खूप गंभीर आहे..फक्त विश्वास समंजस पणाची गरज आहे ...एकतर्फी निर्णय घेण चूकीच आहे..आणि दोघांमधे कूठे चूकतय याचा शांतपणे विचार करण गरजेच आहे...कारण लग्न हे दोन जिवांचा एक जिव बनवते..त्यामूळे एकतर्फी विचार चूकीचा आहे.

    ReplyDelete
  5. रोहन खूप छान लिहिलं आहेस... एकतर्फी बाजू मांडण्याचा प्रयत्न केलास.... रोशनचेही विचार येऊ देत पुढील ब्लॉगमधे ...

    शुभेच्छा तुला ..

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद००० नक्कीच येतील !

      Delete