Monday, August 16, 2021

आत्महत्या शेवटचा मार्ग नाही, पण.....

 आत्महत्या शेवटचा मार्ग नाही, पण.....

आत्महत्या हा आजच्या घडीला लहानापासून ज्येष्ठांपर्यंत चर्चेचा विषय झालेला आहे. अगदी १२-१५ वर्षांच्या लहानग्यापासून मोठ्या थोरापर्यंत, विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत तर गरीबापासून फिल्म स्टार पर्यंत अशा अनेक घटना आपण ऐकल्या, पाहिल्या आहेत. अगदी एखाद्या संसर्गजन्य आजारा सारखाचं याचा प्रादुर्भाव वाढला आहे. महत्वाचं म्हणजे या आजारावर उपचारात्मक औषध कामी पडत नाही, कारण याचा रुग्ण शिल्लक राहिलेला नसतो. पण उपाययोजनात्मक औषध यावर नक्कीच काम करू शकत.

आयुष्य बहुदा ४ स्तंभांवर उभ असत. पहिला स्तंभ घर. दुसरा स्तंभ संसार. तिसरा स्तंभ करियर आणि चौथा स्तंभ आत्मविश्वास.

यातील पहिले तीन स्तंभ त्या प्रत्येकाचं वेगळं अस्तित्व आहे, वेगळेपणा आहे आणि त्यातला एक जरी स्तंभ हलला तरी चौथा स्तंभ जो आयुष्यात खूपच महत्वाचा असतो तो कोसळतो.

थोडक्यात या 3 पैकी एक स्तंभ डगमगतो आणि चौथा स्तंभ कोसळतो. विचारधारा बदलू लागते, सगळे दरवाजे बंद झाल्याचं जाणवतं. हृदयाचे ठोके स्पीड पकडतात, डोकं जड होत, सगळी नकारात्मकता एकवटते, असंख्य आवाज प्रश्न बनून कानात वाजू लागतात आणि एकसात आवाज देतात संपव स्वतःला, मोकळं कर, आत्महत्या कर!

यावर येऊन सगळं थांबत आणि ती व्यक्ती हा शेवटचा मार्ग म्हणून चालू लागते. याला काही लोक डिप्रेशनच शेवटचं टोक असही म्हणतात तर काही लोक त्रासातून सुटला असंही म्हणतात. उपचारात्मक पद्धतीने यावर काही करणं कठीण आहे मग उपाययोजनात्मक काय करावं?

मुळात आत्महत्या हा काही एका दिवसात घेतलेला निर्णय नसतो. वारंवार एकाच गोष्टीचा, त्याच त्याच विषयाचा आघात मनावर होऊन ती व्यक्ती स्वतःला त्या विषयात इतकी जखडते की त्यातून सुटण्याचा तोच एक मार्ग दिसतो. मग तो कोणताही विषय असू शकतो.

घर म्हणजे आपली नाती. आपल्याच भल्यासाठी त्यांच एखादं टोचून बोलणं, वारंवार एखाद्या विषयासाठी अडवून धरण, एखादी गोष्ट करायला भाग पाडणं किंवा उलट दिशेला आपल्या चुकांमुळे आपण त्याचा विश्वास गमावण, आपल्याच घरच्यांच्या नजरेतून उतरण या अशा दोन्ही केस मध्ये एकतर सतत एखाद्या नकोशा असलेल्या गोष्टीचा भडिमार किंवा दुखावलेल्या स्वाभिमानामुळे हा पिलर डगमगतो आणि आपली विचारसरणी बदलते.

मग येतो संसाराचा स्तंभ. जो प्रेमाने भरलेला असतो. हा सगळ्या स्तंभात हळवा असलेला भाग. इथे सुई जरी टोचली तरी आभाळ कोसळल्या सारख वाटत. याचा पाया विश्वास, प्रामाणिकपणा आणि आदराने भक्कम असतो. पण जेव्हा प्रेमात विश्वास घात होतो, आपण प्रेम करणारी व्यक्ती अप्रामाणिक ठरते किंवा त्याच व्यक्तीकडून आपला आदर राखण्याजागी बदनामी होते अशा वेळी हा स्तंभ पूर्णपणे उखडून पडतो. उलटदर्शी आपण त्या व्यक्तीवर हदसे भी ज्यादा प्रेम करत असतो आणि ती व्यक्ती सोयी नुसार तुरळक प्रेम करत असते अशा वेळी सुद्धा आपल्या प्रेमावर खरी उतरायला ती व्यक्ती कमी पडली किंवा आपण हद्दी पेक्षा जास्तच गुंतलो असेल तर दुखावले जातो आणि अशा वेळी हा स्तंभ समूळ कोलमडून पडतो.

मग येतो करियरचा पिलर. यावर बोलणारे सतराशे साठ लोक आपल्या आसपास सतत असतात. काय करतोस, किती कमवतोस, पडूनच आहेस का रे? वगैरे वगैरे... जर एखादी उनाड व्यक्ती असेल तर तिला याचा फारसा फरक पडत नाही. मात्र एखादी व्यक्ती नोकरी असो व्यवसाय असो प्रयत्न करत असेल, धडपडत असेल तरीही तिला वारंवार अपयश येत असेल अशा वेळी अशा गोष्टींमुळे ती पूर्णतः खचून जाते. आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही अशी भावना निर्माण होते आणि एक वेळ येते शेवटचा मार्ग चालण्याची.

सगळ्यात शेवटी असतो तो आत्मविश्वास. आयुष्य जगण्यासाठी, एखादी गोष्ट करण्यासाठी, काहीतरी मिळवण्यासाठी लागतो तो आत्मविश्वास. या स्तंभाला स्वतःच स्वतंत्र अस्तित्व नसलं तरी सगळ्यात महत्वाचा स्तंभ असतो तो हाच. कारण पहिल्या तीन पैकी एक जरी स्तंभ डगमगला तरी कोसळतो तो आत्मविश्वास, जगण्याचा आत्मविश्वास!

त्यामुळे जर कधी कुणावर अशी वेळ आलीच, आयुष्याचे मूलभूत स्तंभ हलले तर स्वतःला एक प्रश्न विचारा,

"आपल्या डोक्यावर आर्थिक किंवा भावनांचं कर्ज तर नाही ना?"

आणि एक गोष्ट स्वतःला सांगा,

"अजून एक प्रयत्न करू देत!"

या एका प्रश्नाने आणि गोष्टीने नक्कीच काहीतरी फरक पडतो.

काही लोक अशा परिस्थितीत आपल्या जवळच्या व्यक्तीचा आधार घेतात. मग ती व्यक्ती कोणीही असू शकते आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र-मैत्रीण, नवरा-बायको कोणीही असू शकते. आणि जेव्हा आपण या टोकाच्या निर्णयावर पोहोचतो त्यावेळी आपण अशाच एखाद्या व्यक्तीकडे आपला आधार शोधत असतो. "काही लोकांची सवयीचं असते प्रत्येक गोष्ट तिसऱ्या व्यक्तीकडे नेऊन रडगाणं करायचं, याचा त्याचा आधार घ्यायचं ती गोष्ट तो आधार सवयी असते ती वेगळी गोष्ट. त्याला स्वतःच्या आयुष्याचा बाजार मांडण म्हणतात." 

पण जेव्हा आत्महत्ये सारखी अशी वेळ आयुष्यात क्वचित एखादं दुसरे वेळी येते त्यावेळी आपण याचा त्याचा आधार शोधत नाही, पण कुणीतरी एक व्यक्ती नक्कीच असते जीच्यासोबत आपल्याला बोलावं वाटत, आणि त्याच्या सोबत चर्चा करावी वाटते. ती हक्काची आणि हाकेला धावणारी व्यक्ती जर तुमच्या सोबत त्या क्षणी असेल तर ही वेळ नक्कीच टळते. फक्त ती व्यक्ती त्या पात्रतेची, तुम्हाला संकट काळात पाहून जीवाला जीव देणारी आणि वेळ पडली तर मृत्यूला स्वतः सामोरी जाणारी विश्वास पात्र खरी असावी. आणि अशी एक तरी व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात असते. आणि अशा वेळी ती व्यक्ती तारणहार ठरू शकते. पण जर अशी व्यक्ती निवडायला आपण चुकलो आणि ती व्यक्ती त्या लायक नसली आणि अशा कठीण काळात देखील ती दुरून तुम्हाला उपदेश देऊ लागली तर मानसिक संतुलन बिघडलेल्या अवस्थेत शेवटी अनर्थ घडायचा तोच घडतो!

त्यामुळे एकतर विश्वासपात्र एक व्यक्ती तुम्हाला अशा काळात जपायची आहे नाहीतर स्वतःशी दोन गोष्टी बोलायच्या आहेत. जर चौथा स्तंभ पुन्हा उभा राहिला तर पुन्हा नव्याने सुरुवात होते अन्यथा आत्महत्या शेवटचा मार्ग नाही, पण... चालावा लागतो!

- रोh@nj