Monday, January 15, 2018

जातीचं प्रेम... विध्वंस!

प्रकरण! अगदी योग्य शब्द वापरलास. खरंच जगाचं ते प्रेम. मी केलं ते प्रकरण.

अरे, मला तस म्हणायचं नव्हतं.
मी सहज बोलता बोलता...

असू दे. काही चुकीच नाहीच त्यात. घडलंय ते प्रकरणचं म्हणावं लागेल. कारण प्रेम वगैरे काही त्यात नव्हतंच. मुळात माझ्यासारख्या वेडसर मुलावर कसं कोण प्रेम करेल. आमच्यासारख्यांनी फक्त नि फक्त या गोष्टी लांबूनच पाहाव्यात. जवळ गेलं की काट्यासाऱ्या अंगभर बोचतात त्या...
(मी शांत झालो)

तो - बोल...

मी - ती माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी जिचा मी हात पकडला, जिच्या सोबत मी चौपाटीतल्या वाहत्या रेतीत चाललो, खळखळत्या पाण्यात पाहून मन मोकळे पणाने बोललो. या आधीही मी प्रेम केलं. अगदी जीवाला जीव देण्याइतंक केलं. आणि खरंच जीव देण्याची वेळ आली जेव्हा कळलं तिच्यासाठी मी विरंगुळा होतो. एकतर्फी ठरलं ते प्रेम.आठवणीत झुरण, रडणं, तहान-भूक हरपणं, एकांतात कोंडून घेणं, सगळ्याचाच योग एकत्र जुळून आला. जीव नको झाला. पण देणार तरी कसा.
उधार की जिंदगी अपनी..
माँ बाप की देन!!
वेगवेगळ्या कामात अडकवल. नव्या नव्या गोष्टी करू लागलो. इतरांसाठी जगू लागलो. स्वतःसाठी जगण्याची इच्छा उरलीच नाही. स्वतःसोबत तिला विसरून नाही, पण मागे सोडून पुढे चालू लागलो. अन् एक दिवस त्याच वाटेत ही भेटली.
आम्ही एकाच ऑफिसमध्ये होतो. कधीतरी लक्ष जायचं तिच्याकडे. बोलती चिमणी होती. चिमणीसारा आवाज तिचा बोलायला लागली की तिची चिवचिव ऐकत बसावं वाटायचं. ओळख झाली. पुढे मैत्री झाली. दिसायला तर सुंदर होतीच पण त्याही पेक्षा गोड तिचा स्वभाव होता.
तिला माझं लिखाण आवडायचं. माझ्या कविता चारोळी लेख आवर्जून वाचायची. नकळत तिच्या प्रति ओढ मग आवड निर्माण झाली आणि तिनेही प्रेमाची कबुली दिली.
मी तिच्यासाठी लिहू लागलो. तिच्यावर जीव ओतू लागलो. तिही खूप लाडाने वागायची, जीव लावायची. काळजी करायची. अगदी बारीक - सारीक गोष्टींपासून आयुष्याच्या अडचणींपर्यंत सार काही पाठीशी घालायची. एव्हाना मी आयुष्यातील दुःख म्हणण्यापेक्षा माझं जग मागे सोडून तिच्या विश्वात रंगलो होतो. आणि अचानक एकदा ती म्हणाली आपल्या नात्याला शेवट नाही. आपण एकत्र येणं शक्य नाही. तिने अनेकदा असंच दर्शवलं. मी अगदी सहज घेत तो विषय.

तो - पण का, तीच ही प्रेम होतं ना तुझ्यावर, मग का फिरली ती मागे!
नात जोडलं ना, मग जपताना का असं केलं तिने?

कारण तिच्या घरातला देव वेगळा होता. अन् माझा तर देवच उरला नव्हता. तुझी जात वेगळी माझी जात वेगळी. या नात्याला काही अर्थ नाही.  माझ्या घरचे याला दुजोरा देणार नाहीत. म्हणत तिने नात्याला पाठ फिरवली अन् मला पुन्हा एकटा करून गेली...... मी

तो - असं कसं केलं तिने.
तिने तुझा जराही विचार केला नाही...

(बोलताना माझे शब्द कापत होते, मन जड झालं होत)
माहीत नाही. मी शेवटी तिला लग्नासाठी घरी मागणी घालतो म्हटलं. तिने त्यावर कायमचं लांब केलं. तिच्यासाठी जात महत्वाची होती. घरातील विरोध महत्वाचा होता. तिच्या नजरेत मी, माझं प्रेम, आमचं नातं याला काहीच जागा नव्हती. मुळात आतातर असच दिसतंय तिने कधी प्रेमच केलं नाही. ती फक्त प्रश्न घेऊन आली होती, ज्यांची उत्तर तिने आमच्या भेटीत शोधून निघून गेली.
जाताना तिला यवढंही कळलं नाही. मनावर कोरलेलं तिचं नाव, काव्यात रमलेल आमचं नातं सहज मिटवता येणार नाही. तिच्या इतकं लांबवर हातात हात घेऊन कधीची कुणासोबत गेलो नाही हे तिला कळलंच नाही.
ती एकटीच आहे जी माझ्यावर जीव लावते. अन् माझ्यासाठी जगते. आणि माझ्यासाठी एकुलती एक ती, का ते तिला जाणवलं नाही.

यावर तो म्हणाला...
तू चुकीचा विचार करतोय अस म्हणणार नाही. पण तिचं प्रेम आहे की नाही माहीत नाही. पण जात - पात, नि घरचा विरोध, तिची बाजू मी समजू शकतो. ती कोणत्या परिस्थितीत असेल याचा अंदाज आहे मला.
तिचं जर खरंच तुझ्यावर प्रेम असेल ना तर तुझ्याशी बोलण्यासाठी, तुला भेटण्यासाठी, तुला पाहण्यासाठी, तुझ्या सोबतीतल्या प्रत्येक क्षणासाठी ती तुझ्या इतकीच झुरत असेल.
जातीनं तुम्हाला वेगळं केलं, आता तिनं तुझ्याकड, या नात्याकड जातीनं लक्ष देऊन या धर्म संकटातून बाहेर येऊन तुला साथ द्यावी म्हणजे एक सुंदर नात खुलेलं.
बस देव तिला त्या परीस्थितीशी लढण्यासाठी समर्थ करो. तिला योग्य अयोग्य ची निवड करून तुझ्यापर्यंत पोहचणारा मार्ग चालण्याचं सामर्थ्य देवो. तुझ्या प्रेमाची ज्योत इतकी तीव्र व्हावी की एकटी ती सर्वांशी लढावी.

मी - माझ्यासाठी लढायला तिच प्रेमच नाही माझ्यावर....

तोंड बंद कर, तुला काय माहीत तिची परिस्थिती. तिच्या घरचा विरोध.
तिच्या मनाची घालमेल तुला काय समजणार, तो म्हणाला.

मी - का? मला घर नाही? मला आई-बाप नाही? त्यांनी नाही केला का मला विरोध?
मी त्यांना पटवून दिल; rather देतोय सर्व परिस्थिती. नि बाहेर काढतोय त्यांना या जातपात नि intercast सारख्या बुरसटलेल्या विचारांतून. फक्त तिच्यासाठी, आमच्या प्रेमासाठी.

तू चुकत नाहींयस. तू लढायला शिकलायस परिस्थितीशी. ती अडकलीय परिस्थितीत.
जे तू नाही मी समजू शकतो, असच जनरली म्हणतोय, हसत तो म्हणाला.

मी - BC... थांब! जनरली तुझु स्टोरी सांगून जा आता.
(तसाच हसत हसत तो निघून गेला.)

३ महिने झाले आमच्या भेटीला.
त्याचे फोन कमी कमी होत आता बंदच झाले.
माझी परिस्थिती जाणणारा समजून घेणारा तोच अचानक पडद्याआड झाला. परिस्थितीने भांबावून सोडलं होतं मला. शेवटी त्याचं घर गाठलं. घरात एक भयाण शांतता पसरली होती. काहीच पहिल्यासार नव्हतं. एखाद्या वादळान उध्वस्त करावं असं शांत वातावरण पाहून मला ही काही कळलं नाही.

आई पाणी घेऊन जवळ आली. चेहरा उतरलेला;
बाबा सोफ्यावर बसून होते. गप्प.
शांततेला कापत मीच विचारलं.
काकी निलेश...???
त्याच नाव घेताच आई ढसाढसा रडू लागली.
मला काहीच कळत नव्हतं.
काकी काय झालं. रडताय का? शांत व्हा. रडू नका? बोला काय झालं?
निलेश कुठेय!

परिस्थितीची सूत्र जोडता जुळत नव्हती. काहीच संदर्भ लागत नव्हता.
विषय प्रेमाचा-लग्नाचा असावा, यवढं जरा मनात हुसकत होत.

काकी काय झालं....

(वारंवार विचारल्यावर त्याच्या आईने रडू आवरत बोलायला सुरुवात केली)
२ महिन्यांपूर्वी,
तो आमच्या जवळ येऊन बसला,
म्हणाला, आई मला तुमच्या दोघांशी थोडं बोलायचय.
सोबत तो त्या मुलीला घेऊन आला होता.
आमचा पारा चढला,
तुला म्हटलं होतं ना, ही मुलगी आपल्या घरात येता कामा नये. सांगितलेलं कळत नाही. आपल्या घरात love marriage चालणार नाही. तुला आमच्या अब्रूची, आमच्या जीवाची काहीच पर्वा नसेल तर कर मनासारखं.

तो म्हणाला, आई एकदा बघ तिच्याकडे. काय कमी आहे तिच्यात. सुशिक्षित देखणी, मला समजून घेणारी आणि खूप प्रेम करणारी. आम्ही दोघे नाही जगू शकत एकमेकांशिवाय.

हे(निलेश चे बाबा) खूप चिडले;  मग मरा. पण हे चालणार नाही. आमचे संस्कार बाजारात विकून आलास.
काय रे लहानाचा मोठा केला, याच दिवसासाठी का. अशी परतफेड केलीस का आई बापाच्या मायेची.
आणि तू ग तुला काय घर-दार आई बाप आहे की नाय, की सगळं सोडून दिलंस.
अगं बापाचा विचार केलास का कधी? त्यांच्या विरोधात लग्न केल्यावर काय होईल ते?
(निलेश तेव्हा पहिल्यांदा आमच्याशी असं बोलत होता. कदाचित पहिल्यांदा मन मोकळं बोलत होता.)

बाबा हिचा काय दोष. माझी काय चूक. आम्ही फक्त प्रेम केलं. एकमेकांना साथ दिली. आयुष्य एकत्र जगण्याची तयारी आहे आमची.

आई - हिचा दोष! ही आपल्या जातीत बसत नाही. कोण कुठल्या कडेच्या जातीतली ही, या लोकांची आपल्याशी काय बरोबरी. पैशाने असतीलही मोठी. पण मनाने आपण उच्च जाती - वर्गातले आणि हिला सून म्हणून आणू,
शक्य नाही.

आमचं बोलणं त्याला पटत नव्हतं आणि तो भडकला. 
अरे, उच-नीच जात-पात काय लावलंय हे. तुम्हाला परिस्थिती का नाही समजत. कोणत्या जगात जगताय तुम्ही. काही नसतं हे. जगात फक्त एकच जात आहे, माणुसकी. आणि ती प्रेमाने जपता येते. तुमचे बुरसटलेले विचार, ग्रासलेल्या जुन्या रूढी-परंपरा बदला. बाहेर या त्यातून, 
नाहीतर एकदिवस उद्रेक होईल साऱ्याचा. 
जग बदललंय. मागे पडलाय तुम्ही. बदला स्वतःला. असल्या भिकारड्या चालीरितींतून.....

त्याचे बाबा संतापले आणि एक कानसुलात पेटवली... 
(सगळं पाहून ती मुलगी रडू लागली)

बाबा - आता एक शब्द जरी बोलास ना याद राख. तोंड बंद ठेवायचं. 
जातीबाहेर लग्न करायचं तर आमच्यासाठी कायमचा मेलास.

आई - असल्या भिकारड्या मुलीसाठी जर आईबाप नको झाले असतील तर खुशाल जा. 
जग तुझं आयुष्य. पण आमच्या पिंडाला हात लावायला देखील मागे फिरायचं नाही.
या असल्या पोरी आज एका सोबत तर उद्या दुसऱ्याच्या बिछान्यात...

तो - (कटाक्ष नजरेने पाहू लागला)

ती - आई.. बास!
(धावत धावत, तिथून निघून गेली)

तो भावनेत भिजून आता बोलू लागला होता,
जिंकलात तुम्ही. तिला पार बाजारू म्हणून हिणवलात. ती नाही येणार परत. माझ्या प्रेमाची तिला मिळालेली शिक्षा नाही विसरणार ती. जिंकलात तुम्ही जिंकले तुमचे विचार, तुमच्या परंपरा. सर्व.

लहानपणापासून खूप लाडाने वाढवलात. हवं नको ते सारं पाहिलात. जाती बद्दलचा तुमचा द्वेष मनातील जातीयवाद आधीपासूनच जाणून होतो. शाळा ते कॉलेज असे अनेक मोहाचे क्षण आले. पण तुमच्या विचारांचा विचार करून नेहमीच मी स्वतःला अडवत आलो. मोकळेपणाने कधी जगलोच नाही. शिकणव्यतिरिक्त दुसर काही केलंच नाही. मित्रांसोबत मैत्रिणींसोबत खूप जगायचं होत पण अडवलं मी तुमच्यासाठी.

पुढे डिग्रीला ऍडमिशन आणि हिची पहिल्याच दिवशी झालेली भेट. 
अगदी माझ्यासारख मला कुणीतरी पाहतय अस वाटलं.
नव्या कॉलेजात ही पहिली मैत्रीण. एकदम डिसेंट.. सिम्पल, वैचारिक, सोज्वळ. मी स्वतःला भेटल्यागत वाटलं. पुढे आमचा चार आठ मित्र मैत्रिणींचा ग्रुप बनला. पण आमच्या दोघांतील नातं वेगळंच होत. तिला काय हवं नको ती थेट माझ्याकडे यायची. अन् माझ्या तर मित्रांनी तिला पार वहिनीचं करून टाकलं होत. पण मैत्रीच्या पुढे सरकताना हजार वेळा विचार आले नको, नकोसे. कारण तिच्या जातीचा प्रश्न पुढे ठाकणार हे ठाऊक होतं. पण काही गोष्टी ठरवून विचार करून होत नाहीत. नशिबानेच त्या घडतात. आमची जवळीक वाढली. प्रेम फुलले. कारण, आम्ही जणू एकसारखे नि एकमेकांसाठीच होतो. 
तिने शेवटपर्यंत साथ देण्याचं वचनही दिल. कोणत्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी राहायला तयार होती.

पण पुढे काय वाढलंय याचा अंदाज होता मला.
माझं प्रेम हरलं. तुमचं जातीच प्रेम जिंकलं. मी तिला विश्वास दिला होता. 
सर्वांच्या संमतीने परवानगीने दोन्ही परिवार एकत्र होऊन तुला घरी आणीन.
 मी खोटा ठरलो! तुम्ही जिंकलात. तुम्ही जिंकलात....... 
(अस म्हणत तो निघून गेला खोलीत)

निलेश इतका कणखर कसा वागला... 
आणि नेमकं काय झालं असेल... 
माझ्या डोक्यात विचारांनी आणि असंख्य प्रश्नांनी थैमान घातलं 
आईला म्हटलं,
मग आता कुठेय निलेश, त्याने लग्न केलं का ?
आता इथे राहत नाही का? तुम्ही घराबाहेर.... 

काकी रडत रडत उठल्या. माझ्या हाताला धरलं नि वडत बेडरूम मध्ये नेलं.

निलेश एका कोपऱ्यात बसून होता. निपचित. भावना मेलेला. आत्माहीन. 
त्याच शरीरच होत फक्त. एकटक डोळे वटारून बघत बसला होता. 
मी आल्याचाही त्याला थांगपत्ता नाही.

मी त्याच्या आईकडे बघितलं.
(आई बोलू लागली)
तिने आमच्यापासून आमचा मुलगा तोडला. बघ काय अवस्था झालीय त्याची. चार दिवसाच्या प्रेमापोटी आयुष्य संपवून घेतलंय बघ. जिवंत मुडदा बनून राहिलाय.
स्वतःला या चार भिंतीत डांबून घेतलंय. 
ना अन्न शरीराला लागतंय. ना मोकळा श्वास.

मागासपासून शांत बसलेले बाबा खाड्कन उठले,
मेलाय तो मेलाय. फक्त शरीर जाळायच उरलंय. कशासाठी जगायचं असल्यांनी, ज्यांना आई बापाच्या संस्काराची, समाजाची, परंपरेची जाण नाही.. त्यांनी जगण्यापेक्षा मेलेलंच बर. नको रडुस असल्या मजोऱ्यांसाठी.

बाबांचा आक्रोश, आईचा राग, निलेशची ही अवस्था; माझ्या पायाखालची जमीन सरकली.

दबक्या आवाजात मी विचारलं,
काकी हे सगळं कस, 
निलेशची हि अशी अवस्था ... ?

आई - तो रात्रभर तिला फोन करत होता. तिने उचलला नाही. रात्रभर रडला. उपाशी राहिला. 
अन् दुसऱ्या दिवशी तिचा फोन आला.

ती त्याला म्हणाली,
काल आई बाबांनी म्हटलं तस तुलाच आता ठरवायचंय मी किंवा ते. 

तो - अग ऐक ना माझं.

ती - नाही. यापुढे मला जास्त काहीच बोलायच नाही, ऐकायचं नाही. 
तुझं माझ्यावर प्रेम आहे. माझंही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे.
तू प्रयत्न केलास. पण आता निर्णय घे. 

मी लग्न करून त्या घरात नाही येऊ शकत. तुला मी हवी तर त्यांना सोड. घर सोड. लग्न करून बाहेर राहू. 
तशा विचारांच्या लोकांशी मला काही संबंध जोडायचा नाही. माझ्या चारित्र्यावर बोट उचलणारे, उद्या माझा जीव ही घेतील. असला सासुरवास नको मला. आणि त्यांचे 3rd level thoughts पाहता ते आपल्या लग्नाला कधीच परवानगी देणार नाहीत. आणि मला कधीच स्वीकारणार नाहीत.
So, take your decision. Bye.
(तीही दुखावली होती, रागावून आपला निर्णय ऐकवून तिने फोन कट केला)

तो - हॅलो हॅलो. अग ऐक... 

आई - तो द्विधा परिस्थितीत अडकला होता. तो प्रेमाला विसरू शकत नव्हता आणि आम्हाला सोडु शकत नव्हता. दोन्ही विचारांत  घुसमट होऊ लागली त्याची. गप्प गप्प राहू लागला. सतत तेच विचार. तोच ताण. तो मेंटली डिस्टब झाला. निर्णय घेण त्याच्या आवाक्यात राहील नव्हतं.
आणि एक दिवस... तो 
(कानात आवाज घुमत होता.. त्याच विचाराने जड झाला होता. आणि )शेवटी चक्कर येऊन पडला. 

आणि तेव्हापासून ना कुणाशी बोलतो, न जेवतो. या चार भिंतीत एक मृत शरीर बनून निपचित पडून राहतो.

डॉ. म्हणतात त्याचा sense गेलाय. 
त्याला आपण बोलेल काहिच समजणार नाही. स्पर्शाची - भावनांची जाणीव त्याला राहिली नाही. 

मी मनात म्हटलं, जाणीवच तर मारून टाकलात त्याची. 

आई - तो एक देह आहे फक्त
ज्याची सुटका फक्त मरणचं.
(अस म्हणत आई रडू लागली)
(बाबा! पुन्हा जागेवर बसले)

जे काही घडलं, ते माझ्या कल्पने बाहेरच होत. 
पण निलेश,,,
तो जाती विरोधात उभा तर राहिला 
पण प्रेम आणि परिवार यात अडकलाच
त्याच्या सारख्या समंजस मुलाला सोडणं आणि तोडणं कळतंच नाही. 

मी त्याच्या जवळ गेलो. चेऱ्यावर काहीच भाव नव्हते. दाढी केसांनी चेहरा विद्रुप झाला होता. 
प्रेमाचं वेड त्याला वेड करून गेलं की जातीयवाद त्याच आयुष्य उध्वस्त करून गेला, कळत नव्हतं.
त्याचा हात धरून मी त्याला बाहेर घेऊन गेलो. 
But still he is Senseless.

आम्ही नेहमीच्या जागी गेलो. त्याला बसवलं. 

तो गप्पच होता.
मी बोलू लागलो.

निलेश, तुला आठवतय इथे आपण काय मस्ती करायचो. छान होते ना ते दिवस. आणि तो गणपतीचा किस्सा आठवतोय तुला... 
निलेश...
(तो निःशब्द... एक नजर)

मी त्याच्या समोर बसलो

मित्रा प्रेम आणि परिवार दोन्ही बाजु सावरताना आज तू स्वतःला विसरून बसलास. आणि मी...

तुला माहितीय माझी आई गेली. आजारातून उठलीच नाही. 
आज तिचं कार्य झालं. मायेचं छत्र हरपलं.
आणि अजून काय झालं माहितीय,,,
आईने जाताना मला बोलवलं आणि म्हणाली...
'बाळ, आयुष्यातलं सर्वात मोठं सत्य तुला आज सांगते'

मी आईचा हात हातात घेतला.
ती म्हणाली, तू खूप लहान होतास. अगदी कोवळ्या रोपटयासारखा. तुला नात्याची माणसांची ओळख नव्हती. तेव्हा तुला आणला.

मला काही कळालं नाही, म्हणजे...

आई - तुला अनाथाश्रम मधून दत्तक घेतलं. तुला मी जन्म नाही दिला. 

हे ऐकताच, माझा हात झटकन सुटला, अन् आईचा श्वास.
आई... आई... आई...

(निलेशच्या डोळ्यांत हालचाल दिसली, त्याच्यात भावना जागल्या)

तिचे शेवटचे शब्द अन ती पुन्हा अनाथ करून गेले. 
जन्म दिला नसेल तरी मातृत्व निभावलेली तीच माझी आई. 

मी - अनाथ होतो. हे कसलं सत्य. आयुष्याच हे कसलं वळणं.

मी परत अनाथ झालो!

आज अनाथ म्हणून त्याच्यापासून लांब झालो.. जातीसाठी तिने मला लांब केलं
अरे जर मी अनाथ आहे, तर सांगा मला माझी जात कोणती?

मनाचा बांध फोडून
उभा राहिला तो प्रेमासाठी,
विश्व सारे तुमच्या पायी
अन् जगायला निघाला स्वतःसाठी...
संस्काराच्या ओझ्याखाली
दाबता तुम्ही कशासाठी,
प्रेम नव्हे तर स्वतःला विसरला
सांग विधात्या,
कोण जबाबदार या परिस्थितीसाठी...

(त्याच्या डोळ्यांतून थेंब गळू लागले)

अरे कसला समाज कसली भीती
का जपता असल्या चालीरीती,
माणूस म्हणून जगताना
का आडव्या जाती पाती...
प्रेम देऊन प्रेम घेऊन
जगू दे आम्हाला आमच्यासाठी,
सुख आमुचे हित मायबापाचे
सांग विधात्या,
मग हा विरोध कशासाठी...

(त्याच्या हातापायांत चेहऱ्यावर दुःख दिसले, राग दिसला)

आयुष्याच्या वाटेवर आज
उभा एकटा ठाकलो,
प्रेम घेऊनि प्रेम देऊनी
अनाथ शेवटी ठरलो...
अरे कसले भाग्य लिहलेस
कपाळावरती,
मिटली सारी नाती गोती..
सांग विधात्या,
जात माझी कोणती????
जात माझी कोणती????

निपचित बसलेला तो जोरात ओरडला  
आणि घट्ट मला मिठी मारली.

जातीचं प्रेम त्याला उधवस्त करून गेलं 
आणि मी..... 
जात माझी कोणती?