Thursday, February 13, 2020

मैत्री... (भाग १ - सुरुवात)


धावताना शर्यतीत पाखरांच्या, पाखरू मज भेटले...
वेचताना मधाचे थेंब, जीवन तिने गोड केले...


तिच्यासाठी लिहिल तेवढं कमीच. 'ती' म्हणजे माझी बायको. म्हणजे झाली नसली तरी बायकोच! तिच्यासाठी लिहायला शब्द अपुरे पडतात. कधी कधी मलाच कळत नाही तिचं शब्दांनी कौतुक करावं की शिंपल्यातल्या मोत्यांनी तिला येऊन सांगावं... तू आहेस म्हणून आज मी आहे... "तुझ्यातून सुरुवात अन् तुझ्यात अंत आहे".

या एका ओळीत तिचं माझ्या आयुष्यातील स्थान दडलंय. तिची जागा ही आता कायमची तिचीच झालीय. म्हणून तर तिला लाडाने बाबू शोना नाही "बायको" म्हणतो. कारण गर्लफ्रेंड बदलता येते, बायको नाही. आणि ती वागते ही अगदी तशीच हक्काने आणि हट्टाने. एकदम 'एड' य ते माझ्यासाठी.

प्रेमाची सुरवात जर मैत्रीतून झाली तर ते नातं अनंत टिकत आणि आमचं ही तसंच. हा प्रवास सुरु झाला आणि माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. ना काही ठरवून ना काही विचारून नकळत हे नातं जुळलं होत. तिच्याबद्दल एक आवर्जून सांगावीशी वाटणारी गोष्ट म्हणजे तिचा 'प्रामाणिकपणा'. नात्यात बंधल्यानंतर अगदी सातव्याच दिवशी बागेत गप्पा मारताना तिने मनमोकळे पणाने तीच आयुष्य माझ्यापुढे मांडलं. तीच घर, परिवार, नाते-संबंध, 'मित्र'-मैत्रिणी सगळं; तिचा वर्तमान-भूत मांडून अगदी भविष्यात काय काय करायचं इथपर्यंत सगळं माझ्या पुढ्यात ठेवलं. आणि मलाच प्रश्न केला, आता तुला माझ्याबद्दल सर्वकाही माहिती आहे. आता तू विचार कर आपण एकमेकांसाठी योग्य आहोत का?
तिचा हा 'भोळा-भाबडा' स्वभाव पाहून मी मनोमन इतका सुखावलो, वाटलं कॉलेजमध्ये असतानाच हिच्याशी बोललो असतो तर इतका उशीर झाला नसता. जस तिला कॉलेजमध्ये पाहिल्यावर माझी समजूत होती अगदी तशीच 'सोज्वळ' होती ती. तिच्या प्रश्नावर मी नुसतं हसलो. खरंतर माझ्या मनात प्रश्न पडला की 'मी हिच्या योग्य आहे की नाही'.

तिने सार आयुष्य पुढ्यात ठेवल्यानंतर आजतागायत तिच्या एकाही गोष्टीवरून मला तक्रार करण्याची संधी मिळाली नाही. मात्र मीच कपाळकरंटा. काही दिवस गेले आणि मी 'दारू' घेत असल्याच तिला समजलं. मी काही अगदी बेवडा नव्हतो, की रेग्युलर सुद्धा घेत नव्हतो... असच कधीतरी ओकेशनली घ्यायचो. अनेक बियर आणि दारू चे टॉप ब्रँड चाखून झाले होते एवढंच.
माझ्याकडून तिला भेटलेली ही 'पहिली जखम'. ती दोन दिवस अबोल राहिली. मी खूप विनवण्या केल्या. शेवटी मी आश्वासन दिलं, पुन्हा बाटलीला वळून बघणार नाही. त्यावर ती म्हणाली, "तू पितोस याच वाईट नाही वाटत, तू ही गोष्ट माझ्यापासून लपवलीस याचं वाईट वाटतयं. तुझ्या पिण्यावर मी कधीच रोख घालणार नाही, पण इतरांसोबत नको पिऊस. कधी कोण गैरफायदा घेईल कळणार नाही, तुला जेव्हा वाटेल माझ्या समोर घे, हवं तर मी सुद्धा घेईन... पण त्याच प्रमाण किती असावं, हे तू ठरव". तिचं प्रेम आणि समजूतदार पणा बघून पुन्हा ईच्छाच झाली नाही (तरीही घेतलीच होती मध्ये अनेकदा). म्हणून म्हणतो, तिच्या कौतुकासाठी शब्दांची नशाही फिकी पडेल.

आमच्या नात्याला सुरुवात झाली तस "तिने स्वतःला जणू संसारातच झोकून दिलं". अनेक बदल तिने स्वतःत केले. माझ्यासाठी तिने स्वतःला पूर्णपणे बदलून टाकलं. ज्या गोष्टी नात्यात आडव्या वाटल्या त्या सोडून दिल्या. ज्या गोष्टी बदलता येत नव्हत्या तिथे योग्य ती तडजोड केली.

ती माझी "दुसरी आईचं" वाटू लागली होती. आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही पण आईसारखं ती सांभाळत होती. लहानपणी मला डोक्याला तेल लावलेलं आवडायचं नाही. मग आई शोधून, ओढून पकडून मला तेल लावायची. आणि आता ही. मी डोकं दुखतंय म्हटलं की ती लगेच आपल्या जवळ बसवणार आणि तेल मालिश. आता ती "चंपी" करते माझी. मलाही छान वाटत. मग कधी कधी डोकं दुखत नसतानाही दुखतंय म्हणून तिच्याकडून चंपी करून घेतो, पण आजपर्यंत तिने एकदाही कधी कंटाळा आलाय किंवा मी नाही करणार म्हटलेलं मला आठवत नाही. उलट आवडीने आणि लाडाने कुरवाळत मला एखाद्या बाळाप्रमाणेच ती मालिश करते. म्हणून तर तिच्या स्पर्शात आईची माया आठवल्याशिवाय राहत नाही.
आणि हे एवढंच कारण नाही की तिची तुलना आईशी (मुळात तुलना नाही ही) किंवा आई सारखी माया करते म्हणण्याचं. आईनंतर ती पहिलीच स्त्री जी "मला तिच्या हाताने भरवते". आणि फक्त भरवत नाही हा, तर जोपर्यंत 'पहिला घास मला भरवत नाही तोपर्यंत स्वतःच्या तोंडात अन्नाचा तुकडा घालत नाही'. मग ते हॉटेल असो की कुणाचं घर मॅडमना भीती नाही. पहिला घास माझाच. आणि मी मात्र तिच्या आधी २-४ घास खाऊन एखाद डेकर देऊन मोकळा होतो. त्यावेळी मात्र तिची ती मांजरा सारखी नजर आणि नटखट राग बघायला जाम भारी वाटतं. आणि मग मी भरवल्याशिवाय स्वतःचा पहिला घास देखील खाणार नाही. मी सोबत असतानाच तीचं हे नेहमीचं असं.
शिवाय सणावाराला किंवा विशेष दिवसाला "माझे आवडते पदार्थ बनवण्याचा विशेष बेत". म्हणजे मला कधी सांगण्याची किंवा मागण्याची गरज सुद्धा भासली नाही. माझ्या आवडीचे पदार्थ बनवून भरवन जणू तिचा छंदच बनला आहे. या बाबतीत मी मात्र तिला अजून पर्यंत काही बनवून दिलेलं नाही. एक मॅगीच येते बनवायला जे की तिला आवडत नाही. त्यामुळे माझ्या हातची चव तिला आता कधी चाखता येणार नाही.

हे सगळं करत असताना सर्वात महत्वाचं जे ती करत आली ते म्हणजे 'दिलेला शब्द पाळणे, आणि ठरलेली गोष्ट करणे ते सुद्धा वेळेत पूर्ण करणे'. तिची दूरदृष्टी खूपच छान या बाबतीत. म्हणजे एखादा विशेष दिवस साजरा करायचा असेल, कुठे जायचं असेल काही कार्यक्रम-उपक्रम करायचा असेल तर महिनाभर आधी त्याची प्लॅनिंग, नियोजन, बुकिंग, आणि त्याची तयारी तिची झालेली असायची. मला कधीच अस जमलं नाही. म्हणजे एवढा कोण विचार करत. पुढच्या महिन्या-दोन महिन्यांत... 15-20 दिवसांत काय होईल काय नाही; परिस्थिती काय असेल, आधीच कस प्लॅन करायची, देव जाणे. आणि फक्त प्लॅन नाही 'जे ठरवलं ते ठरवलं'. मग 'ते मोडायचं नाही' हा हट्ट.

आजचा दिवस सुद्धा तिने तिच्या संकल्प वहीत लिहून घेतला होता तसाच पार पाडला. आणि तिने फक्त लिहून ठेवलं नव्हतं तर त्याची संपूर्ण तयारी देखील केलेली. संपूर्ण दिवस आखला होता. मला मात्र 2 दिवस आधी फक्त सांगितलं. मला समजत नव्हतं हा उपक्रम, प्लॅनिंग, तयारी कधी करणार. दोन दिवसानंतर करायचंय सगळं पण त्याचा विचार करण्याची मला गरज नव्हती. कारण आजच्या दिवसाची सुरुवात, सामाजिक उपक्रम आणि गोड शेवट सर्व काही तिने आधीच योजल होतं. त्यामुळे मला 'नाही' म्हणताच आलं नाही. आणि ती नेहमी असंच ऐन मोक्याकर १-२ दिवस आधी मला सांगते मात्र तिने तिचा संकल्प पूर्ण करण्यासाठी त्याची तयारी महिनाभर आधी केलेली असते त्यामुळे मला त्या गोष्टीसाठी वेळ काढणं भागच पडतं. आणि एवढी सगळी तयारी केल्यावर नाही म्हणायचा मुळात प्रश्नच उद्भवत नाही.

एखादी गोष्ट तिच्या त्या संकल्प वहीत उरतली मग तिथे अगदी 'प्राण जाये पर शान न जाये' अशा हट्टाने पूर्ण करायचं. याबाबतीत मग तडजोड नाही. जी गोष्ट स्वतःसाठी खासकरून माझ्यासाठी करायची अस ठरलं की मग त्याला वेळ, काळ किंवा इतर कुणी तिसऱ्या व्यक्तीच बंधन न मानता किंवा आमच्यात काही रुसवा-फुगवा जरी झाला असला तरी सर्व काही बाजूला ठेऊन ती पूर्णत्वास देण्याची तिची धमक कमालीची.

यातूनच ती तिची कला जोपासत मला छोट्या मोठ्या भेटवस्तू द्यायची. म्हणजे एखाद्या महागड्या गिफ्ट पेक्षा "स्वतः बनवलेली एखादी वस्तू किंवा ग्रीटिंग" किती मोलाची हे माझ्यापेक्षा दुसरं कोण जानेल. याबाबतीत तिने अगदी भेटवस्तूंचा सपाटाच लावला. अगदी वेळात वेळ काढून तिच्या दिवसभराच्या वेळापत्रकातून वेळ बाजूला ठेऊन ती फक्त माझ्यासाठी या साऱ्या गोष्टी करायची. तिची चित्रकला उत्तम! मग कधी त्या "चित्रातून आमचं भविष्य रेखाटायची" तर कधी मला लिखाण आवडत म्हणून एक "सुंदर ग्रीटिंग बनवून त्यावर मनातील भावना उतरवायची". हे ती जितकं मनापासून करायची तितकंच ते तिच्या त्या चित्रातून आणि कवितांतून दिसून यायचं. तिने दिलेल्या अनेक वस्तूंनी घराची शोभा वाढवली आहे. मला काय आवडेल काय नाही या कल्पनेतून ती भेट वस्तू बनवायची आणि माझी आवडनिवड जोपासायची ही तिच्या अंगी रुतलेली नवी कला. तिने साजरी केलेली 'आमची पहिली एनिव्हर्सरी' आणि खास कर माझा 'आमच्या नात्यातील पहिला वाढदिवस' माझ्यासाठी अविस्मरणीय राहील. पण या आवडीनिवडी जपण्याच्या आणि भेटवस्तू देण्याच्या स्पर्धेत मला मात्र तिने मागे टाकलं. तिने दिलेलं 'कपल टी-शर्ट' आणि 'नंबर' जे सतत आमची ओळख एकत्र असल्याचं प्रतीक. हे मला कधीच शक्य नव्हतं. हॅट्स ऑफ बायडी!

या छोट्या छोट्या गोष्टी तर ती सुरुवातीपासून करतच होती. ज्यात आनंद आहे, क्षणिक आहेत, तात्पुरत्या आहेत, अशा गोष्टी करून थांबेल तर ती, ती कुठली! नात्यात फक्त प्रेम असून चालत नाही. ते प्रेम कायम फुलत राहण्यासाठी 'विश्वास जपणं', 'बोलण्यापेक्षा कृतीतून प्रेम व्यक्त करण', आणि सर्वात महत्वाचं 'नात्याचा विचार दूरपर्यंत करणं' हे तिचे उत्तम विचार.
खरंतर या साऱ्या गोष्टी 'मला फिलॉसॉफीकल वाटायच्या' आणि निम्म्या अर्ध्या तर डोक्यावरून जायच्या. पण तरी ती करतेय तर चांगलंच आहे, म्हणून 'मी हो ला हो' देतंच होतो. पण तिने त्या ठरवल्या आणि पूर्ण करून दाखवल्या. माझ्या सारख्या फाटक्या झोळीच्या माणसाला तिने सेविंगची सवयी लावली. 'तिचीचं कल्पना दर महा थोडे थोडे पैसे बचत करून भविष्य सुरक्षित करण्याची'. शिवाय वर्तमानात ही जगायच, मग खर्च होणारचं; पण सेविंगला हात न लावता 'खर्चासाठी वेगळं नियोजन देखील तिनेच केलं होत'. मला बस ठरल्याप्रमाणे वेळेत त्या गोष्टी करायच्या होत्या. याबाबतीत मी कधी विसरायचो, कधी राहून जायचं. मग मात्र तिचा रागाचा पारा कधी वर खाली व्हायचा. पण ते माझ्यासाठी आमच्या नात्यासाठीच होतं, म्हणून 'मी पलटून कधीच राग दिला नाही'. कारण योग्य ठिकाणी रागवल्यावर माझ्या रागवण्याला अर्थच नव्हता, याची मला बरी जाणीव होती.

ती माझ्यासाठी जगत होती. सोबत माझ्या कुटुंबातील माणसांचा सुद्धा विचार करत होती. "माझी नाती, माझं परिवार तिने आपलं मानलं होतं". सणावाराच आई-बाबांचे आशीर्वाद घ्यायला तर अनेकदा घरातील मुलीप्रमाणे जबाबदारी पार पाडायला ती हजर असे. 'माझ्या घरात कस वागावं आणि कसं बोलावं' हे तिला सांगण्याची मला कधीच गरज भासली नाही. तिच्या प्रेमाने तिने सगळ्यांची मन जिंकली.
उलट बाजूला मला मात्र फार काही करता आलं नाही. तिने सांगून शिकवून आणि मी केल्या नाहीत त्याहीपेक्षा हजार चांगल्या गोष्टी तिच्या नातलगांना सांगून माझं स्थान एका उंचीवर नेऊन ठेवलं. 'तिच्या मनात सोबत घरात पण तिने माझी जागा बनवली'.

या पलीकडे जाऊन तिचा एक गुणधर्म, 'तिने कधीच मला एकट नाही सोडलं'. सुखात एखादवेळी सहभागी झाली ही नसेल पण कठीण प्रसंगी कायम माझ्या पाठीशी नाही तर सोबत उभी राहीली. वेळ पडली तेव्हा रात्री अपरात्री जिथे असेन तिथे धावत माझ्याजवळ आली. आणि परिस्थिती सावरली.
"अनेकदा तब्बेत खालावली त्यावेळी मात्र तिने तिचा खंबीरपणा देखील दाखवला". स्वतःच घर नोकरी सांभाळत माझ्या तब्बेतीकडे बारीक लक्ष दिलं. आणि पुन्हा कधी अशी वेळ येऊ नये म्हणून बारीक सारीक गोष्टींची आजही काळजी घेते.

या सर्वांपेक्षा महत्वाचं म्हणजे ती स्वतःला पूर्णपणे विसरून गेलीय. फक्त आणि फक्त माझ्यासाठी. मी आयुष्यात आल्यानंतर ती तीच घर-परिवार, मित्र-मैत्रिणी, तीच स्वप्न सर्व काही विसरून गेलीय. तिच्या आयुष्यात आता फक्त मी आणि मीच उरलोय. तीच कुटुंब म्हणजे मी आणि माझ्यासोबत जे उभारेल तेच तीच घर. मित्र मैत्रिणी यांच्यासाठी आता तिच्याकडे वेळच उरत नाही, गप्पा गोष्टी, शेरिंग-केरिंग तिला सगळं माझ्यासोबतच करावं वाटत म्हणून तिने आज सगळ्यालाच पाठ फिरवली.

आणि स्वप्न मला तर माहिती ही नाही तीच स्वप्नं काय, तिला काय करायचं आहे आणि आयुष्यात कोणती उंची गाठायची आहे. मला ठाऊक ही नाही माझ्या भोवती घिरट्या घालणाऱ्या त्या डोळ्यांत सुद्धा काही स्वप्न असू शकेल.
कारण तीच सगळं आयुष्य पणाला लावून आज ती माझ्या स्वप्नासाठी झटतेय. माझ्या स्वप्नाची संपूर्ण जबाबदारी तिने तिच्या नाजूक खांद्यांवर उचलून धरलीय. कधी कधी मलाच भीती वाटते जर मी माझं स्वप्न पूर्ण नाही करू शकलो तर तिचं स्वप्न तुटेल, कारण "माझं स्वप्नं स्वतःचं करून" तिने तिच्या स्वप्नांची होळी पेटवली आहे. तीच स्वप्नं, तिच्या जगण्याचं कारण, तीची नाती गोती संपूर्ण आयुष्य एका बिंदूपासून सुरू होतं नि त्याचं बिंदू वर संपत आणि तो छोटासा बिंदू म्हणजे "मी".
म्हणून कधी कधी भीती वाटते तिच्या या खऱ्या, प्रामाणिक, आणि प्रमानाबाहेरच्या प्रेमाची. कारण तिच्यासारखं मी कधीच जगलो नाही आणि तिच्यासारखच जर मी भावनांनी विचारांनी स्वतःला नग्न केलं, तर हे नातं विस्कळीत होऊन जाईल....

(उर्वरित कथा भाग २ मध्ये)