Wednesday, March 25, 2020

मैत्री... (भाग २ - शेवट)


मस्त चाललंय लाईफ. सक्सेसफुल करियरच्या दिशेने माझं रोज एक पाऊल पुढेच पडतंय. टार्गेट इस ऑन द वे. सगळं काही बॅलन्स झालंय. माझं स्वप्न पूर्ण होणारय. माझं ध्येय लवकरचं मी गाठणारय. आणि हे सगळं शक्य झालं कारण सतत मला माझ्या ध्येयाकडे ढकलणारी शक्ती कायम कार्यरत होती. "ती." माझी गर्लफ्रेंड.
सॉरी गर्लफ्रेंड म्हटलेलं तिला आवडत नाही, होणारी बायको! माझं ध्येय पूर्ण झालं की आम्ही लग्नात बंधनार होतो. पण सध्या सगळं विस्कळीत झालंय. सगळं छान चालू होतं आधी. फॅमिली, करियर सोबत लव्ह लाईफ... एवरी थिंक वोस गुड. बट आता परिस्थिती अगदी उलट झालीय. का? कशी? काही कळत नाहीय. आज मी ध्येयाच्या वाटेवरून भटकलोय. आणि याला जबाबदार 'ती' चं. जिने घडवलं तिनेच बिघडवलं.

रडत खडत दोन वर्षे झाली आमच्या नात्याला. एकमेकांसाठी नवनवीन गोष्टी करणं, वेगवेगळ्या गोष्टींतून प्रेम व्यक्त करण, काळजी घेणं, सावरण, सगळं जबाबदारीने पार पाडण आणि सोबतच मजा-मस्ती लाईफ एन्जॉय करणं सगळं चांगलं चालू होतं.

मी खुश होतो ह्या सगळ्यात. एकीकडे मी माझ्या ध्येयाच्या दिशेने चालत होतो दुसरीकडे 'ती'चं प्रेम माझ्या पाठीशी होतं. मी मस्त जगत होतो. पण नात्याला कसलं ग्रहण लागलं कळत नाही. अचानक परीस्थित बदलली. वाद होऊ लागले. भांडण होऊ लागली. सुरुवातीला मी लाइटली घेतलं सगळं, वाटलं होतं भांडणाने प्रेम वाढतं. पण इथे मात्र फक्त भांडणच वाढतं होती. अगदी आता लग्नापर्यंत वाटचाल आल्यानंतर नातं मोडखळीला आलं होतं. ती खूपच विचित्र वागत होती. बारीकसारीक गोष्टींवर रागावणं, चिडन, दोन-दोन चार-चार दिवस संवाद टाळणं, ते आज अगदी माझ्यावर हात उचलण्यापर्यंत तिची मजल गेली. इतका द्वेष! का? कशासाठी? प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीला मला जबाबदार ठरवायचं, असली-नसली चूक दाखवून द्यायचं... चार-आठ दिवस रुसायचं आणि नको असलेला टोकाचा निर्णय घ्यायचा. काय मिळत 'ती'ला हे सगळं करून? आणि का करते 'ती' हे सगळं?

तिची माझी ओळख बालपणीची. एकमेकांकडे बघणं. बघितलं की नजर चोरून घेणं. वहीच्या शेवटच्या पानावर तीच नाव रेखाटन सगळं किती गमतीशीर होत ते. आमचं नकळत ट्युनिंग इतकं जमलं होत की आम्हाला न उमगलेली गोष्ट आमच्या मित्र मैत्रिणींना कळू लागली. मग काय, कधी शाळेच्या बाकावर... तर कधी भिंतीवर माझं आणि तिचं नाव एकत्र दिसू लागलं. पण आमच्यात अजून काही उघड बोलणं झालं नव्हतं. वय वाढत होत तस एकमेकांना आवडू लागलो होतो हे खरं. आणि आता मी तिच्या शेजारीच बसू लागलो. कधी वही-पुस्तक काढताना किंवा देता घेताना स्पर्श होऊ लागला. आहहह! ते दिवस आठवले की आजही अंगावर शहारा येतो आणि सगळं अंग कुरवाळून निघत. तिच्या होणाऱ्या स्पर्शाने मला 'स्त्री'चा स्पर्श, त्याची जाणीव पहिल्यांदा झाली. पहिल्यांदा झालेला तो स्पर्श, सुटलेलं पाणी, अंतर्मनासोबत अंतर्भागात झालेल्या गुदगुल्या डोळे मिटले की आताही 'ती'चा तो स्पर्श मला अनुभवता येतो. अल्लड वयातील माझं हे प्रेम.

शाळा संपली सगळे आपापल्या वाटेला गेले. आणि योगायोगाने 'ती' माझ्याच कॉलेजला आली. कॉलेजच्या टॉप स्टुडन्ट मध्ये तीच नाव होतं. कमालीची गोष्ट म्हणजे तिच्या हुशारीने आणि सुंदरतेने सर्वच मुलं तिच्याकडे आकर्षित होत. मला तर आता खात्रीच झाली होती मी प्रेमात पडलो. शाळेत जे काही झालं ते आता पुन्हा नको म्हणून धडपड करणं गरजेचं होतच. त्यात आता तिला मिळवणं म्हणजे कॉम्पिटिशन पण वाढलेलं. पण आपला झेंडा अटकेपार होणार याची खात्री होतीच. कधी बोलणं कधी भेटणं तर कधी दुरूनच तिला पाहता पाहता पुरत बुडून जाण आता रोजचंच झालं होतं. मी अक्षरशः वेडा झालो होतो 'ती'च्यासाठी. आता मला कुणी विचारलं तुझी gf आहे का तर  थेट मी तिच्याकडे बोट दाखवू लागलो. अख्या कॉलेजमध्ये आमच्या नावाची ही चर्चा आता कानावर येतच होती. प्रेमाची हवाच तशी असते कधी कशी कुठून कुठपर्यंत पसरते आपल्यालाच कळत नाही. पाहता पाहता दोन वर्षे निघून गेली आणि मी 'ती'चा होऊन गेलो.

आता 'ती'ला माझं करण्यासाठी सम्पर्क वाढवायचा होता आणि त्याकाळी सर्वोत्तम पर्याय म्हणजे फेसबुक. मीच रिक्वेस्ट पाठवली. दोन दिवस वाट पाहिली खूप उदास वाटत होतं आणि शेवटी नोटी फिकेशन आलं. 'ती'ने माझी मैत्री स्वीकारली. इतका खुश झालो होतो मित्रांना सहजच वडापावची पार्टी देऊन टाकली. आता हाय हॅलो सुरू झालं आणि आमच्यात गप्पा होऊ लागल्या. गप्पा वाढल्या जवळीक वाटू लागली आणि आता आमची पहिली भेट ठरली. ज्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहिली ती 'ती'च्याशी झालेली पहिली भेट.

आता 'ती'ला सुद्धा माझा सहवास आवडू लागला. बोलण्यासाठी आता फेसबुकची गरज नव्हती. फोन वर छान गप्पा रंगू लागल्या. आता अगदी रोजच्या रोज बोलणं होऊ लागलं. सकाळी उठल्यावर, वाटेत चालताना की मग रात्री निजताना मलाही 'ती'ची सवयीचं लागली होती. जर कधी फोन वर बोलणं नाही झालं अगदी चुकल्या चुकल्या सारख वाटायचं. मी पूर्णपणे 'ती'च्यात गुंतलो होतो. कधी कामात तिने फोन नाही केला तर मात्र मी फोन करून msg करून तिला धारेवर धरायचो. खरंतर तिने कधी इग्नोर केलं तर मला कसंस व्हायचं. फोनवर चार शब्द का होईनात बोललं की बरं वाटायचं.

'ती'ला घेऊन पहिल्यांदा फिरायला गेलो. बागेत.निवांत, समोर समुद्र किनारा आणि बागेत छान वार सुटलेलं आणि झाडाच्या सावलीत आम्ही दोन पक्षी. गप्पा मारल्या मनमोकळे पणाने भावनांची देवाण घेणाव झाली. त्यानंतर अधून-मधून गाठी-भेटी आणि बागेतील गप्पा कधी वेळ मिळेल तस होऊ लागल्या. कधी मी वेळ काढायचो तर कधी 'ती'ला काढायला लावायचो. हळूहळू मला आता वाटू लागलं होतं की 'ती'माझ्या प्रेमात पडेल.

आणि कदाचित ते म्हणतात ना "किसी चीज को दिल से चाहो, तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है". 'ती' आता माझ्याच ऑफिसमध्ये जॉब साठी लागली. मला तर अस वाटू लागलं की एक झालं की एक सतत सुख माझ्या वाटेत वाढून ठेवलेलं आहे. भेटणं बोलणं हे आता अगदी रोजच झालं. आता ऑफिसमध्ये असल्याने भावनांना मी आवरच घातला होता. आणि 'ती'ही तशी कामात मग्न असायची मात्र काम झाल की पहिलं मलाच भेटायची. घरून निघाल्या पासून पुन्हा घरी जाई पर्यंत एकमेकांची काळजी करणं, जेवल्या झाल्याची जबाबदारीने विचारपुस करणं 'ती'ला उत्तम जमायचं. एकदम छान वाटायचं सार.

माझ्या मित्र मैत्रीणीना वाटायचं मी टाईमपास करतोय. पण मी कुठे असं काय केलं. जस ती माझ्याशी वागत होती तसंच मी हि वागत होतो. मग जगाला वाटायचं ते वाटू दे. मी त्याची पर्वा करणं सोडून दिल. आणि एक दिवस "ती"ने मला लग्नाची मागणी घातली.

इतका बालपणीपासूनचा प्रवास इतकं प्रेम एकत्र सहवास मग इतका वाद का ?
हेच होत आमच्यातील वादाचं मूळ. कारण

माझं अल्लड वयातील प्रेम म्हणजे, प्राजक्ता!
कॉलेजला भेटलेली ती प्रणाली...
फेसबुक वरील क्रश म्हणजे विशाखा...
फोनवरील विरंगुळा केला ती आदिती...
जीच्यासोबत फिरलो ती ललिता...
टाईमपास केला ती दीपा...
आणि लग्नाला मागणी घातली ती प्रिया!

आणि ह्यातील एकही गोष्ट मी तिला स्वतःहून सांगितली नाही. आणि परिणाम जेव्हा कॉलेजच माझं एकतर्फी प्रेम तिच्या समोर आलं तिथे आमच्या नात्याला ग्रहण लागलं. या सात गोष्टींशिवाय मी तिला एक गोष्ट सांगितली होती. माझं अफेर. अंजना. ती माझं पहिलं प्रेम असं मी तिला सांगितलं होत. आमचं ३ वर्षांचं नातं होत.

ती माझ्याच इथे राहायची. सतत बघायची मागे पुढे घिरट्या घालायची. आमच्यात जवळीक वाढली मैत्री घट्ट झाली. मी 'ती'ला माझ्या स्वप्नांबद्दल सांगितलं. तीच ही ध्येय जवळपास सारखंच होतं. त्या निमित्ताने आता मी तिच्या घरी जाऊ लागलो. हळूहळू ध्येय काय हे मी विसरून गेलो आणि तिच्यात गुंतू लागलो. ती फोकस करत होती ध्येयावर आणि मी तिच्यावर. भेटी वाढल्या एकांत आणि मनातला मोह सार एकवटल आणि एक दिवस माझे डोळे उघडले आणि ती माझ्या मिठीत होती. निर्वस्त्र! दोघेही तो क्षण मनापासून जगलो. माझ्या आयुष्यातील तो क्षण डोळ्यासमोरून आजही तसाच आहे. भिनलेल अंग शहारलेली ती. एकमेकांना ते कवटाळून धरलेलं पिळून टाकलेल शरीर. भानावर नसलेला मी नशेत असणारी ती. श्वासाची ती उब, घामाचा तो गंध, बसणारे ते हळू जलद दणके.... आणि सर्व थांबलं आणि दोघे भानावर आलो तेव्हा नजरानजर झाली. 'ती' मिठीत होती. आय लव्ह यु म्हणत तिला गच्च कवटाळून धरलं.

इतकं प्रेम होतं आमच्यात. 3 वर्ष हे छान अस प्रेम! आठवड्यातून किमान 3 दिवस तर ठरलेलेच होते एकेमकांसाठी आणि एकमेकांच्या मिठीत. मग वेळ नाही की जागा नाही की कुणाची अडचण नाही. बस वाहून घ्यायचं एकमेकांच्या शरिरात. मी सुखावत होतो. वेडा झालो होतो. आणि ती सुद्धा गुंतली होती माझ्यात, माझ्या शरीरात.
अस प्रेम कुणीच कुणावर केलं नसेल इतकं प्रेम होतं ह्या नात्यात.
आणि माझ्या घरचांना याचा थांगपत्ता हि नव्हता. मैत्रीण म्हणून ठाऊक होती. आणि त्यामुळे दिवस भर तिच्या घरी असलं तरी कामाच्या निम्मिताने असल्याने घरच्यांनी कधी कधी यात एक शब्द काढला नाही कि मला अडवलं नाही.

मी माझ्या या अफेर मध्ये काय झालं कस झालं फारसं सांगितलं नाही पण या ३ वर्षांच्या अफेर बद्दल मी तिला म्हणजे होणाऱ्या बायकोला साधम्य कल्पना दिली होती. यावरून व्हायचे कधी तरी वाद पण ते निवळायचे सुद्धा.
पण जेव्हा कॉलेजची आणि सात मधील एक गोष्ट तिच्या समोर आली तिथे आमच्या नात्याला वणवा लागला तो आज नातं तोडूनच थांबला.

नात्याच्या सुरुवातीला अगदी आठवड्याच्या आतच तिने सगळं माझ्यापुढे मांडलं आणि तिच्या मनावरचं ओझं रिकामं केलं. मुळात तिने जे संगितल किंवा तिच्या आयुष्यात जे घडलं ते तितकंसं महत्वाचं किंवा सांगण्यासारखं त्यात नव्हतं तरीही तिने जबाबदारी आणि नात्याचा पाया भक्कम असण्यासाठी सर्व काही माझ्यापुढे ठेवलं...

मी मात्र माझ्या आयुष्यातील एक घटना माझं एक अफेर फक्त तिला सांगितलं.

आणि हे सारं काही तिने मनावर दगड ठेऊन स्वीकारलं सुद्धा. ही गोष्ट मी तिला सांगितलं तेव्हा ते माझं पहिलं प्रेम पहिलं अफेर असंच सांगितलं आणि तिने विश्वास सुद्धा ठेवला. अनेक वेळा तिने मला विचारलं जे काही मनात असेल किंवा सांगायचं असेल ते सांगून टाक. 'मी सत्य पचवेन, खोटं नाही'. लपवू नकोस माझ्यापासून कधीच काही. मी तिला मोठ्या विश्वासात घेऊन सांगितलं 'सांगण्यासारखं काहीच नाही. एक अफेर होत ते तुला सांगितलं'.
आता ती निश्चित झाली.

आणि एक दिवस तिच्या समोर एक नाव आलं. प्रणालीच आणि तुझं नात काय?

मी थबकलो प्रणाली तिचीच मैत्रीण होती. तेच माझं कॉलेजमधील प्रकरण निघालं. मी शांत पणे उत्तरलो नॉर्मल ओळख फक्त होती आणि वर्ग मैत्रीण म्हणता येईल. तुझं प्रेम होतं तिच्यावर? मी हसलो आणि म्हणालो काही काय तस काही नव्हतं. तिचा विश्वास बसावा म्हणून "मी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिची खोटी शपथ घेऊन तिला विश्वासाने म्हटलं माझं तीच काही नव्हतं."

ती प्रचंड रागात होती तिने राग पोटात घातला आणि शांत झाली. मला वाटलं ती विसरून जाईल. पण एक दिवस ती पुराव्यांसहित माझ्याकडे आली. पुन्हा मला तोच प्रश्न केला. मी पुन्हा तेच उत्तर दिले. तिच्या रागाचा पारा चढला आणि तिने खाडकन पेटवली. आणि सगळे पुरावे पुढ्यात मांडले.

माझ्या पायाखालची जमीन सरकली तिचा राग अनावर होत होता. मला कळेना काय करावं. मी रडलो, हाता पाया पडलो पण तिच्यासमोर आता माझ्या प्रेमाची किंमत शून्य झाली होती. तिच्या डोळ्यांत आक्रोश होता. ती फक्त एकच वारंवार बोलत होती. "तू माझ्याशी खोटं का बोललास, का लपवलस सगळं". आणि मी तिला विनवण्या करून एकच सांगत होतो, "माझ्या मनात चुकीचं काही नव्हतं, तुला गमावण्याच्या भीतीने खोटं बोललो".

तिचा पारा आणखी वर चढला, मला गमावण्याच्या भीतीने तू माझ्या डोक्यावर हात ठेवून खोटं बोललास. खोटं बोलून नात निभावणार होतास.. तर हे नातंच मला नको.

तिने थेट नातं तोडण्याचा निर्णय घेतला.
तिचं माझ्यावर जीवापाड प्रेम असताना तिने हा निर्णय घेतला.
मी म्हणालो, तुला माझं प्रेम नाही का दिसत,
ती म्हणाली प्रेम असेल ही खंर पण तू खोटा निघालास.

वाद विकोपाला गेला होता. मी गुडघे टेकले आणि शेवटी ती नरमली. तिने माफ केल. मला मिठीत घेतलं. आणि मला पुन्हा विचारलं जे काही असेल मनात आणि तुझ्या आयुष्यात ते बोलून मोकळा हो. मी काही नाही म्हणत तिला बिलगून राहिलो. ती ही शांत झाली.

माझ्यात मन ही मन आता एक दडपण निर्माण झालं होतं. तिच्या रागाचं. तिच्या वागण्याचं. ती रागात मला काहीही बोलत होती. हात उगारत होती. ती मला समजून घेईल का आणि माझा सारा भूतकाळ स्वीकारेल का. याची मला शंका वाटू लागली. आणि मी सर्व काही मनात ठेवलं. शिवाय माझी स्पष्ट भूमिका होती... जे होत रिलेशन ते सांगितलं होतं बाकी सात जणी तर माझ्या ***"मैत्रिणी"*** होत्या!

दोघांच्याही मनात कुठेतरी ही गोष्ट आता गाठ बनून बसली होती. त्यामुळे ती बारीक सारीक गोष्टींचा फार विचार करू लागली. तर दुसरीकडे मी चुकांवर चुका करू लागलो.
एखादी गोष्ट ठरवली की या ना त्या कारणाने माझ्याकडून ती गोष्ट मोडीत निघायची. पुन्हा तिचा राग, द्वेष अन रुसवा.
भांडायची रागवायची अन ब्लॉक करायची. पण मी माझे प्रयत्न "मेसेज आणि फोन करून" सतत चालू ठेवायचो.

पण इथेही तिला ते मान्य नसायचं मेसेज फोन पेक्षा तिच्या समोर येऊन भेटून काय ते बोलावं अशी तिची अपेक्षा. मी काही कधी इतका भाव दिला नाही. कारण इथपर्यंत आल्यावर मलाही कळलं होतं "तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे", आणि ती माझ्या शिवाय राहू शकत नाही. हे मी चांगलं जाणून होतो त्यामुळे मी हाजी हाजी करणं जरा कमीच केलं.

शिवाय तिच्या जवळच्या मैत्रिणीने सांगितलं होतं, तिचा राग म्हणजे नुसती हवा. "रागात काहीही बोलू दे, काही ही करत नाही. बोलाची कढी नि बोलाचा भात". आता तिच्या जुन्या जाणत्या मैत्रिणीकडून हे ऐकल्यानंतर माझ्या मनातील निम्मी भीती कमी झालीच. मी काही केलं तरी नात तुटणार नाही, ती बोलते सोडून जाईन पण ती मला सोडून जाणार नाही याची मला शाश्वती मिळाली. कारण तीच प्रेम होतं तितकं, तिच्यासाठी मी जीव की प्राण होतो आणि हे मी चांगला जाणून होतो. शिवाय माझं हि तिच्यावर मनापासून जीवापाड प्रेम आहे हे तीहि जाणते.

कदाचित यामुळेच मी वारंवार चुकत होतो मग ते काही करण्याच्या बाबतीत, ठरवण्याच्या बाबतीत किंवा नात्याला घट्ट करण्याच्या बाबतीत.

दुसरीकडे ती कितीही रागावली तरी राग शांत झाला की पुन्हा माझ्याकडे संपूर्ण जबाबदारीने पाहायची. मला काय हवं नको सार पाहायची. ती माझी आई बाप भाऊ बहीण मैत्रिण अश्या सर्व बाजूने जबाबदारी सांभाळायची. जिथे आईच्या मायेची गरज भासली तिथे ती पदर खोचून उभी राहिली. कधी मी थकलो तेव्हा बापासारखी पाठीशी राहिली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या ध्येयासाठी अहोरात्र झटायची. तिने माझं स्वप्न तीच मानलं होत आणि फक्त मानलं नाही तर त्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट तिने मला दिली. ते वातावरण निर्माण केलं आणि त्यासाठी काय करावं आणि काय करू नये हे सारं माझ्याकडून करून घेऊ लागली. आणि कदाचित याचंच मला ओझं वाटू लागलं. आणि मी या सगळ्या गोष्टी तितक्या मनापासून केल्या नाहीत जितकं तिला अपेक्षा होती. कदाचित ती ओव्हर करत होती अस मला वाटायच. म्हणजे सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत सगळ्या गोष्टी ज्या त्या वेळेत तशाच रोज झाल्या पाहिजेत. हे म्हणजे जबरदस्ती वाटू लागली होती मला. पुन्हा सगळा दिवस संपला की तिला रिपोर्टिंग करायचं. हा काय बालिशपणा? मला हे फार काही पटत नव्हतं पण माझ्या परीने मी सगळं करत होतो. आणि मनापासून करत होतो. शिवाय तिला अपडेट सुद्धा देत होतो. मग त्यातही हे असंच का आणि तसंच का?
असे १०० प्रश्न विचारून नको त्या प्रकारे विषय भरकटत जायचा. पुन्हा वाद विवाद कुठे सुरू कुठे संपायचे.

शिवाय ध्येगाच्या तयारी सोबत तीच माझ्या इतर गोष्टींत सुद्धा लक्ष देण वाढलं... माझं शरीर, आरोग्य याकडे लक्ष द्यायला मी काही लहान नव्हतो. पण ती त्याकडे सुद्धा शरीर लटकत आहे, व्यायाम कर योगा कर, वजन इतकंच ठेव अशा गोष्टी करू लागली. सुरवातीला मी ही केलं अगदी मनापासून. पण रोजच्या रोज सगळं होतच अस नाही ना! मग यावरून सुद्धा वाद. माझी माझ्या शरीराची काळजी करायला मी काय लहान होतो का. पण तिच्या मते ह्या सगळ्या गोष्टी समाजात राहण्याच्या, निरोगी राहण्याच्या शिवाय पर्सनॅलिटीच्या दृष्टीने महत्वाच्या होत्या.

पण या साऱ्यात तिने माझ्या सोबत माझ्या घरच्या जबाबदाऱ्या ही पार पाडल्या.
इतकं सगळं ती माझ्यासाठी, माझ्या प्रेमासाठी माझ्या ध्येयासाठी करायची हे सगळं माझ्या घरच्यांना दिसत होतं पण तरीही त्यांच्या मनात तिच्यासाठी जागा नव्हती. का कुणास ठाऊक पण घरच्यांमध्ये आणि तिच्यामध्ये नेहमी एक वेगळा तणाव मला जाणवायचा. ती अनेक वेळा माझ्या सोबत माझ्या घरच्यांचा विचार करायची. त्यांच्या हेल्थ बद्दल काय करावं, भविष्य सुरक्षित असायला काय करावं, ती माझ्या आई बापाला आपलेच आईवडील मानून चालत होती. आणि त्या प्रमाणे वागत ही होती. प्रत्येक सणावाराला येऊन तो परिवारासोबत साजरा करण, सोबत वेळ घालवणं यायला जमलं नाही तर फोन वर आई वडिलांची विचारपुस करणं. हे सगळं करून ती त्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत होती. मात्र ते कधी झालं नाही असा तिचा समज.

नेहमी माझ्या समोर बोलायची तुझे आई वडील पुढ्यात एक मागे एक अस वागतात. त्यांनी मनापासून मला स्वीकारलेलं नाही. त्यांच्या मनात माझ्या विषयी द्वेष आणि तिरस्कार आहे. मी विषय टाळायचो. लक्ष देऊ नकोस. ते काळजीने बडबड करतात. त्यांच्या मनात वाईट असं काहीच नाही. असं बोलून मी वर्ष घालवलं. पण आई बाबांच्या मनात काय हे मलाही चांगलं माहित होतं.

तिच्या मते त्यांच्या मनात जर माझी जागा असती, त्यांनी मला आपलं मानलं असत, सून मुलगी मानलं असत तर त्यांनी आपल्या घरात मला जागा दिली असती. "जिथे मला किचन मध्ये हातभार लावण्यास मनाई आहे तिथे त्यांच्या मनात अजून किंतु परुंतु असल्याचं स्पष्ट होत". ती बोलत होती ते बरोबर होत कारण ज्या घरी परक्या मुलीला स्वयंपाक घरात जागा दिली जाते ती परकी नसून त्या घरची हक्काची मुलगी असते. आणि ती जागा तर माझ्या घरी तिला दिली जात नव्हती हे मला ही दिसत होतं. आई बाबा सुद्धा ती येण्या आधी किंवा घरातून बाहेर गेल्यावर तिचा आणि सोबत माझा ही उद्धार करायचे. मात्र मला कधीही त्यांची बाजू चुकीची वाटली नाही. का वाटेल शेवटी लहानाच मोठं केलंय त्यांनी. मी आज इतकं चांगलं आयुष्य जगत आलोय, जगतोय ते त्यांच्यामुळेच. ज्यांनी घडवलं त्यांना कस चुकीचं ठरवू ते ही काल परवा आलेल्या मुलीसाठी. माझ्या परिवारात आणि त्यांच्यात इतकी तेढ निर्माण झाली की एक दिवस ती दोघांपैकी एक अस निवड ठेऊन निघून गेली. मी येतो म्हणालो तिला पण तिलाच परत बोलावण्याचा माझा डाव फसला. कारण मी माझ्या घडवणाऱ्यांची साथ कधीच सोडू शकत नाही.

पुन्हा वाद, ब्लॉक आठवड्याचा अबोला.
जे नको होतं तेच बायको म्हणता म्हणता गर्लफ्रेंड सारख ब्रेकअप पॅचअप चालू झालेलं मला जाणवू लागल होतं.

अस असताना तिच्या घरी मात्र तिने सर्व परिस्थिती नियंत्रणात ठेवली होती. तिच्या घरी मला मान सन्मान तर होताच शिवाय माझी नव्हती तितकी उंची तिने त्यांच्या नजरेत भरली होती. तिचे घरचे नातेवाईक ते अगदी मित्र मैत्रिणी इथंपर्यन्त सगळ्यांपुढे ती माझ्या कौतुकाची स्तुतीसुमने वाहून थकत नसे. तिचे मित्र मैत्रिण तर एक आदर्श कपल म्हणून आमच्याकडे बघत. शिवाय माझ्या बद्दल प्रत्येकाच्या मनात तिने एक विशेष स्थान निर्माण केलं होत. तिच्या घरी मी कधीही आलो गेलो सदैव त्यांच्या निर्मळ मनात मला आपुलकीच मिळाली. मी तिच्यासाठी काहीच केलं नव्हतं पण तिने त्यांना अनेक अश्या गोष्टी सांगितल्या आणि त्या मी केल्याचं त्यांना सांगितलं आणि कधी एखादा वाद असेल किंवा माझा भूतकाळ याबद्दल तिने चकोर कुणाला कळू दिल नाही. तीच वागणं बोलणं सगळं तिच्या तत्वांवर होतं.

पण इतकं प्रेम मिळून तिच्या घरच्यांसाठी मी काही विशेष केलं नाही. उलट तिनेच स्पष्ट सांगितलं पत्रिका जुळत नाही

ती तुम्ही पाहून घ्या. मी लग्न करणार तर त्याच्याशीच. "एकवेळ जेव्हा घरात मोठ्या बहिणीच्या लग्नावरून विषय निघाला तेव्हा सरळ हिने तुम्ही लावून दिल नाही तर कोर्टात जाऊन लग्न करेन अस सांगितलं".

मी ही घरी सांगितलं होतं, लग्न करेन तर तिच्याशीच. पण जेव्हा काही क्षणांसाठी घरच्यांना सोडून तिच्या जवळ जाण्याची वेळ आली तेव्हा मी अनेकदा तिला एकट सोडलं होत.

एक दिवस दोघांत मोठा वाद जुंपला. विषय माझं ध्येय माझं स्वप्न. मी असाच करतो मी तसाच करतो... सर्व काही... आजपर्यंतच्या सर्व चुकांच खापर ती माझ्यावर फोडू लागली. प्रत्येक वेळी मीच का ऐकून घ्यायचं, मीच का वाकायचं. माझा ही पारा चढला. शेवटी रागाच्या भरात मीही बोललो तुला आजपर्यंतच सगळ्या चुका दिसल्या, प्रेम  नाही दिसलं का?

प्रत्येक वेळी बोलून दाखवतेस तू माझ्यासाठी काय काय केलंस ते...
मला नाही जमत तुझ्यासारखं केलेलं बोलून दाखवायला...
तिचा पारा आणखी चढला आणि म्हणाली सांग, दाखव मोजून.. काय काय केलंस ते, बोल...
का तुला चुका सोडून काहीच दिसत नाही,
*नाही लावला का जीव
नाही केलं तुझ्यावर प्रेम
नाही घेतलं तुला मिठीत सांग...*
मी केलेल्या गोष्टींची यादी तुझ्या इतकी मोठी नसेल पण माझं प्रेम खर आहे आणि मनापासून आहे.

असाच अनेक वाद विवादासह नात तुटण्याच्या मार्गावर येऊन कधी मी कधी तिने सांभाळल. बहुदा मीच सांभाळलं कारण ती तर रागात नात तोडून निघून जायची. आठ आठ दिवस ब्लॉक, बोलणं नाही, भेटणं नाही. "मी शेवटी पुढाकार घेऊन थेट भेटून तिची समजूत काढून पुन्हा नवीन सुरवात करू" अस म्हणत पुन्हा नात्याचा गाढा ओढायचो.

तेवढ्यात एक दिवस पुन्हा वाद भडकला. यावेळी मी थेट आक्रमक पवित्रा घेतला.
सगळं घडत ते माझ्यामुळेच घडत..
तू कधी चुकत नाहीस ना..
आजपर्यंत जेवढे वाद झाले सगळे माझ्यामुळेच झाले..
तुझं सगळं बरोबर आहे,
तू कुठे काय करतेस.
माझी अशी भाषा ऐकून ती चेतावली
शिवी गाळ करू लागली, नको नको ते मनाला येईल ते बोलू लागली आणि माझ्यावर नको ते आरोप करू लागली.
आणि मी ही म्हणालो तुझ्या ह्या अशा वागण्यामुळेच माझं कामात लक्ष लागतं नाही. कस ध्येय गाठणार?
तुझ्यामुळेचं अडथळा निर्माण होतोय स्वप्न पूर्ण होण्यात.

ती निशब्द झाली.
माझ्यामुळे स्वप्नं पूर्ण होत नाही..
मी अडथळा आहे ध्येयाच्या मधला..
माझ्यामुळे स्वप्नं पूर्ण होत नाही..
मी अडथळा आहे ध्येयाच्या मधला..
असंच बडबड करत हीच वाक्य बरळत ती निघून गेली.


मी ही नाही अडवलं.
काय चुकीचं बोलो होतो का?
सारखं तेच तेच...
किती छोट्या गोष्टी आहेत ह्या. याकडे दुर्लक्ष करायला हवं तिने, पण नाही तेच मनात धरून बसायचं आणि स्वस्ताच्या मनाचं करायचं.
जाऊदे तिला नातंच नको आहे म्हणून ती अस वागते.
नाहीतर अस केलंच नसत. तिच्या मनासारखं झालं आता. गेली सोडून जाऊदे मी माझ्या जागी बरोबर आहे.
त्यातही मी प्रत्येक वेळी माफी मागितली आहे.
चूक असो किंवा नसो मी प्रत्येक वेळी माफी मागितली.
आणि माफी मागून पुरे नाही. झालेली चूक लिहून काढायची, मग ती सुधारण्यासाठी मी काय करणार हे सुद्धा तिला लिहून द्यायचं. काय फालतूगिरी आहे ही. हे काय अर्थहीन. चूक लिहून काढा मग ती सुधारणार कशी लिहून काढा. मला तर यामागचं लॉजिकच कधी कळलं नाही. तरीही मी दिलंय तिला अनेक वेळा अस लिहून.
अनेक वेळा लिहावं लागलं?
याचा अर्थ मी अनेक वेळा चुकलो होतो का?
छे... ते तिच्या समाधानासाठी होतं.
तिने दे म्हटलं मी दिलं. बस.

या अशा परिस्थिती काही महिने सरकले आणि एक एक करत माझ्या भूतकाळातील सात गोष्टी तिच्या समोर आल्या. प्रत्येक वेळी ती रागावली, भांडली, माझ्यावर हात देखील उचलला. मी मात्र प्रत्येक वेळी रडून रडून हेच सांगितलं मी जे केलं तो माझा भूतकाळ होता.
त्यावर ती म्हणाली हा भूतकाळ होता मग सांगितलं का नाही जेव्हा मी विचारत होती, का नाही सांगितलं जेव्हा एक अफेर होत सांगितलं होतंस, तुझं ३ वर्षांचं घाणेरडं नातं मी स्वीकारलं होत तस ही लफडी सुद्धा पोटात घातली असती, मग का लपवलीस.
त्यावर मी अनावर झालो. तोंड सांभाळून बोल मी रस्त्यावर पडलेला नाही जे वाटेल ते बोलशील.
शब्दाला शब्द भिडू लागला. तू खोटा आहेस, तू फसवलं मला. सगळं लपवून ठेवलंस माझ्यापासून. असे नको नको ते आरोप तिने माझ्यावर केले. आणि मी थेट बोललो मी तुला फसवलेलं नाही, जे होत ते तुला सांगितलं आणि जे तुला समजलं त्यात सांगण्यासारखं काहीही नव्हतं.

काही नव्हतं?
तुझ्या ह्या ७ लफडयात सांगण्यासारखं काहीही नव्हतं?

लफडी म्हणू नकोस, झोपलो नव्हतो सगळ्या मुलींसोबत.

अच्छा म्हणजे झोपलास म्हणजेच वाईट केलंस, लफडं केलंस, मगच सांगणार होतास.
जे केलंस त्यात सांगण्यासारखं काही नव्हतं, तोंड उचलून हे बोलायला काही वाटत नाही तुला?

मी काही चुकीचं केलंच नाही तर का वाटेल चुकीचं.
त्या सगळ्या माझ्या **मैत्रिणी** होत्या. आमच्यात नुसती मैत्री होती.

अरे काय बोलतोयस कळतय का तुला तू या अश्या संबंधांना मैत्री बोलतोस. लाज वाटते का तुला.

मला माहितीय माझं आणि त्यांचं काय होतं आणि काय नाही. तुला समजायचं ते समज आता.

वाह एवढं सगळं करून शेण खाऊन सगळ्याला मैत्रीचं नाव देऊन मोकळा झालास.

तुला ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतायत की आपलं नात आणि एकमेकांवर असलेलं प्रेम?
मी प्रेमात आणि तुझ्या मागे कधीही काही चुकीचं केलं नाही.

तू आता गप्प रहा ह्या ७ मधल्या ४ मुली तर आपण नात्यात आल्या नंतर सुद्धा तुझ्या संपर्कात होत्या. आणि त्यांना तू झालेली गोष्ट बोलतोयस.

अरे किती वेळा सांगू त्या माझ्या फक्त आणि फक्त मैत्रिणी होत्या. त्यांच्यात आणि माझ्यात तस काही नव्हतं जे तुला वाटतंय.

ते अल्लड प्रेम, कॉलेजचा जगभर पसारा, दिवसभर फोन, फिरणं, लग्नाची मागणी या सगळ्याला तू मैत्री म्हणतोस?

हो आमच्यात फक्त मैत्री होती.
आणि होत्या काही जणी संपर्कात पण आता कोणीही नाही. तू सोडून माझ्या आयुष्यात दुसरी मुलगी नाही.

तुझी मैत्री होती यावर तू ठाम आहेसच ना ठिकय. यापुढे तुझा माझा संबध संपला.

ऐक उगाच टोकाचा निर्णय घेऊ नकोस.

उगाच..
यापुढे
मी तुझ्या आयुष्यात पुन्हा कधीही येणारं नाही.

माझ्या मुळे तुझ्या ध्येयात स्वप्नात अडथळा येणार नाही.
तुला माझा राग, बोलन यापुढे सहन कराव लागणार नाही.

आता हेच धरून बसणार यस का...
तुला नातंच नको होतं म्हणून अशी बोलतेस.

हम, बरोबर बोलास मलाच नातं नको होतं
माझं प्रेम नव्हतं, म्हणून आज तुला सोडून चालली
आणि हे नातं माझ्यामुळेच तुटलं माझ्या रागाने आणि माझ्या स्वभावाने.
चूक केली मी माझ्या आई बापांशी वाद घालून, त्यांना अडचणीत आणलं होतं. जो एक पाऊल घरच्यांशीवाय टाकू शकत नाही त्यासाठी घर सोडायला निघाली होती.
आणि ते ही तुझ्यासारख्या मुलासाठी.
आता नाही.
पुन्हा मी येणार नाही तुझ्या वाटेत.

ती निघून चालली.

हा. जा जा.
जिथे जायचं तिथे जा.
नाही अडवणार तुला आता.
झालं ना तुझ्या मनासारखं.
जगेन माझा मी, खूप केलंस ना माझ्यासाठी
माझ्या माणसांसाठी आणि माझ्या स्वप्नासाठी. ठिकय. जा
आता तुला तुझा मार्ग मोकळा आहे.
जगेन माझा मी
तू केलेलं कष्ट वाया जाऊ देणार नाही
एक ना एक दिवस माझ स्वप्न पूर्ण करेन.
आता फक्त ध्येयासाठी जगणार आणि ज्यांनी मला घडवलं त्यांच्यासाठी जगणार.
माझा मार्ग आता मीच निवडणार.
जा तू तुझ्या मार्गाने,
आता तू ही माझी एक मैत्रिणच होतीस म्हणेन.
आठवी मैत्रीण!

(मला माहितीय ती आता परत कधीच येणार नाही. शेवटी तिने तिच्या रागानेच संपवलं सगळं. मी आता ठाम राहणारजाताना तिच्या बॅगेतून एक वही पडली, त्यात आमच्या सर्व आठवणी जपल्या होत्या. सर्व चांगल्या वाईट बरच काही होत त्यात. आणि सोबत एक पत्रक होतं. सेम तसच जे तिने मला पहिल्या वेलेन्टाईलन डे ला गिफ्ट केलं होतं. फक्त ते रिकाम होत, काही लिहिलं नव्हतं. आणि तिने मला त्याचा अर्थ ओळखायला सांगितलं होतं जे मला आजवर नाही समजलं आणि मी फारस लक्ष ही दिल नव्हतं.
पण यात असच एक पत्रक आणि पत्रकावर कविता होती. तिने लिहलेली....)

तू प्रेम केलंस?

मान्य य मला तू प्रेम केलंस
अगदी मनापासून केलंस
जीव लावलास
मिठीत घेतलंस सगळं केलंस
तू प्रेम केलंस?

२ वर्षांत प्रेमाची दुमजली
इमारत उभारलीस
तळमजला, पहिला मग दुसरा
पण त्याखाली असलेला
पाया भक्कम केलास?
तू प्रेम केलंस?


खोट्याच्या विटा रचून
तू पाया भरलास
तळमजल्यावर येऊन
मित्र सह परिवारा समक्ष
मलाच नग्न केलास
तू प्रेम केलंस?

पहिल्या मजल्यावर येता येता
तूझ्या नजरेत एक स्वप्न पाहिलं
बघता बघता माझ्यातला मी मारून
माझ्यात स्वप्न उतरवलंस
केले प्रयत्न मी साम दाम दंड भेदाचे
ध्येयात तरी अडथळा मलाच ठरवलंस
तू प्रेम केलंस?

मला माहितीय तू प्रेम केलंस
तुझा लावलेला जीव,
मारलेली मिठी
अन् जीवापाड प्रेम मलाही दिसलं
मी प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी ते
अनुभवलं
का कधी नाकारलं ?
तू प्रेम केलंस!

तू प्रेम केलंस
तुझ्या अनेक चांगल्या गोष्टी,
कला, भेटवस्तू मी मनात अन घरात
साठवलंय
प्रेम प्रसंगाच्या क्षणांनी तर अंग
अंग गहिवरलय
मी तुझं प्रेम आधी पासून
नात्याचा दुसऱ्या मजल्यावर पाहिलंय!

आजवर कुणीच नाही केलं
तू इतकं प्रेम केलंस
तुझ्या शिवाय नाही जगू वाटत
तू इतकं प्रेम केलंस
पण नात्याची दुमजली इमारत
उभारताना तू पाया
तळमजला अन पहिल्या मजल्यावर
लक्षच नाही दिलंस

मी एक एक गोष्ट जोडत होतो
आणि तू जीवापाड जीव लावत होतीस
फरक एवढाच मी नात्याला
रोपट्यासारखं वाढवत होतो
अन् तू वृक्ष नजरेत भरलं होतंस
तरीही माहितीय
तू खूप प्रेम केलंस !!!

- रोh@nj