Saturday, September 22, 2018

बाप्पाचा मेल आलाय...

प्रिय भक्तांनो,

          मला मानणाऱ्या न मानणाऱ्या समस्त पृथ्वी तलावर वावरणाऱ्या माणसंहो... गेल्या ११ दिवसांत तुमच्या भक्ती सोबत इतर अनेक गोष्टी माझ्याजवळ पोहोचल्या आणि न राहून हा मेल तुम्हाला पाठवावा म्हटलं. मेलंचं योग्य म्हटलं म्हणजे तो तुम्ही अगदी सहज स्मार्ट फोनवरही वाचाल आणि माझ्याचं नावाने ११ जनांना पाठवालं आणि नाही पाठवला तर अपशकुन होईल असा जगभर बोंबाटा करत सुटाल. नाहीतर आज्ञापत्र पाठवावं तर ते फरमान वाचायला तुम्ही वेळ द्याल की नाही कुणास ठाऊक याची वेगळी भीती.


          तर सुरूवात करतो माझा शाखा विस्तार केलात तिथून. म्हणजे पूर्वी २-४ किमी अंतरावर माझी स्थापना होती तर आता चौकाचौकात तूम्ही अमूक तमूक मंडळाच्या नावाने मला नेऊन ठेवता. वर त्यात भेदभाव ही तुम्हीच करता. पाहिलं तर सगळीकडे मीच; पण त्या पर्टिक्यूलर ठिकाणीच तुम्ही नवसाचा राजा म्हणून मला घोषित केलात. बरं आता तुम्हाला कितीही समजून सांगितलं तरी कळेना, "मी देवाऱ्यात नाही तुमच्या मनात वसतो". पण शेवटी तुम्ही मला दगडात आणि मूर्तीत शोधता आणि नवसाला पावणारा म्हणून त्यातल्याच एकाला घोषित करता. आता मला सांगा या सगळ्यांचं हेड आॅफिस तर मीच चालवतो. मग तुमच्या घरातला मी आणि त्या मंडपातला मी यात भेद का बरं? त्यापेक्षाही सांगायच तर मनात डोकवा तिथेही मीच आहे.

आणि नवस म्हणजे काय हो लेकरांनो. तुमची एखादी इच्छा मांडता बदल्यात मलाच काहीतरी अमिष दाखवता आता तुम्ही मला सोनं, चांदी, ५-२५ नारळं वाहणार ते घेऊन मी कुठं बरं जाणार. स्वर्ग लोकांत या साऱ्याची बिलकुल गरज नाही मला. इतकं सारं ओझं, सोन, चांदी, पैसे, अमाप संपत्ती तुम्ही माझ्या वेगवेगळ्या शाखांत भरता पण कधी पाहिलात का मला ती घेऊन जाताना? नाही ना! मग मी मागितलं नसताना का बरं देता?

मला तुमच्या भक्तीची अन् मोदक, जास्वंदाची तेवढी भूक. तेही तुम्ही २१ मोदक देता ते जेव्हा २१ भक्त ग्रहण करतात तेव्हाचं माझ्या पोटी लागतं. इतर मला काही नको असतं. आणि राहिल्या तुमच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न जर ती योग्य असतील तर नक्कीच पूर्ण होतील. त्यासाठी माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतोच. पण तुम्ही संपूर्ण जबाबदारी माझ्यावर किंवा नशीबावर टाकाल तर मी तरी काय करणार यात.


अभ्यास न करता विद्यार्थ्याला निकाल कसा लाभणार. किंवा डाॅक्टरी इलाज न करता एखादा आजार बरा कसा होणार. माझा वाटा केवळ १ टक्का बाकी तुमचे प्रयत्न असावेत. तुमच्या प्रयत्नाला माझी साथ असतेचं.
पण तुम्ही मला नवस बोलायला माझ्या शाखाही स्वतः ठरवता. तासनतास लाईनही तुम्हीच लावता आणि पुन्हा त्यात वादविवाद करून भांडताही तुम्हीच. मग कधी पोलीसांवर हल्ला तर कधी कार्यकर्त्यांवर. पण या सगळ्यांत माझा भक्त कुठेय?
बरं मग त्यातही तुम्ही नवसाची रांग, तर कुठे वि. आय. पी. तर कुठे पास विकुन रांग लावता. माझ्यासाठी सारे सारखेच तुम्ही बाळांनो. मी कधी भेद नाही केला. मग तुम्ही का अस विभागून येता माझ्याकडे...
या रे या सारे या... एक दिशेने एक मताने या...

आणि हे... हे बघा! आता यावर काय बोलू मी. अरे माझी उंची तुमच्या एवढीचं. त्यात हे उंदीरमामा आमचे एवढेसे. माझ्या ६ फुटाचे १२-१५ केलात तीथवर ठिक. हळूहळू वाढवत आता २२-२५-३० फूटावर नेऊन ठेवलात माझी उंची. अरे इतक्या वरून माझ्या भक्तांना पाहताना किती त्रास होतो मला आणि त्यात तुम्ही आधार देऊन उभ करता आणि त्यात माझा तोल जाण्याची ही भीती. एक अपघात ओढवला होता, आठवतय ना...


माझ्या किर्तीची उंची तुमच्या मनात साठवा पण मूर्ती मात्र जरा मापातचं असू़द्या... त्यात त्यांच्याचौकात इतकी मोठी म्हणून आपल्या चौकात चार फूट वाढवून बसवू नका. त्रास शेवटी मलाच होतो. आणि नको त्या गोष्टीत का म्हणून तुम्ही स्पर्धा करता. मूर्तीची उंची, मंडळाचे नाव, आगमन, विसर्जन, नवसाला पावणारा अरे या साऱ्यात स्पर्धा कशासाठी.
सामाजिक उपक्रमांत स्पर्धा करा, चलचित्र देखाव्यात स्पर्धा करा, ज्या स्पर्धांतून समाजहित साधेल, सामाजिक उपदेश जाईल, सत्कार्य घडेल. अशा स्पर्धा करा. त्यांनी एक सत्कार्य केले तुम्ही चार करा. पण तुम्ही अडता फक्त मंडळाच्या खोट्याा प्रतिष्टेसाठी. आणि लावता मग आगमन, विसर्जन अन् कोणी मुंबईचा तर कोणी नवसाचा राजा. हे एवढ मार्केटिंग कशासाठी हवं मला. माझे काॅपीराईट आणि ट्रेडमार्क घेण्याइतपत तुम्ही मोठे झालात का?

डिे.जे., ढोल यांच्या प्रमाणा बाहेरील धिंगाण्यात गर्दी वाढवून काय सिध्द करायचंय तुम्हाला... परवा आगमनाला काय झालं पाहिलात? मी शांतच बसलो होतो. कोण कोण कुठून लांबून आलं होतं. मला पाहण्यासाठी कि नुसत त्या गर्दीत उड्याामारून नाचण्यासाठी? रोड डिवायडर, सरकारी बस, प्रायवेट गाड्याा सगळ्यांवर चढून बसलात तुम्ही. शेवटी काय लागलं हाती...
सामान्यांची चेंगराचेंगरी, सरकारी मालमत्तेचे नुकसान आणि कलाकारांनी सादर केलेल्या वास्तू जमीनदोस्त. यावर तातडीने उपाय करत माझ्या भक्तांनी आपली चूक सावरली खरी, त्याच मला अपु्रपच आहे. पण याला जबाबदार कोण? मी की तुम्ही?


वरून घडलेल्या घटनेचा अपप्रचार करून तुम्ही माझचं नाव अगदी धुळीस मिळवता. एखादी दुर्घटना किंवा तुमच्या वागणुकीने घडलेली चूक तुमच्यातलेच काही हितचिंतक तातडीने फोटो काढून त्यावर भरमसाठ काहीतरी लिहून मोकळे होतात. आणि जाहिर करतात हाच का गणेशोत्सव? हीच का श्रध्दा?
म्हणजे चूक करणारेही तुम्हीच आणि प्रश्न करणारेही तुम्हीचं. पण अशाने तुमच्याच समाजात आस्तिक-नास्तिक आणि जाती विरूध्द दंगे होण्याची मलाचा अमाप भिती. कारण अशा संवेदनशील गोष्टी योग्य पध्दतीने पोहचवणारा हितचिंतक असतो पण त्याचा वणवा पेटवून परिस्थिती बिघडू पाहणारा हा समाजकठंक असतो.
अशी विचारधारा असणारे अस वाटतं माझं अस्तित्व मिटवण्यास जणू वाटचं पाहत असतात.

          आता कालचं आमच्या नारदमुनींनी एक विडीयो पाहिला. त्यात चौपाटीवरील विसर्जनानंतरचे दृष्य कैद होते जे अतिशय दुदैवी परिस्थिती मांडत होते. शिवाय एक असही चित्र होते कि एका भल्या मोठ्या ट्रकमध्ये माझ्या असंख्य मुर्त्या एका खाडीत फेकल्या जात आहेत. खर तर हा अनुचित आणि चुकीचाच प्रकार. उत्सवाचं हे रूप पाहिल्यावर कोणीही टिका करणारचं. पण ते सोशलमिडीयावर वायरल करून काय बरं साध्य होतं? म्हणजे करणारे ही तुम्हीचं आणि दाखणारे ही तुम्हीच. त्यावरचे उपाय का नाही बरं करतं. तुमच्या संपूर्ण गाव-शहराच्या लहान आणि मोठ्या माझ्या प्रतिमूर्ति तूम्ही चौपाटी व समुद्रकिनारी विसर्जित करता त्या पी.ओ.पीच्या अविघटक मुर्त्यांचं ग्रहण समुद्रदेव किती बरं करणार. त्यांनाही पाण्याखालील जीवसृष्टीची काळजी असेलच की, मग या साऱ्या लहान मोठ्याा मूर्ति समुद्र देव किती अन् कशा उदरात सामावून घेणार. त्या पुन्हा किनाऱ्यावर येणारचं आणि तिथून उचलून एखाद्याला त्याची पुन्हा विल्हेवाट दुसऱ्या ठिकाणी लावावी लागणारचं.


विसर्जनानंतर जणू त्यातलं अस्तित्व संपूण तो पुतळा कसा कुठेही भिरकावला गेला तर यात नवल काय हो? कारण तुम्हाला ही संपूर्ण सृष्टी, हीची काहीच पर्वा नाही. नाहीतर तुम्ही माझ्या लहान आणि इको फ्रेंडली मूर्तीची स्थापना करून, कृत्रिम तलावात विसर्जन करून पर्यावरणाचा समतोल राखणारा उत्सव साजरा केला असता. पण तुम्ही एका हाताने चुक करता अन् दुसऱ्या हाताने तेच फोटो काढून त्यावर टिका करता, गालबोट मात्र मलाचं लागते. हाच का टिळकांचा गणेशोत्सव.


         टिळकांनी असा कधी स्वप्नातही विचार केला नसेल बाळांनो असं विचित्र रूप तुम्ही माझ्या उत्सवाला आणलयं. मला आठवतयं लोकमान्य टिळकांनी १८९३ साली घरातला सण दारात आणला आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचं स्वरूप दिलं. स्वातंत्र पूर्व काळात लोकांनी एकत्र यावं, स्वतंत्र्याची धोरणं आखावित क्रांतिकारक योध्दे तयार व्हावेत; अशी सुगम, स्वच्छ धारणा त्यामागे होती. समाज हिताची विचारसारणी होती. उत्सवाला सांस्कृतिक आणि सामाजिक धारणा होती. पण आज हे सारं चित्र बदललयं भक्तांनो. हे थांबायला हवं. माझ्या नावाने चालणारी ही स्पर्धा, मार्केटिंग अन् खोट्या भक्तीची दुकानं बंद करा. वेळ आहे तोवर सावरा. नाहीतर प्रलय येईल. तेव्हा विघ्नहर्ता म्हणून मला काहीच करता येणार नाही. कारण तेव्हाही तुम्ही एकजूटीने बदलण्याचा नाही, तर प्रत्येक चौकातल्या मंडपाच्या माझ्या मूर्तीतच मला शोधाल आणि मी मात्र इथे तिथे कुठेच नसेन कारण मी फक्त एक दिव्य शक्ती आहे. जी सर्व निसर्गात आहे अन् तुमच्या मनात आहे. तर ओळखा माझं खर रूप आणि बदला हे उत्सवाचं स्वरूप.

तुमचा लाडका बाप्पा... 




2 comments:

  1. मस्त विचार आहेत रोहन ...हेच कित्येक वर्ष माझ्याही मनात होत..ज्यावेळी आपण लालबाग दर्शनाला गेलो होतो,वर्ष 2011.

    त्यानंतर हे चित्र वर्षानूवर्ष खूप भयंकर होत चालल आहे...

    आतातरी लोकांना हे समजल पाहीजे...आपण बाप्पाच्या नावाखाली कीती भयंकर निष्काळजीपणे वागतोय..

    बाप्पा एकच आहे आणि तो मूर्तित नाही ..मनात असतो...

    आणि याची कल्पना मला practically आलीय....

    याच सविस्तर म्हणजे आमचे मित्र गूरूवारी मोहरम ला खेतवाडीला गेले पण मला जाता आले नाही मी मनातूनच पाया पडलो आणी त्याच रात्री आमचे घरचा पोटमाळा रात्री 2 वाजता अचानक कोसळला तयाआधीच 1 min मला जाग आली आणि मी पाणी पिण्यासाठी खाली अलेलो..एरवी कधीही जाग मला येत नाही..
    सर्व बाप्पाची क्रृपा ...


    सांगायचा उदेदेश एवढाच...देव आपल्यासोबत असतो.

    तूमही जर जायचच असेल तर शांतपणे देवदर्शन करा त्या कलाकराची कला बघा त्या मूरतीकालाची भेट घ्या...त्याच कोतूक करा...

    पण देवाच्या नावाखाली असे घटना घडू देवू नका...

    Thanks rohan for such message...




    ReplyDelete
    Replies
    1. Thank you Avinash. Yenarya kalat sarv milun punha nava ustasasv sajara karu....

      Delete