Wednesday, February 14, 2018

पत्र... तिच्या परतीसाठी!!

आज ३ महिने ३ दिवस झाले, त्याच्या नि तिच्या भेटीला. तो नेहमी येतो, तिच्या आठवणींना गोंजारतो, तिने दिलेल्या क्षणांत रमतो आणि त्या चौपाटीवरच्या प्रत्येक गोष्टीशी बोलतो. 
त्याही त्याच्याशी बोलतात (त्याला वाटत), त्याला प्रश्न करतात?
आणि तो तिला फोन करण्याचा प्रयत्न करतो, फोन लागत नाही, 
whatsapp ला लास्ट सीन पाहतो, तो शेवटच्या भेटीचा. 
फेसबुक वर त्याच भेटीचा शेवटचा सेल्फी. 
तो रडतो, रडत रडत वहिच एक पान फाडतो आणि लिहू लागतो!

पत्र... तिच्या परतीसाठी!!

प्रिय,
तू...

"तुला आठवतेय आपली शेवटची भेट, तो समुद्र किनारा, त्या उसळणाऱ्या लाटा, ती सळसळणारी रेती अन् त्यात रुतलेले आपले पाय. तू विसरली अशील कदाचित,"
मी नाही विसरू शकलो. कारण त्या चौपाटीच्या रेतीतला कण कण आणि वाहणाऱ्या पाण्याची प्रत्येक लाट मला आजही प्रश्न करते. "तू तिला थांबवलं का नाहीस?"
त्यांना कुठे माहीत, की जाताना तू सांगितलंच नाहीस. तुला माहिती होत जर तू म्हटली असतीस ही आपली शेवटची भेट, मी मनाशी कवटाळून धरलं असत तुला - आयुष्यभर, कधीच सोडलं नसतं!
तुला माहीत होत ना हे, म्हणून तू लपवून ठेवलस सार माझ्यापासून...


"अचानक एखादं पालवी फुटलेलं झाड मुळावर घाव करून संपवाव. असं नात कोलमडून पडलं ग आपलं. तुला जाताना प्रश्न करावे वाटले नाहीत? जाणून व्हावं वाटलं नाही? सत्य काय हे ही शोधावं वाटलं नाही. तू फक्त निघून गेलीस. अशा वाटेवर जिथून तू परतलीच नाहीस."

मी आता तिथेच बसलोय, नाही सोबत कुणीच नाही ग. अगदी एकटाच बसलोय, आपल्या काही आठवणींसोबत. जिथे अगदी शेवटची भेट झाली तिथेच आणि पहिली भेट ही इथलीच ना ग?
म्हणजे एकंदरीत सुरुवात नि शेवट त्याच जागी त्याच भेटीत करून गेलीस असंच ना? म्हणजे जिथून दोघांचा प्रवास सुरु झाला तिथे पुन्हा येऊन एकटा सोडून गेलीस.
का तुझ Destination काही वेगळं होत का? की प्रवासात माझा सहवास नको झाला तुला?
की माझा कंटाळा आला होता? नाही, मग तुला कोणी माझ्याही पेक्षा जास्त जीव लावला का?
मग तुला खेळायचं होत का ते tp म्हणतात तस काही?
हे पण नाही, मग मी कुठे चुकलो होतो का?
अग सांग, सांग काहीतरी..... सांग काहीतरी....
हे प्रश्न मला कोड्यात अडकवून संपवतायत ग. का गेलीस तू? का गेलीस?


तुझी प्रत्येक गोष्ट आजही मी तशीच जपलीय. बांधून घेतलंय मी स्वतःला तुझ्याशी. तुला ही आवडायचं ना ते. सतत मी तुज्याबद्दल बोलणं. काळजी करणं. तुझ्यासाठी काहितरी करणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुझा आवडता हट्ट, 'माझ्यासाठी लिहिना', किती लाडाने म्हणायचीस. अगदी आपल्या पहिल्या भेटीवर सुद्धा लिहायला भाग पाडलं होतंस.
आठवतंय ना, एखाद्या लहान बाळासारखा हट्ट होता तुझा.
"मी वाट पाहते, दोन...चार... हवे तितके दिवस, तू लिहिपर्यंत".

PC : Instagram

तुझ्या डोळ्यांत पाहिल्यानंतर खरं तर तिथेच लिहावं वाटत होतं. त्या डोळ्यांतली चमक शब्दांत उतरवण्याची इच्छा मलाही झाली होती. पण अडवलं होत स्वतःला आणि नजर फिरवली होती. तिथून परतल्यावर मात्र शब्दांनी हात धरला अन् तुझ्यासाठीची पहिली कविता गिरवली. अगदी त्याचं दिवशी मध्यरात्री. पण तुझा हट्ट असूनही तुला ती दाखवली नाही, कारण हे का लिहिलं हे माझं मलाही तेव्हा कळलं नव्हतं. आणि तुलाही ते किती आवडलं असत नि पटलं असत माहीत नाही. शिवाय मी प्रेमात वगैरे पडलोय समजून तुही दूर केलं असतीस की तुझ्याही मनात तेच होत कल्पना नव्हती. हो पण एखाद्या विषयी लिहायचं म्हटलं की त्या व्यक्तीच्या अंतःकरणात शिरून स्वतःच्या नसा नसांत तीच अस्तित्व जागवावं लागत. तेव्हा शब्द खाणीतून बाहेर पडतात. तुझ्याबाबतीत तेव्हा. तस काही होत की नाही माहीत नाही. पण त्यांनतर शब्द उमटले ते फक्त नि फक्त तुझ्यासाठी.
तुझ्यासाठी लिहिणं हा छंदच झाला. तुला हि तर वाचनाचा लळा लागला होता.

माझ्या कविता तुझ्या आवाजात किती सुरेख वाटायच्या ना. तुझा तो चिमणीसारा आवाज आणि त्याला कोकिळेचा सूर अस वाटायचं. तुझा तो आवाज कैद आहे माझ्याजवळ. तुझ्या आठवणी मनात हैदोस घालतात तेव्हा तोच साऱ्यावर पांघरून घालतो. पुन्हा ऐकव ना माझीच एखादी कविता, तुला आवडलेली. तुझं आवडत, ते गाणं गुणगुणायचिस ते. मनापर्यंत पोहचव ना तुझा आवाज पुन्ह्यांदा!
तुला माहितीय सूर्याच्या कोवळ्या किरणाबरोबर येणारा तुझा पहिला फोन,


झोपेतून उठल्यावर अगदी २-४ वर्षाच्या बाळासारखा बोबडा येतो ग आवाज. एखादं छोटंसं बाळ आपल्या जवळ बोलवतय अस वाटायचं. तुझ्या आवाजातला संपूर्ण गोडवा पहाटे मनात उतरला की माझा दिवस ही छान गोड व्हायचा. एकदा साद घाल ना त्याच गोड बोबड्या आवाजात.

नाही ऐकवलंस तरी रागावणार नाही ग मी. तू नेहमी म्हणायचीस ना मी short temper आहे, पटकन राग येतो, बघ ना आता मला रागच येत नाही अगदी कुणीही मारल, बोललं, कितीही छळल तरी. अगदी पूर्वीसार कुणी खोट वागलं विश्वासघात केला तरी त्यावर रागवत नाही. उलट आता तस झालं की मला माझाच राग येतो.
किती तरी वेळा म्हणायचीस, "चिडू नकोस ना रे, पटकन का रागवतो...!",
तू जाताना सगळा राग घेऊन गेलीस का? हल्ली तुझ्या सारा तो ही येत नाही!
त्या रागानेच संपवलय का आपलं नात?


कदाचित तू गेल्यावर मला नात्यांची किंमत कळाली. हल्ली वादच होत नाही फार म्हणजे मी संवादच नाही ग ठेवला फार कुणाशी आणि जे आहेत ते तुझ्यासारखे नाही पण समजून घेणारे आहेत. म कधी राग आलाच तर गमावण्याची तरी वेळ येणार नाही. पण खूप त्रास होतो ग. कारण तशा परिस्थितीला मला सावरायची शांत करायची Technique तुझ्याकडेच होती. अगदी झटक्यात दगडाला पाझर फोडायचीस.
या आठवणींनी तुझं मन नाही का ग पाझरलं?

आपण एकत्र घालवलेला वेळ तिथेच थांबला असता तर, ते चित्र किती रंगीत झालं असत.
तो दिवस किती छान होता लांब रस्ता आणि कुठे जायचं याचा दोघांनाही पत्ता नव्हता. कुठे जायचं माहीत नसताना, तुझ्या सोबतीत तो प्रवास किती रमणीय होता ग. गाडीतून जाण्याची इच्छाच तेव्हा मेली जेव्हा रस्ता क्रॉस करताना झटकन तू हात धरलास, खरं तर माझी ही इच्छा झाली होती ग, पण नात्याच्या सुरुवातीलाच अस् वागणं तुला पटलं नाही तर... पण तू पकडलेला हात मी घट्ट धरला अन् नकळत तो प्रवास संपेपर्यंत तसाच राहिला. मी ठरवून नव्हतं केलं. फक्त त्याचा आधार वाटला होता. तुलाही त्या स्पर्शाची भाषा कळाली होती ना?
मग अशी हात झटकून कुठे निघून गेलीस ग?


तुझ्या सोबतीतला प्रत्येक क्षण मनात वृंदावनासारखा बहरलाय अन् अत्तरासार गंध पसरतोय. तुझ्या भेटीतले अन् मिठीतले क्षण तुझ्या आवाजाइतकेच गोड नि मनात कैद आहेत. तू परत येऊ शकत नाहीस. पण मी तुझ्या पर्यंत पोहचण्याचा अनेकदा प्रयत्न केला. तू जवळ करत नाहीस आणि पुन्हा या माणसांच्या गर्दीत मला भिरकावून देतेस. पण मी येईन एक दिवस तुझ्याजवळ.
काळजी घे, पुन्हा येतो! तुझ्या आठवणीत थोड लिहून जातो!

आठवण येते तुझी,
रिमझिम रिमझिम सरींसारी
पावला पावलाला साथ सोडून
मनाचा रस्ता मात्र ओलावणारी...
आठवण तुझी ||

कधी मुसळधार होऊन,
अंगभर शहारणारी
तर कधी कडाक्याच्या उन्हात
भेटीची आस लावणारी...
आठवण तुझी ||

आठवण येते तुझी,
उन्हामधल्या पावसासारी
मनाला चटके देऊन
डोळ्यांना मात्र भिजवणारी...
आठवण तुझी ||

कधी दाटल्या आभाळापरी,
सांज ओली करणारी
तर कधी विजेच्या कडाडात
मनाला कोरा साद देणारी...
आठवण तुझी ||

आठवण येते तुझी,
वाहणाऱ्या लाटांसारी
मनाच्या किनाऱ्यावर आदळून
परतीची वाट मात्र धरणारी...
आठवण तुझी ||

कधी दुष्काळी मनात,
भावनेचा पूर आणवणारी
तर कधी त्सुनामीसारी
मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यात उसळणारी...
आठवण तुझी ||

आठवण येते तुझी,
अशीच सतत सतावणारी
मोडक्या स्वप्नांनकड पाहून
माझ्यात तुझे अस्तित्व जगवणारी...
आठवण तुझी ||

आजही येते, आठवण तुझी
तुलाही येईल का कधी
अशीच आठवण ... माझी
उन्हा पावसाला एकत्र करून
आयुष्याला इंद्रधनुष्यात रंगवणारी...
आठवण..... तुझी माझी ||

येईल का कधी आठवण तुलाही
आपल्या त्या निनावी नात्याची ||

तुझा,
मी,

त्याने शब्द आवरते घेतले अन् पत्राला पूर्णविराम दिला. ते एका envelop मध्ये घातलं. त्यावर पत्ता लिहिला. तो उठून पाण्याच्या दिशेने चालू लागला. पाणी कमरेच्यावर लागलं. तो सुन्न भिन्न होता, चालतच होता. एक उंच लाट आली आणि तो लाटेसोबत बाहेर फेकला गेला. पोलिसांनी ताब्यात घेतलं नि घेऊन गेले. ओसरत्या लाटेकडे तो मागे फिरून बघत होता, जाताना लाट हातातल पत्र भारकन घेऊन गेली.

पत्रावर पत्ता होता... देवघर!


All PC : Google

To be continued....



4 comments: